ही मॅन हिमांशू रॉय

अनीष पाटील
सोमवार, 14 मे 2018

जे. डे हत्येचा उलगडा करत रॉय यांनी त्यांच्या टीकाकारांची तोंडे बंद केली. त्यांच्यावरील टीकेकडे ते सकारात्मक दृष्टीने पाहत व त्याचा उपयोग करून घेत असत. आधी ते सडपातळ होते. त्यांच्या शरीरयष्टीविषयी एका नेत्याने काढलेल्या उद्गारामुळे त्यांनी शरीर कमवायचे ठरवले आणि तसे करून दाखवले.

"बॉय फ्रॉम साउथ मुंबई, नाऊ बिकम्स मुंबई सीपी, ऐसा बोलकेही मेरा स्पीच शुरू करूँगा,' आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्याआधी आपण कसे बोलू, हे उत्साहाने सांगताना हिमांशू रॉय यांच्या डोळ्यांत दिसणारी चमक अनेकांनी पाहिली होती. मुळात ती त्यांची खास शैली होती.

त्यातून प्रकट होई कमालीचा आत्मविश्‍वास. पहाडासारखी शरीरयष्टी व तसाच आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीने नियतीपुढे हार पत्करून घेतलेली एक्‍झिट खरोखरच चटका लावणारी आहे. त्यांची बॅच 1988ची. त्यांची पहिली नियुक्ती होती मालेगावात 1991 मध्ये. हा संवेदनशील काळ होता. बाबरी मशिदीची घटना याच काळातील; पण रॉय यांनी संयमाने व चातुर्याने परिस्थिती हाताळली. 

1995 मध्ये ते नाशिकचे सर्वांत तरुण पोलिस अधीक्षक होते. नाशिकनंतर अहमदनगर एसपी, आर्थिक गुन्हे शाखा उपायुक्त, वाहतूक विभागाचे उपायुक्त, कुलाबा, मंत्रालय, आझाद मैदान, फोर्ट यांसारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणं असलेल्या परिमंडळ-1 चे उपायुक्त अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी कामे केली; पण त्यांचे नाव झाले ते मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच सहपोलिस आयुक्त बनल्यावरच.

रॉय यांनी वर्षभरातच गुन्हेगारी विश्वाच्या नसा ओळखल्या. आयपीएल सट्टेबाजी प्रकरण, दाऊदचा भाऊ इक्‍बाल कासकरचा चालक आरिफ बेल यांच्यावर गोळीबार, लैला खान खून प्रकरण, विजय पालांडे दुहेरी हत्याकांड, प्रीती राठी हत्या प्रकरण, वकील पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरण अशा अनेक प्रकरणांचा त्यांनी कौशल्याने तपास केला. पत्रकार जे. डेच्या हत्येनंतर गुन्ह्याची उकल करण्याचा मोठा दबाव असताना ते प्रकरण रॉय यांच्या नेतत्वाखालील गुन्हे शाखेकडे देण्यात आले. 

जे. डे हत्येचा उलगडा करत रॉय यांनी त्यांच्या टीकाकारांची तोंडे बंद केली. त्यांच्यावरील टीकेकडे ते सकारात्मक दृष्टीने पाहत व त्याचा उपयोग करून घेत असत. आधी ते सडपातळ होते. त्यांच्या शरीरयष्टीविषयी एका नेत्याने काढलेल्या उद्गारामुळे त्यांनी शरीर कमवायचे ठरवले आणि तसे करून दाखवले. गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्तपद, एटीएस प्रमुख या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळल्या.

मारिया यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाची धुरा सांभाळली, तेव्हा पत्रकारांशी बोलताना "वांद्रे येथील एक मुलगा, जो स्लीपर घालून इथे फिरायचा, वांद्रे येथील गल्ल्यांत फुटबॉल खेळायचा, तो मुंबईचा पोलिस आयुक्त झाला आहे,' अशी सुरवात केली होती.

"तुम्ही आयुक्त झाल्यावर कशी सुरवात कराल', असे एका पत्रकाराने विचारल्यावर रॉय हसतहसत म्हणाले होते, "मैंभी बॉय फ्रॉम साउथ मुंबई, बोल केही शुरुवात करूँगा,' पण नियतीही तेव्हा हसली असावी. कारण, तशी वेळच कधी आली नाही.

Web Title: This is Man Himanshu Roy Article Pune Edition Editorial