माध्यम उद्योग : उत्तुंग झेप... उत्तुंग आव्हाने !

डॉ. केशव साठये
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

माध्यम क्षेत्रात असंख्य संधी आहेत, तशीच उत्तुंग आव्हानेही आहेत. या क्षेत्राला सरकारचे भक्कम पाठबळ लाभले आणि उद्योगांनी पुढाकार घेतला तर त्यातून अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळू शकेल. 

"जो माध्यमांवर ताबा मिळवतो तो मनावरही अधिराज्य करतो,' जिम मॉरिसन या 
कलाकाराच्या या विधानाची आजच्या माध्यम पर्यावरणात हमखास आठवण येते. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणं हा माध्यमविश्वाच्या यशाच्या घोडदौडीचा केंद्रबिंदू आहे, हेच तो या मार्मिक निरीक्षणातून सूचित करू इच्छितो आणि या मनाचा थांग लावणं हेच एक महत्त्वपूर्ण आव्हान माध्यमक्षेत्रापुढं आहे. भारतासारख्या बहुविध संस्कृती आणि पार्श्वभूमी असलेल्या मानवसमूहात तर ते अधिक जिकिरीचे आणि गुंतागुंतीचं आहे. पाव शतक हा माणसाच्या इतिहासात फार मोठा काळ नव्हे. पण हीच रजतवर्षे जागतिकीकरणाच्या घोड्यावर स्वार झालेली असली आणि तंत्रज्ञानामुळे उंचावलेल्या जीवनमानाचं त्याला मखर असलं की किती भरजरी होऊन जातात पाहा. आपल्या देशात सुरू झालेल्या पहिल्यावहिल्या "सन टीव्ही' या खासगी तमीळ वाहिनीला परवाच्याच एप्रिलमध्ये 25 वर्षे पूर्ण झाली. आज 1600च्या वर वाहिन्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत. गेल्या दहा वर्षांत टीव्हीबरोबर एकूणच माध्यम क्षेत्र इतक्‍या झपाट्यानं वाढलं आहे, की त्या वेगाशी स्पर्धा करताना आपली उद्योग म्हणूनही दमछाक होत आहे. अर्थात ही वाढ उत्साहवर्धक आहेच आणि नोकरी-व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यास उत्सुकही आहे. भारतीय उद्योग महासंघ आणि "बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप' यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या सर्वेक्षणात याचे पडसाद पाहायला मिळतात.
आज आपल्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राची उलाढाल एक लाख 35 हजार कोटी रुपयांची आहे. या क्षेत्रातील मनुष्यबळही लक्षणीय असून, दहा लाख व्यक्ती यात कार्यरत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात माध्यम क्षेत्राचा हिस्सा 2.8 टक्के इतका आहे. येत्या वर्षात हा उद्योग बारा टक्‍क्‍यांनी वाढेल असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या पाच वर्षांत या संस्थांनी माध्यम क्षेत्राच्या वाढीविषयीचे व्यक्त केलेले अंदाज बऱ्याच प्रमाणात वास्तवदर्शी ठरल्यामुळे याचे महत्त्व अधिक आहे. 
टेलिव्हिजन, वृत्तपत्र, जाहिरात, रेडिओ, जाहिरात, जनसंपर्क नवमाध्यम, गेमिंग, ऍनिमेशन या क्षेत्रात आशयनिर्मिती, विक्री, विपणन, वित्त, लेखा, मनुष्यबळ, संशोधन, व्यवसाय नीती आणि व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि वितरण या क्षेत्रात तरुणाईला उत्तम संधी आहे. या क्षेत्राचं वैशिष्ट्य हे की इथे एक नोकरीची संधी निर्माण झाली की संबंधित क्षेत्रातील तीन -चार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतो. येत्या पाच वर्षांत सात-आठ लाख अधिक मनुष्यबळ या उद्योगाला लागणार आहे. 
शिवाय या संधी केवळ नोकऱ्यांपुरत्या मर्यादित नाहीत, तर स्वतंत्र व्यवसाय करू इच्छिणारे, आपल्या सर्जनशीलतेतून आणि तंत्रज्ञानाचा आवाका लक्षात घेऊन या क्षेत्रातील "स्टार्ट अप' उद्योगातही भरपूर वाव आहे. वेब सीरिअल आणि "यू ट्यूब'च्या माध्यमातून अनेक माध्यमकर्मी आज यशस्वीपणे अर्थार्जन करताना दिसत आहेत. 
आज भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला जात आहे. येथील चित्रपट प्रशिक्षण संस्था अधिक सक्षम केल्या तर मोठ्या प्रमाणात भारतीय चित्रपट जागतिक बाजारपेठ काबीज केल्याशिवाय राहणार नाहीत. ऍनिमेशन, स्पेशल इफेक्‍ट्‌स आणि गेमिंग उद्योगात अनेक भारतीय तरुण अमेरिकी स्टुडिओसाठी उत्तम काम करताना पाहायला मिळतात. सरकारचे पाठबळ लाभले आणि भारतीय उद्योगविश्वाने पुढाकार घेतला तर या क्षेत्रात मोठी परकी गुंतवणूक होणे फारसे अवघड नाही. 
हे सर्व करण्यासाठी सखोल आणि सर्वव्यापी असे माध्यम शिक्षण धोरण अग्रक्रमाने आखावे लागेल. राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर विद्यापीठांची स्थापना किंवा "आयआयटी'च्या धर्तीवर माध्यम आशय आणि तंत्रज्ञान या संबंधी संस्था निर्माण करत येतील. अर्थात त्यासाठी लागणाऱ्या साधन व्यक्ती आणि माध्यमाची व्याप्ती आणि प्रेक्षकांची, वाचकांची मागणी याचे भान असेलेले प्रशिक्षक तयार करावे लागतील. त्यांच्यात या माध्यमांच्या बदलत्या पर्यावरणाची जाण निर्माण करावी लागेल. यासाठी खरं म्हणजे या विषयांसाठी स्वतंत्र विद्यापीठाचा विचार सरकारने करावा इतका या क्षेत्राचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. यामुळे अभ्यासक्रमात सुसूत्रता तर येईलच, शिवाय माध्यमाला जसे ग्लॅमर आहे तसे माध्यम शिक्षणालाही येईल. पण हे देण्यासाठी महाविद्यालयांनी कंबर कसायला हवी. आपल्या भावी माध्यमकर्मींना जागतिक स्तरावर स्पर्धेत उतरता येईल अशी अनुभवसमृद्ध ज्ञानप्रणाली विकसित करावी लागेल. लाखो लोकांपर्यंत ही माध्यमे पोचत असली तरी प्रेक्षक म्हणून विचार करताना छोट्या- छोट्या गटांच्या आवडीनिवडी आणि अपेक्षांचे प्रतिबिंब आशयनिर्मितीत करू 
शकणारा सर्वसमावेशक, सर्वव्यापी कौशल्यधारक मनुष्यबळाची निर्मिती ही अतिशय 
आव्हानात्मक जबाबदारी शिक्षण संस्थांना उचलावी लागणार आहे. साधन, व्यक्तींची वानवा आणि एकूणच विद्यार्थी घडवताना तो कसा आणि किती तयार झाला पाहिजे याविषयी धोरणकर्त्यांकडेच पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे अपेक्षित कौशल्यधारक व्यक्ती माध्यमांना मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आर्थिक गणिते संभाळण्यासाठी अकुशल व्यक्तींना नेमून "चलता है' ही बेफिकीर वृत्ती बळावत चाललेली आहे. आज रिमोट वापरताना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आशयसंपन्न कार्यक्रमाच्या शेजारच्या वाहिनीचे बटण दाबले की तिथे असलेला आपला भारतीय माध्यम अवतार अधिक उघडा पडतो. ही परिस्थिती बदलायची असेल तर माध्यम उद्योगातील संधीचा हा महामार्ग भारतीय तरुण-तरुणींना खुला करून देण्याची हीच वेळ आहे. लोकशाहीचा कणा असलेले प्रसारमाध्यम हे उद्योगविश्व आपल्याला पायघड्या घालत आहे. त्यावर सक्षम होऊन वाटचाल केली, तर आपल्या अर्थव्यवस्थेसाठीही ते एक आश्वासक पाऊल ठरेल. 
 

Web Title: Marathi news editorial page bhashya