Sundayspecial: ऍमेझॉन आणि पश्चिम घाटाविषयी हे वाचलच पाहिजे!

सुनील लिमये
रविवार, 1 सप्टेंबर 2019

आपल्याकडे पश्‍चिम घाट म्हणून ओळखला जाणारा प्रदेश हा सदाहरीत जंगले असलेला प्रदेश आहे. ही जंगले एका प्रकारे वर्षा वनांसारख्याच प्रकाराची असल्याने आणि त्यातही अशा आगी लागत असल्याने तेही काळजीचे मोठे कारण आहे.

ऍमेझॉनमध्ये लागलेल्या आगीमुळे आपण चिंतीत व्हायचे कारण आहे का? एखाद्या जंगलाला यापूर्वी वणवे लागले नाहीत का? काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या आगी लागत नाहीत का? ऍमेझॉन भारतापासून खूप दूर, मग आपण त्याचा विचार का करायचा? असे प्रश्न मनात येऊ शकतील. पण जगाला 20 टक्के प्राणवायू देणारा हा प्रदेश बेचिराख झाल्यास हवामानावर जो विपरीत परिणाम होईल, त्याचे विपरित परिणाम आपणांसही भोगावे लागतील. यासाठी आपण थोडा विचार केला तर लक्षात येईल की, आपल्याकडे पश्‍चिम घाट म्हणून ओळखला जाणारा प्रदेश हा सदाहरीत जंगले असलेला प्रदेश आहे. ही जंगले एका प्रकारे वर्षा वनांसारख्याच प्रकाराची असल्याने आणि त्यातही अशा आगी लागत असल्याने तेही काळजीचे मोठे कारण आहे.

पश्‍चिम घाट सुमारे एक लाख 60 हजार चौरस किलोमीटरवर पसरलाय. त्याचा भूभाग ""सह्याद्री'' म्हणूनही ओळखला जातो आणि तो भारताच्या पश्‍चिम किनाऱ्याशी समांतरपणे गुजरातमधील तापी नदीपासून सुरू होऊन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या भारताच्या दक्षिण टोकापर्यंत पसरलाय. या भागामध्ये सदाहरीत, त्याचबरोबर निमसदाहरीत वने आहेत. भारतातील सर्वात उंच दोन हजार 695 मीटर उंचीचे ""अनामुडी'' शिखरदेखील याच भागात आहे. या भागामध्ये वेगळ्या कामामुळे जसे की, खाणी, रस्ते तयार करणे, कालवे बनविणे, रेल्वेमार्ग टाकणे आणि त्याचप्रमाणे वन जमिनीवर आक्रमण करून उन्हाळ्याच्या दिवसांत, पुढील हंगामात जास्त गवत मिळण्यासाठी आणि शेतजमिनीतील तण काढण्यासाठी आग लावल्याने ही जंगले नष्ट होताहेत. वन विभागाचे कर्मचारी, काही स्वयंसेवी संस्था दरवर्षी त्या विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात. तरीही हजारो हेक्‍टर वने आगींमुळे पश्‍चिम घाटात जळतात, हे खरे.

Sundayspecial: कसं आहे ब्राझीलमधील ऍमेझॉनचं जंगल?

पश्‍चिम घाटातील सदाहरीत आणि निमसदाहरीत वने ही ठिकठिकाणी जवळ असलेली मानवी वस्ती आणि त्यालगतच्या शेतीमुळे क्‍लिष्ट साखळीतल्या कड्यांसारखी आहेत. त्यामुळे विविध कारणांनी शेतामध्ये लावलेली आग किंवा जंगलातील वनोपज गोळा करण्यासाठी लावलेली आग ही मोठ्या प्रमाणावर वनांमध्ये पसरते आणि आपल्याकडील वनांचा ऱ्हास होतो. बऱ्याचदा असे दिसते की, पश्‍चिम घाटातल्या आगीनंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ही वने पुन्हा पहिल्यासारखी बाह्यस्वरुपी हिरवीगार दिसतात. परंतु या आगीमध्ये प्राणी मृत्यू पावणे, नवीन रोपे आणि बिया खाक होणे, मागच्या वर्षी उगवलेल्या रोपांचा नाश होणे, आगीमध्ये वृक्ष जळणे या सर्वांचा विचार करता मोजता न येणारे असे खूप मोठे नुकसान होते. त्यातच आगी लागण्याच्या घटना उन्हाळ्यात घडतात, त्या वेळी भूतलावरील आणि भूतलाखालील पाण्याचे प्रमाण घटलेले असते. त्यातच आगीची भर पडल्याने जमीन भाजली जाऊन जमिनीतील पाण्याची मात्रादेखील आणखी घटते. त्यामुळे या सर्वांवर मात करून जंगलाला लागणाऱ्या आगी तातडीने थांबविण्याची गरज आहे. शेतातील पीक काढल्यानंतर शेतात शिल्लक राहणारा कुडा-कडबा जाळणे बंद करणे हा त्यासाठी महत्त्वाचा, प्रभावी उपाय आहे. त्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. वनातील वनोपज जसे तेंदू, मोहा, डिंक गोळा करण्यासाठीसुद्धा आगी लावण्याचे प्रकार घडतात, त्यावरसुद्धा कठोर उपायांनी आगीच्या घटना थांबविणे अत्यंत गरजेचे आहे. जनावरांना गवत चारण्यासाठी फिरणारे मेंढपाळ आणि गुराखी पुढील मोसमात चांगले गवत मिळावे म्हणूनसुद्धा पूर्वापारच्या चुकीच्या समजुतीमुळे अशा क्षेत्रात आग लावतात. तेथील वनक्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. पश्‍चिम घाटातील कर्नाटक आणि केरळमध्ये आगींविषयी बऱ्यापैकी अभ्यास झालाय. जानेवारी ते एप्रिल-मे या कालावधीत बऱ्याच ठिकाणी आगी लावल्या जातात आणि लागतात हे आढळलंय. त्यातूनच जर आधीच्या वर्षी पाऊस कमी पडला असेल, तर आगीची तीव्रता नक्कीच जास्त असते. त्यामुळे वन्यजीव, जैवविविधतेचे खूप नुकसान होते, हे आढळते. कारण या आगीमुळे वातावरणातील कर्बवायूचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हरितगृह परिणाम होऊन तापमान वाढते. आगीनंतर बेचिराख वनातील राख जमिनीतील बऱ्याचशा पोषक द्रव्यांचा नाश करते. त्यामुळे जमिनीची जास्त धूप होते.

Sundayspecial: ऍमेझॉन ‘झळ’ तुम्हालाही भोगावी लागणार!

ऍमेझॉनमध्ये अनेक महिन्यांपासूनच्या आगी किंवा मागील दोन वर्षांपासून उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर लागलेल्या आगीप्रमाणे खूप कालावधीसाठी जंगल जळल्याचे प्रकार पश्‍चिम घाटात दिसून येत नाहीत. परंतु, या क्षेत्रात छोट्यामोठ्या लागलेल्या आगींचा विचार केला तर त्यामुळे वनक्षेत्राचे अपरिमित नुकसान होते. जैवविविधतेचाही मोठ्या प्रमाणावर नाश होतो, हे खरे. सद्यस्थितीत आगीमुळे होत असलेला हवामान बदल लगेच दिसून येणार नाही, परंतु जेव्हा पुढील काही वर्षांत आगीचे प्रमाण घटले नाही तर त्याचा वाईट परिणाम अत्यंत नाशकारक अशा हवामान बदलाच्या स्वरुपात आपल्याला बघावाच लागणार आणि ऍमेझॉनसारखी परिस्थिती येऊ शकणार, हे नक्की. सरकार आणि वन विभाग एकीकडे मोठ्या प्रमाणावर रोपे लागवड आणि त्यानंतर वृक्षसंगोपनाचा प्रयत्न करीत आहे, त्याचवेळी काही चुकीच्या समजुतींमुळे शेती आणि वनांना आग लावण्याचा जो प्रकार होतो, तोही तातडीने बंद व्हावा, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. जगाच्या नकाशावर जरी ऍमेझॉन लांब असले तरी जवळपास त्याचीच प्रतिकृती असलेले पश्‍चिम घाट अथक प्रयत्नांनी वाचविणे गरजेचे आहे, याबाबत कोणतीच शंका नाही.

(लेखक मुंबईत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपदावर कार्यरत आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi article about amazon forest fire and western ghats in India sunil limaye