महानायक!

amitabh
amitabh

किरकोळ शरीरयष्टी आणि ताडमाड उंची असल्यानं त्याला सिनेमात काम द्यायला कोणी तयार नव्हतं...वजनदार आवाज असल्यानं त्याला आकाशवाणीवर प्रवेश नाकारला गेला.. अभिनेता होण्यासाठीचे कोणतेही गुण अंगी नसल्याचं जणू शिक्कामोर्तबच झालं; पण हे सगळं खोटं ठरवत तो ‘तरुण’ नुसता नायकच नव्हे तर ‘महानायक’ झाला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज पंचाहत्तरी ओलांडल्यावरही ती ओळख कायम राखण्यात तो यशस्वी झाला आहे. अभिनयातील उत्तुंग कामगिरीसाठी त्याला देण्यात आलेला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ त्याच्या अजूनही बहरात असलेल्या कारकिर्दीला योग्य कुर्निसात आहे. अमिताभची रूपेरी पडद्यावरची कारकीर्द तशी चाचपडतच सुरू झाली. सत्तरचं दशक एकीकडं चॉकलेटी नायक आणि बाळसेदार नायिकांच्या प्रेमकहाण्यांची भरलेलं होतं, तर समाजात भोवतालच्या परिस्थितीबद्दल अस्वस्थता, असंतोष होता. याच काळात सलीम- जावेद यांच्या कथेवरचा ‘जंजीर’ प्रदर्शित झाला आणि अमिताभच्या रूपानं एक ‘सुपरस्टार’ उदयाला आला.

युवकांच्या मनातील खदखद बाहेर काढणाऱ्या ‘अँग्री यंग मॅन’चा जन्म झाला. गुंडाच्या खुर्चीवर लाथ मारून ‘ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं’, अशी तंबी देणारा हा नायक प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून गेला आणि त्या नंतरची चार दशकं हे वादळ चित्रपटसृष्टीमध्ये घोंघावत राहिलं. ‘दीवार’मध्ये गुंडांना गोडाऊनमध्ये बंद करून व चावी त्यांच्याच खिशात ठेवत धुलाई करणारा, ‘शोले’मध्ये मैत्रीला जागणारा, ‘त्रिशुल’मध्ये आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या स्वतःच्या बापालाच आव्हान देणारा आणि अलीकडेच ‘पिकू’मध्ये कॉन्स्टिपेशनसारख्या वेगळ्याच विषयावरून प्रेक्षकांना मनसोक्त हसवणारा, अशा कितीतरी भूमिका त्याने साकारल्या. त्याच्या प्रत्येक भूमिकेत तो समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी ‘रिलेट’ होत राहिला, हे त्याचं एक विलोभनीय वैशिष्ट्य. हे नातं आजही टिकून आहे. आवाजाची फेक, त्याचा विलक्षण बोलका पॉज, त्याचं चालणं सगळंच अनोखं. अन्यायाविरुद्धचा त्याच्या डोळ्यांत पेटणारा अंगार तरुण प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. या महानायकाचं वैयक्तिक आयुष्यही अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे. ‘कुली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातानं त्याला मृत्यूचा दारात नेऊन उभं केलं. मात्र, हा ‘मुकद्दर का सिकंदर’ आपल्या चाहत्यांच्या प्रार्थनांच्या जोरावर त्यातून बाहेर पडला. ‘एबीसीएल’ ही कंपनी स्थापन करून त्याद्वारे घेतलेल्या सौंदर्यस्पर्धेमुळं त्याला मोठा आर्थिक फटका बसला, पण स्वतःच्या हुशारी व कष्टाच्या जोरावर तो त्यातूनही बाहेर पडला. आपल्या प्रतिमेच्या प्रेमात न पडता ‘कौन बनेगा करोडपती’सारखा टीव्ही शो त्यानं स्वीकारला व त्यातही आपला ‘ए-वन’ ठसा उमटवला. हा महानायक आजही अथक काम करतो. आजही अक्षरशः गृहपाठ करतो. त्यामुळे चित्रपटसृष्टीबरोबर सर्वच क्षेत्रांतील तरुणाईसाठी तो आदर्श ठरतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com