जानकरांचा अजाणतेपणा की...?

अनंत कोळमकर 
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय नैतिकता व साधनशूचिता वेशीवर टांगली गेली आहे. तेव्हा नैतिकता पाळायची झाल्यास या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईस्तोवर जानकरांनी लाल दिव्याच्या गाडीचा मोह सोडला पाहिजे.

महादेव जानकर यांना अनेक दिवसांपासून लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न पडत होते; पण ग्रहदशा काही जुळून येत नव्हती. अखेर जुलैमध्ये त्यांना जेजुरीचा मल्हारी मार्तंड पावला आणि पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री या नात्याने स्वहक्काच्या लाल दिव्याच्या गाडीत त्यांना बसायला मिळाले. त्यामुळे आता त्यांची ग्रहदशा सुरळीत झाली असेल असे वाटत होते; पण आता गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमधल्या एका अधिकाऱ्याला केलेला फोन जानकरांना महागात पडला आहे. आता जानकर खुलासे करीत आहेत; पण ते नेमके काय बोलले, त्याचा आशय काय होता व ते कशासाठी बोलले, हे साऱ्यांनीच ‘जान’ले आहे. 

जानकर तसा रांगडा गडी. जे काही बोलायचे ते थेट असा त्यांचा खाक्‍या. राजकीय क्षेत्रात वावरताना एक बेमालूम बेरकीपणा चालण्या-बोलण्यात ठेवावा लागतो. त्यातील बोलण्यातल्या बेरकीपणाला जानकर नेहमीच फाटा देत आले. त्यामुळेच ‘मंत्रिपद मिळणार नसेल तर वेगळा विचार करावा लागेल,’ अशी धमकावणी जानकरच देऊ शकतात. आता मंत्रिपद मिळाले... त्यामुळे तो बेरकीपणा व चतुरपणाही सत्तेच्या खुर्चीने अंगी यावा, ही अपेक्षा असते. मंत्रिपदाची झूल पांघरून सहा महिने झाल्यानंतर तरी ती बोलण्यात चतुराई यायला हवी; पण जानकरांना ते जमलेले दिसत नाही. नाहीतर निवडणुकीच्या कामात हस्तक्षेप करणारा फोन त्यांनी केलाच नसता आणि तेथेच ते फसले.

नगर परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर परिषदांचीही निवडणूक झाली. जानकर पाच डिसेंबरला देसाईगंज येथे दौऱ्यावर आले होते. त्यांचे एक समर्थक-जेसामल मोटवानी यांनी येथे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह द्यावे; तसेच नगराध्यक्षपदासाठी आलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करावा, असे सांगणारा फोन जानकर यांनी तेथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला केला. या संभाषणाची ध्वनिफित सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवर ‘व्हायरल’ झाली. या संदर्भात प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने लगेच देसाईगंज येथील प्रभाग नऊ (ब) ची निवडणूक रद्द करण्याचे आदेश काढले व जानकर यांना नोटीस बजावून खुलासा देण्यास सांगितले. तसेच देसाईगंजच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जानकर व मोटवानी यांच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली. पोलिसांनी यासंदर्भात निवडणूक आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाने विरोधकांच्या हातात आयतेच कोलित मिळाले. नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना जानकरांच्या फोनवरून विरोधक आक्रमक होणे अपेक्षित होतेच. तसे ते झालेही. सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील कामकाज या वादळात स्वाहा झाले. जानकरांनी आता सावरासावर करणे सुरू केले आहे. ‘मी निवडणूक अधिकाऱ्यांना केवळ विनंती केली,’ असे ते म्हणाले. खरे तर जानकरांचा हा खुलासा सारे काही जाणूनही ‘अजान’ बनण्याचा आहे. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला फोन केला, हे त्यांनी खुलाशातून मान्य केले आहे. मात्र, ध्वनिफितीतील भाषा विनंतीची वाटत नाही, हेही तेवढेच खरे. आता त्यांची ती विनंती होती की आदेश..., की धमकी...? हा प्रश्‍न नंतरचा आहे. ‘व्हायरल’ झालेली ध्वनिफित खरी की बनावट, यावर त्या प्रश्‍नाचे उत्तर अवलंबून आहे. चौकशीतून ते उघड होईल; पण मूळ मुद्दा हा आहे, की विनंती का होईना, पण तसे करण्याचा हक्क जानकरांना दिला कोणी? निवडणूक आचारसंहितेचा कायदा कडक आहे. त्यानुसार एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यात कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. अनेकदा न्यायालयही ते बंधन पाळते; मग जानकरच असे कोण लागून गेलेत की त्यांना या प्रक्रियेत हस्तक्षेप करून निवडणूक अधिकाऱ्याला विनंती करण्याचा हक्क मिळाला? निवडणुकीत अमक्‍याला अमूक चिन्ह द्यावे वा अमक्‍याचा अर्ज रद्द करावा, ही विनंती होऊच कशी शकते...? हे सारे जानकरांसारख्या मुरलेल्या राजकीय नेत्याला माहीत नसेल, यावर कोणाचा तरी विश्‍वास बसेल काय? खरे तर जानकरांचा हा खुलासा वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार आहे. 

या प्रकारामुळे राजकीय नैतिकता व साधनशूचिता वेशीवर टांगली गेली आहे. जानकरांचे नेतृत्व हे साध्याभोळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आहे. हा समाज बेरकीपणा जाणत नाही. म्हणूनच जानकरांचे नेतृत्व ज्या समाजातून पुढे आले, त्या धनगर समाजाने व ओबीसी समाजानेही त्यांना मंत्री म्हणून त्यांच्याकडे निवेदन देण्यास नकार दिला. विधिमंडळावर आलेल्या मोर्चाला सामोरे गेले असताना त्यांच्यावर ही नामुष्की आली. या समाजाने त्यांना मोर्चाच्या जागेवरून परत पाठविले. त्यातच आता या ध्वनिफितीने त्यांच्यावर प्रश्‍नचिन्ह उभे केले. नैतिकताच पाळायची झाल्यास या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईस्तोवर व किटाळ दूर होईस्तोवर जानकरांनी लाल दिव्याचा मोह सोडला पाहिजे. त्यांना तो सोडता येणार नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना डच्चू दिला पाहिजे.

Web Title: mahadev jankar red light car