विरोधकांच्या ऐक्‍याचे नारे (अग्रलेख)

Marathi News Editorial page BJP congress Elections Results
Marathi News Editorial page BJP congress Elections Results

गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असले, तरी याच निकालांनी आत्मविश्‍वास दिला तो कॉंग्रेस, तसेच अन्य विरोधी पक्षांना. देशाच्या राजकारणात मोदी यांच्या नेतृत्वाखालील अश्‍वमेधाचा घोडा वेगाने दौडत असतानाही, विरोधकांसाठीचा राजकीय अवकाश शिल्लक आहे, याचे भान विरोधकांना आले. या पार्श्‍वभूमीवर मग विरोधकांच्या संभाव्य एकजुटीचे नारे दुमदुमू लागले नसते, तरच नवल! पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टिप्पणी या संदर्भात महत्त्वाची असून, "2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम गुजरातने करून दाखवले आहे!' असे उद्‌गार त्यांनी काढले आहेत. ममतादीदी यांच्यापाठोपाठ राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांचे नेतेही त्यामुळेच विरोधी ऐक्‍याचे नारे एकजुटीने देऊ लागले आहेत आणि त्यांत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, तसेच नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलातून फारकत घेऊन बाहेर पडलेले शरद यादव अशा काही नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार तर कॉंग्रेसबरोबर हातमिळवणीची शक्‍यताच सूचित करून मोकळे झाले आहेत. त्यामुळे गुजरातच्या जनतेने एका अर्थाने कॉंग्रेसला संजीवनी देऊन विरोधकांच्या आशा-आकांक्षांना खतपाणी घालण्याचे काम केलेले असताना, प्रत्यक्षात अशी एकजूट होऊ शकते काय, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. 

गुजरातच्या मतदारांनी कॉंग्रेस आणि विशेषत: राहुल गांधी यांना हा असा प्रतिसाद दिला नसता, तर विरोधकांच्या आशा-आकाक्षांना हे असे धुमारे फुटले असते, की त्यांच्यापैकी काहींनी थेट भाजपच्या तंबूत शिरणे पसंत केले असते, हा प्रश्‍न तूर्तास बाजूला ठेवूनच आता राजकारणाच्या या बदलत्या वाऱ्याची दिशा समजून घ्यावी लागेल. अजित पवार कॉंग्रेसबरोबरच्या हातमिळवणीची शक्‍यता सूचित करत असताना, त्याच पक्षाचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक पाऊल पुढे टाकले असून, गुजरातमध्ये याच निवडणुकीत अशी आघाडी झाली असती, तर भाजपचा पराभव अटळ होता, असे उद्‌गार काढले. प्रत्यक्षात हेच पटेल याच निवडणुकीत कॉंग्रेसला मदत न करता, गुजरातमधील आपल्या 70-72 उमेदवारांचा प्रचार करण्यात दंग होते. अखिलेश यादव हे त्यांच्या तुलनेने वास्तवाचे अधिक भान असलेले नेते दिसतात; कारण त्यांनी उत्तर प्रदेशातील आपल्या पारंपरिक विरोधक आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याशीही जुळवून घ्यायची तयारी दशर्वली आहे. अर्थात, त्याचे कारण म्हणजे अवघ्या सहाच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत राहुल यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतरही पदरी आलेला पराभव हा मायावतींमुळे तेथील लढत तिरंगी झाल्यामुळेच, हे आता त्यांच्या लक्षात आले आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनीही अशा आघाडीस अनुकूलता दर्शवली आहे. या पार्श्‍वभूमीवर मायावती तसेच लालूप्रसाद यादव यांचे मौन हे बोलके आहे. या दोन्ही नेत्यांनी गुजरातचे निकाल तसेच विरोधकांच्या संभाव्य ऐक्‍य याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मायावती यांनी तर गुजरातच्या बहुसंख्य मतदारसंघांत आपले उमेदवारच उभे केले होते. गुजरातमधील किमान 16 मतदारसंघांत 200 ते 2000 हजार इतक्‍या थोड्या फरकाने निकाल लागले आणि ढोलका, फतेपुरा अशा काही जागा केवळ बसपा आणि राष्ट्रवादी यांनी घेतलेल्या मतांमुळे कॉंग्रेसला गमवाव्या लागल्या. त्यामुळेच हे विरोधी ऐक्‍याचे वाजू लागलेले तुणतुणे केवळ मनोरंजनापुरतेच तर नाही ना, असा प्रश्‍न पडू शकतो. 

या पार्श्‍वभूमीवर भाजपविरोधात विरोधकांची मजबूत फळी उभी करावयाचीच असेल, तर ते काम दस्तुरखुद्द राहुल गांधी यांनाच करावे लागणार आहे. सोनिया गांधी यांनी 2004 मध्ये स्वत: शरद पवार यांच्या घरी जाऊन; तसेच लालूप्रसाद यादव आदी प्रादेशिक स्तरावरील अनेक नेत्यांना एकत्र आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतूनच "संयुक्‍त पुरोगामी आघाडी'ची मोट बांधली गेली होती. त्यातूनच अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी अशा बलदंड नेत्यांच्या "शायनिंग इंडिया' प्रतिमेचे पितळ उघडे पडले आणि "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या सरकारची गच्छंती झाली होती. म्हणजेच दोन पावले पुढे टाकून समन्वय साधणे हे अशा वेळी नेतृत्वापुढचे आव्हान असते. केवळ सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांना मतदारच खड्यासारखे बाजूला ठेवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच किमान कार्यक्रम हाती घेत पुढे जाणे, सौदेबाजीपेक्षा ध्येयाधारित वाटचालीला महत्त्व देणे, या मार्गानेच ऐक्‍याला काही अर्थ प्राप्त होईल. राजकीय अवकाशात विरोधकांना जागा आहे, ही जाणीव विरोधकांना करून देण्याचे काम गुजरातच्या जनतेने केले आहे. अर्थात, तो अवकाश व्यापायचा असेल, तर सर्वच विरोधकांना आपला "अहं' दूर ठेवून एकत्र यावे लागेल. अन्यथा, विरोधकांचे ऐक्‍य हे केवळ मृगजळ तर ठरेलच; शिवाय सत्ताही गुजरातप्रमाणेच हुलकावणी देऊन भाजपच्याच पारड्यात पडेल, हे सर्वांनीच ध्यानात घेतलेले बरे! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com