गोमंतकीय ‘तियात्र’! (अग्रलेख)

maharashtra gomantak party
maharashtra gomantak party

गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन नाराज आमदारांना जाळ्यात ओढत सत्ताधारी भाजपने सत्तेवरील मांड पक्की केली; पण प्रश्‍न आहे तो अशा प्रकारच्या सत्तांध राजकारणाच्या नाटकांना मतदारांनी किती काळ सोसायचे याचा.

गो मंतकाच्या समृद्ध, सांस्कृतिक भूमीत ‘खेळ तियात्र’ हा पारंपरिक लोकनाट्याचा प्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. एरवी जत्रा आणि ‘फेस्ता’ विशिष्ट हंगामात रंगणारे हे लोकनाट्य आता राजकारणाच्या कल्लोळात मात्र बारमाही झाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर बारा दिवसही उलटले नाहीत, तोवर हे राजकीय तियात्र मंगळवारी मध्यरात्री कळसाध्यायास पोचले. गंमत म्हणजे ‘तियात्र’चे खेळ रात्र रात्र रंगतात, तसेच या राजकीय नाटकाचे खेळ मध्यरात्रीच घडले! संरक्षणमंत्रिपद सोडून पर्रिकर दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात गोव्यात परतले, तेव्हाच्या राजकीय स्थितीतच गेल्या मंगळवारी घडलेल्या नाट्याची बीजे आहेत. निवडणुकीच्या रिंगणात पर्रिकरांच्या भारतीय जनता पक्षाला कडवी झुंज देऊनही काँग्रेस पक्षाला सत्तेचे गणित काही जमवता आले नव्हते. युद्धात कमावलेले, तहात गमावून काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी हात हलवीत दिल्लीला परत गेले होते. भाजपचे धुरीण नेते नितीन गडकरी यांनी ऐनवेळी लढवलेल्या मसलतींच्या साह्याने पर्रिकरांनी ‘गोवा फॉरवर्ड’सह सर्वच विरोधी पक्षांचे कडबोळे सोबत घेऊन संख्याबळाचे गणित जमवले. गोवा विधानसभेत सध्या एकूण ३६ आमदार आहेत. पण, या छोट्याशा राज्यात होणारे राजकीय भूकंप मात्र देशभर थरथराट निर्माण करतात, याचे प्रत्यंतर गोव्यात गेली अनेक वर्षे येत आले आहे. पर्रिकरांच्या निधनानंतर ऐन मध्यरात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रिपदी निवड करून सत्ताधारी भाजपने आणखी एक राजकीय तिढा टाकला, त्यात अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाची फसगत झाली. इनमीन तीन आमदारांच्या साह्याने घासाघीस करू पाहणारा म. गो. पक्षच जवळजवळ गिळंकृत करून भाजपने काँग्रेस आणि अन्य विरोधकांचे राजकीय हेतू निर्णायकरीत्या हाणून पाडले. म. गो. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शिरोड्यातून माघार घ्यावी, या अटीवर भाजपने त्यांच्या सुदिन ढवळीकरांना  उपमुख्यमंत्रिपद दिले. परंतु, ढवळीकरबंधूंच्या या परस्पर कारभाराने नाराज झालेल्या म. गो. पक्षाच्या अन्य आमदारांना अचूक जाळ्यात ओढत भाजपने सरशी साधली आणि ‘तियात्र’चा खेळ कळसाला नेला.

म. गो. पक्षाचे पेडण्याचे आमदार आणि क्रीडामंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी आणि त्यांच्या सोबतीने सावर्ड्याचे आमदार दीपक प्रभू पाऊस्कर यांनी मंगळवारी उत्तररात्री भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा आधार घेत त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष मायकेल लोबो यांना त्यासंबंधीचे पत्र बहाल केले. उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत काही दिवस बसलेल्या म. गो. पक्षाच्याच सुदिन ढवळीकर यांची मग तत्काळ हकालपट्टी करून दीपक पाऊस्कर यांचा चोवीस तासांत शपथविधी घडवून आण्यात आला. आता तर मनोहर आजगावकर यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे आता अवघा एकच आमदार उरला, जो भाजपसाठी नगण्य आणि निरर्थक ठरला आहे. भाजपचे संख्याबळ काँग्रेसइतकेच म्हणजे १४ झाले. उर्वरित पाठिंबा देणाऱ्यांना मंत्रिपदांच्या खिरापती आधीच वाटण्यात आल्या असून, सावंत सरकार सध्यापुरते स्थिर झाले आहे.

‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे पुन्हा झेप घेईल,’ असा आशावाद दर्शवत सुदिन ढवळीकर यांनी भाजपच्या स्वार्थी राजकारणाचा खरपूस समाचार घेतला असला, तरी आता वेळ निघून गेली आहे, हेच खरे. म. गो. पक्षाला अशा प्रकारचे राजकीय धक्‍के नवे नाहीत. ‘काँग्रेसला आमदार पुरवणारी फॅक्‍टरी’ अशी एकेकाळी ओळख बनलेल्या या पक्षाच्या अस्तित्वावरील पहिले संकट १९८०मध्ये ओढवले होते. तेव्हा शशिकला काकोडकर यांनी म. गो. पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाकण्याची घोषणा केली होती. त्यांचे सातपैकी पाच आमदार काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले होते. ॲड. रमाकांत खलप आणि बाबूसो गावकर या दोघांनी काँग्रेसप्रवेश धुडकावल्याने म. गो. पक्षाचे अस्तित्व टिकले. पुढे १९९९मध्ये याच खलपांनी म. गो. पक्ष सोडला, त्यानंतर ते एकदाही निवडून येऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सध्यापुरते हे ‘खेळ तियात्र’ संपले असले, तरी त्याची चर्चा बरेच दिवस चालू राहील. उरता उरेल तो प्रश्‍न अशा प्रकारच्या सत्तांध राजकारणाच्या नाटकांना मतदारांनी किती काळ सोसायचे याचा. तो मात्र अनुत्तरीतच राहील. कारण संख्याबळाच्या लोकशाहीत सध्या तरी त्यावर ठोस उत्तर सापडलेले नाही. सत्तेच्या या खेळात आणि ‘दरबारी’ राजकारणात लोकशाहीचीच विटंबना होत आहे, हे कधी लक्षात घेतले जाणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com