दुराव्याची भिंत! (अग्रलेख)

Family of Kulbhushan Jadhav
Family of Kulbhushan Jadhav

हेरगिरीच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची, त्यांच्या आई व पत्नी यांची भेट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने मुहूर्त तर मोठा नामी शोधून काढला होता. कायदेआझम मोहंमद अली जीना यांच्या स्मृतिदिनी ही बहुचर्चित भेट झाली खरी; पण त्या भेटीचा जो काही गाजावाजा पाकिस्तानने केला, त्यामुळे त्या देशाचा कुटिल हेतूच उघड झाला. केवळ मानवतेच्या भावनेतून या भेटीस आपण परवानगी देत असल्याचा आव पाकिस्तानने आणला होता. मात्र, प्रत्यक्ष भेटीत कुलभूषण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये काचेची भिंत उभी करण्यात आली आणि त्यांचे संभाषण झाले तेही टेलिफोनच्या माध्यमातून! जाधव यांच्या मातोश्रींना ना त्यांना मायेने जवळ घेता आले; ना त्यांना आपल्या पत्नीशी हितगूज करता आले. तसेच जाधव कुटुंबीयांना मराठीतून बोलू देण्यात आले नाही, हेही स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या भेटीची छायाचित्रे आणि बातमी ज्या नियोजनबद्ध पद्धतीने प्रसारमाध्यमांना पुरविली गेली, ते पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावर या भेटीचे भांडवल करण्याचा पाकिस्तानचा हेतू होता, हीच बाब अधोरेखित झाली.

तसेच भेटीनंतर पाक सरकारचे आभार मानणारा जो व्हीडिओ प्रसृत करण्यात आला, तो नेमका केव्हा चित्रित करण्यात आला होता, याबाबतही शंका घेतली जात आहे.

मृत्युदंडाची शिक्षा झाल्यानंतर जाधव यांची आपल्या कुटुंबीयांशी ही पहिलीच भेट होती. प्रत्यक्षात ही भेट ज्या प्रकारे पाकिस्तानने घडवून आणली, त्यामुळे या भेटीतून भारताच्या पदरात नेमके काय पडले, हा आता चर्चेचा विषय बनला असून, पाकिस्तानने या निमित्ताने जगभरात आपली तथाकथित मानवतावादी प्रतिमा उजळ करून घेण्यासाठीच हा डाव रचला होता, असे म्हणता येते. 

मुळात कुलभूषण जाधव यांना पकडण्यात आल्यावर पाकिस्तानने त्यांच्या विरोधात लष्करी न्यायालयात ज्या पद्धतीने आणि त्यांना भारताकडून कोणतीही मदत मिळू न देता खटला चालवला, तेव्हाच पाकिस्तानचे सारे डावपेच उघड झाले होते. या खटल्यात जाधव यांना वकिलांचे साह्य देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने प्रथम केला; मात्र भारताने त्याचा इन्कार केल्यानंतर पाकिस्तानला घूमजाव करणे भाग पडले होते. आता या भेटीनंतर पाकिस्तानने जाधव यांना 'कॉन्सुलर ऍक्‍सेस' दिला होता की नाही, या प्रश्‍नावरून वादाचे मोहोळ उठले असून त्यातूनही पाकिस्तानची दुटप्पी वृत्तीच प्रकाशात आली आहे. या भेटीच्या वेळी भारताचे पाकिस्तानातील वरिष्ठ राजनैतिक मुत्सद्दी जे. पी. सिंग जरूर उपस्थित होते. मात्र, त्यांना ना जाधव यांच्याशी संभाषण करता आले; ना कुटुंबीयांशी झालेले त्यांचे संभाषण ऐकता आले! याचा अर्थ त्यांची तेथील उपस्थिती ही केवळ भेटीचे दृश्‍य बघण्यापुरतीच होती.

या भेटीच्या एक दिवस आधी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत भारताला 'कॉन्सुलर ऍक्‍सेस' दिल्याचा दावा केला होता. हा दावा किती फसवा होता, ते प्रत्यक्षात जे काही घडले त्यावरून दिसून आले. शिवाय, असिफ यांच्या मंत्रालयानेही त्यांचा दावा खोडून काढल्यामुळे तर असिफ आणि पाकिस्तानचे पितळ उघड पडले. एकंदरीतच कमालीचे शत्रुत्व मनात ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या तथाकथित मानवतेचे प्रदर्शन घडवण्यासाठीच हा उपचार पार पाडला गेला, असे दिसते. 

अर्थात, या भेटीनंतरही भारताने 'कॉन्सुलर ऍक्‍सेस'चा आपला दावा सोडलेला नाही आणि त्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. जाधव यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेस हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना, या खटल्यातील पुढील सुनावणीच्या वेळी काही कच्चे दुवे निर्माण होऊ नयेत, म्हणून पाकिस्तानने हा डाव अशा पद्धतीने रचला होता, असे आता दिसू लागले आहे. जाधव हे पाकिस्तानविरोधी कारवाया करत असताना, त्यांना पकडण्यात आले, हा पाकिस्तानचा दावा भारताने सातत्याने खोडून काढला आहे. त्यामुळेच पाकिस्तानला या भेटीचे नाटक करावे लागले, असे स्पष्ट होत असून, प्रत्यक्षात या भेटीचे सोयीस्कर भांडवल करण्यापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न होऊ नये यासाठी पाकिस्तानने कमालीची दक्षता घेतली होती.

खरे तर ही भेट अशीच म्हणजे काचेची भिंत उभी करून होईल आणि संभाषणही टेलिफोनच्या माध्यमातूनच होईल, असे आपण भारत सरकारला कळविले होते आणि भारताने त्या अटी मान्य केल्या होत्या, असा दावा आता पाकिस्तान करत आहे. तसे असेल तर पाकिस्तानने रचलेल्या सापळ्यात भारत सापडला, असे म्हणावे लागेल. एकंदरीत जाधव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये उभारलेली काचेची भिंत ही या दोन शेजारी देशांमधील संबंधांकडे पाकिस्तान कशा शत्रुत्वाच्या भावनेने बघत आहे, त्याचाच प्रत्यय आणून देणारी ठरली. अशा भिंती पाकिस्तान उभारत राहील, तोपावेतो त्या देशाबरोबरील दुरावा कायम राहील, हाच या भेटीचा बोध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com