ध्येयासाठीचा 'दमसास' 

संजय घारपुरे 
सोमवार, 8 जानेवारी 2018

जिद्द आणि खेळावरची निष्ठा माणसाला कसे उन्नत बनवते, शिखरावर नेते याते मूर्तिमंत उदाहरण. वडील तो लहान असतानाच वारले. आईने जबाबदारी पेलली. मुलाचा कबड्डीकडील ओढा लक्षात घेऊन त्या माउलीने त्याला प्रोत्साहन दिले. 

तो पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश करत होता. त्या वेळी त्याची नजर एका हॉलकडे गेली. तिथे एका कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू होती. ती पाहून तो काही क्षण थबकला अन्‌ त्या वेळी क्षणार्धात सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून गेला. होय! तो होता रिषांक देवाडिगा. राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्र कबड्डी संघाचा कर्णधार. ज्या हॉटेलमध्ये त्याने हेल्पर म्हणून काम केले त्याच हॉटेलमध्ये कबड्डीवरील चर्चासत्रात प्रमुख पाहुणा या नात्याने जाण्याची संधी त्याला मिळाली होती.

जिद्द आणि खेळावरची निष्ठा माणसाला कसे उन्नत बनवते, शिखरावर नेते याते मूर्तिमंत उदाहरण. वडील तो लहान असतानाच वारले. आईने जबाबदारी पेलली. मुलाचा कबड्डीकडील ओढा लक्षात घेऊन त्या माउलीने त्याला प्रोत्साहन दिले. 

रिषांकही हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. सुटी मिळाल्यावर रिषांक कबड्डीचा सराव करायचा. अपार मेहनतीने त्याने स्वतःला कबड्डीपटू म्हणून घडवले. त्याच्यासाठी कबड्डीच सर्वकाही होते. कबड्डीमुळेच तो आज स्वतःचे घर घेऊ शकला आहे. भारत पेट्रोलियममध्ये लागल्यावर त्याची व्यावसायिक कबड्डीपटू म्हणून सुरवात झाली; पण या मेहनती मुलाच्या कारकिर्दीला "प्रो' कबड्डीमुळे खरे वळण मिळाले. यू मुम्बा संघाने त्याला केवळ 5 लाख रुपयांत खरेदी केले होते. स्पर्धा सुरू झाल्यावरच "मी यू मुम्बाचा किंग असेन, तर रिषांक प्रिन्स' अशी कर्णधार अनुपकुमारची शाबासकी त्याने मिळविली.

आज त्याने अनुपचे शब्द खरे केले. पूर्णपणे संधी आणि कर्णधारपद मिळाल्यावर त्याचे दडपण न घेता त्याने महाराष्ट्राला राष्ट्रीय विजेतेपदापर्यंत नेले. "प्रो'मुळे नावारूपाला आलेल्या रिषांकचा यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील खेळ त्याच्यातील परिपक्वतेची ओळख करून देणारा होता.

राष्ट्रीय स्पर्धेत रेल्वे, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि सेनादल या माजी विजेत्यांविरुद्ध महाराष्ट्राने विजय मिळविला त्यात रिषांकचा मोलाचा वाटा आहे. विजय आपलाच होणार आहे, या विश्‍वासाने खेळले तर यश लाभतेच यावर त्याचा ठाम विश्‍वास.

प्रो कबड्डीत एका सामन्यात वैयक्तिक 28 गुणांचा विक्रम करणाऱ्या रिषांकची धास्ती नसणार, तर कोणाची? तो संघात आहे म्हटल्यावरच प्रतिस्पर्धी सावध राहिले; पण त्याने आक्रमणाला प्रतिआक्रमण करून महाराष्ट्राचे नाणे खणखणीत वाजवले. त्याच्या कामगिरीने राष्ट्रीय कबड्डी संघनिवडीच्या वेळी महाराष्ट्र खेळाडूंना दूर ठेवण्याची परंपरा संपेल अशी अपेक्षा आहे.

 

Web Title: marathi news article editorial pune edition dhyeyasathi damsas