रानभूल (पहाटपावलं) 

Marathi News Editorial page Positive Article Sheshrao Mohite
Marathi News Editorial page Positive Article Sheshrao Mohite

खेड्यातून पहिल्यांदाच शहरात आलेल्या कुणालाही ते लखलख तेजाचं दर्शन चक्रावून टाकणारं असतं. आपलं खेड्यातलं जगणं आणि इथलं शहरातलं जगणं यांची पावलोपावली तुलना करीत राहण्याचा मनात सपाटाच सुरू होतो. प्रत्येक बाबतीत आपल्या भोवतालची माणसं कुठंच कमी नाहीत, तरीही त्यांच्या वाट्यास हे वैभव का येत नाही म्हणून मन व्यथित होतं. असं का? कुणी असं तर म्हणू शकत नाही की ते त्यांचं विधिलिखितच आहे. त्या क्षणिकच का होईना झालेल्या, आपणापेक्षा सुखी जीवनाच्या दर्शनाने झालेली घालमेल विलक्षण असते. तेव्हाच्या आपल्या मनातील सुखी, संपन्न जीवनाच्या सगळ्या संकल्पना धूसरच असतात. पण आला दिवस कसाबसा ढकलत प्राणांतिक कष्ट करूनही कफल्लक जगायचं? की हाच कष्टांचा वारसा घेऊन त्या लखलखत्या जादुई जगात प्रवेश करायचा? याचं द्वंद्व मनात सुरू होतं अन्‌ लक्षात येतं. अरे! आजवर त्या जगात प्रवेश करायची संधीच कुठे होती? आपल्या सभोवतालच्या काळोखाचीच माणसाला कधीकधी इतकी सवय होऊन जाते, की तोच काळोख जिवाभावाचा वाटू लागतो. उजेडाच्या साध्या कल्पनेनंही अस्वस्थ व्हायला लागतं. मग त्या काळोखाचीच सुक्तं रचून ते गात राहण्यात माणसं धन्यता मानायला लागतात. 

हा काळोख भेदून बाहेर पडण्याचा प्रयत्न आजवर कुणी केलेला नसतोच असंही नाही; पण ते खेड्यातून शहरात गेले की जणू काय त्यांना रानभूलच होते. आपण आलो कुठून, चाललो कुठं, इथं आलो कशासाठी, या सर्वांचाच विसर पडतो. खरंतर आपण म्हशीमागे रानोमाळ भटकायचं सोडून, वेळेवर शाळा गाठायच्या धाकापोटी, वाहत्या ओढ्यात धोका पत्करून पाय ठेवतो अन्‌ शाळेच्या वाटेतला ओढा ओलांडतो; तेव्हाच आपण एका नव्या जगात प्रवेश करतो. मग ज्या प्रेरणेपायी आपण त्या खळाळत्या ओढ्यात उतरतो, त्याच लाटा आपणास पुन्हा पुन्हा त्या नव्या जगात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त करतात. 
जीवनाच्या कलहात टिकून राहण्यासाठी केवळ पैसा कधीच उपयोगी पडत नाही. वाचनात आलेली काही अनमोल पुस्तकं, एकेक शब्द, एकेक वाक्‍य, एखादाच प्रसंग जगण्याला उभारी देऊन जातो. राम गणेश गडकरींच्या नाटकातील एक-एक शब्द म्हणजे जसा लखलखत्या मोत्यासारखा वेचून घेता येईल असा. एखाद्या कवीच्या कवितेतली ओळ... दिवेलागणीच्या वेळी रस्त्याकडेच्या रेडिओवरून सहज कानावर पडणारं भावविव्हल करणारं मुबारक बेगमचं गाणे, एखादा भारून टाकणारा आवाज... 

खरं म्हणजे आपण आपलं खेड्यातलं अबोध मन घेऊन शहरात येतो, आधुनिक जगाच्या संपर्कात येतो, तेव्हा या सर्वच बाबी, ज्या आपलं जगणं सुसह्य आणि संपन्न करणाऱ्या आहेत, त्यांचा आपण अविभाज्य भाग होऊन जातो. मी अजूनही जेव्हा परभणीला जातो आणि तिथल्या स्टेडियमच्या बाजूचा रस्ता ओलांडतो, तेव्हा तेव्हा कधीकाळी त्या स्टेडियमवर गर्जून गेलेला पंडित भीमसेन जोशींचा तो "ठ्ठाऽऽल विठ्ठऽऽल, देवऽऽ विठ्ठलऽऽ' आवाज कानात घुमतो अन्‌ क्षणभर भोवतालच्या जगाचं भान हरपतं. माणसानं शहरात यावं, इथं राहावं, या इथल्या जगण्याचा अविभाज्य भागही होऊन जावं; पण इथल्या महानगरी भुतावळीत शिरून रानभूल आपल्या वाट्यास येऊ नये. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com