ऑलिंपिकसाठी घडताना... : काटेकोर नियोजन, दुर्दम्य आत्मविश्‍वास

प्रत्येक खेळाडूला सगळ्या गोष्टींचे नियोजन बिनचूक लागते. अशा वेळेला प्रशिक्षक आणि मार्गदर्शक (कोच) यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.
Olympic
OlympicSakal

काटेकोर नियोजन आणि वेळापत्रक, शारीरिक तंदुरुस्ती, उच्च मनोबल आणि विपरीत स्थितीवर मात करण्याचा निर्धार यशाला गवसणी घालायला मदत करतात.

प्रत्येक खेळाडूला सगळ्या गोष्टींचे नियोजन बिनचूक लागते. अशा वेळेला प्रशिक्षक आणि मार्गदर्शक (कोच) यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यांच्या मदतीने पूर्ण वर्षाचा आराखडा बनवता येतो. याला ‘वेळेचे नियोजन’ म्हणतात. या मध्ये वर्षभराचे काही तुकड्यात विभागतात ‘मॅक्रो सायकल’ हा मोठा कालावधी असतो. त्यात ‘मेसो’ आणि ‘मायक्रो सायकल' असे प्रशिक्षण असते, जे काही आठवडे आणि दिवस चालते. प्रशिक्षणाचे नियोजन स्पर्धेचा मोसम नसताना, स्पर्धेआधी आणि स्पर्धेदरम्यान अशा प्रकारांनी करतात. प्रत्येक खेळाडू स्पर्धांमध्ये सहभागी होण्यामागे कौशल्य अजमावणे, मानांकन क्रमवारी आणि आत्मविश्वास वृद्धी अशी कारणे असतात.

खेळाडूच्या खाण्याच्या सवयी खूप महत्वाच्या असतात. त्याच्या जोरावर तो सर्वोत्तम कामगिरी बजावतो. अयोग्य आहार घातक ठरू शकतो. कारण मेहनतीतील थकवा दूर करण्यासाठी त्याला योग्य आहार लागतो. तो दूर न झाल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो. खेळाडूच्या आहारात कॅलरीजचे प्रमाण योग्य आणि आवश्यक असावे; ती त्याच्या प्रशिक्षणाची आणि कामगिरीची गरज असते. दैनंदिन जीवनशैलीत शरीरातल्या पाण्याच्या (द्रव पदार्थांचे प्रमाण) प्रमाणाला (हायड्रेशन) खूप महत्व आहे. घामाच्या स्वरुपात उत्सर्जित होणाऱ्या पाण्याची पातळी टिकवण्यासाठी पाणी किंवा इतर द्रव पदार्थ शरीरात जाणे गरजेचे आहे. शरीरातून उत्सर्जित क्षार भरून काढणे महत्वाचे असते. खेळाडूंना ३:१ प्रमाणात कार्बोहायड्रेटस आणि प्रोटीन्सची आवश्यकता असते. जसे की, स्पोर्टस ड्रिंक्समुळे कार्बोहायड्रेटस भरून काढायला मदत होते, प्रोटिन्समुळे स्नायू बळकट होतात.

रोज रात्री साधारण ८ तासांची झोप आवश्यक असते. खेळाडू रोज सर्वसाधारणपणे ठराविकच वेळेला झोपतात आणि उठतात. शरीराला सातत्य हा महत्वाचा घटक आहे; ज्या योगे खेळाडूला ऊर्जा मिळते. लक्ष विचलित होऊ नये म्हणून टेलिव्हिजन किंवा मोबाईल बघणे टाळतात. या सगळ्यांसाठी त्यांना पाठिंब्याची गरज असते; ज्यामुळे त्यांच्या ताणतणावाचे नियंत्रण होते. मन उल्हसित राहते.

सहन करण्याची शक्ती

प्रत्येक खेळाडूला कारकिर्दीमध्ये अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागतो. त्याशिवाय एखादा खेळ खेळणे आणि तो देखील ऑलिंपिकसारखा मोठ्या पातळीवरील हे केवळ अशक्य असते. स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग हे असे प्रशिक्षण आहे, ज्यामुळे खेळाडूला कोणत्याही पातळीवर दुखापत सहन करण्याची, त्यातून बाहेर पडण्याची आणि तरीदेखील सर्वोत्तम कामगिरीसाठी उत्तम तयारी होते. पिरडायझेशन या तंत्राचा उपयोग खेळाडूंना फायद्याचे ठरू शकतो. त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या काळात खेळाडू अतिशय उत्तम दर्जाचा खेळ करू शकतो, अपेक्षित परिणाम साधू शकतो. काही खेळाडू सरावानंतर मसाज करून घेतात. त्यामुळे दुखापतीतून बाहेर पडायला मदत होते.

खेळाडूची ऑलिंपिकसारख्या खेळासाठीची तपश्‍चर्या लक्षात घेतल्यावर मला खात्री आहे की, समाजातील आपण सगळे खेळाडूंकडे आदराने पाहू. त्यांचा त्याग, खेळासाठी झोकून देणे याचा सन्मान कराल, त्यांना प्रोत्साहन द्याल.

- महेंद्र गोखले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com