दहशतवादाचा बदलता चेहरा 

निखिल श्रावगे
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

स्पेनमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दहशतवादाच्या बदललेल्या स्वरूपाबाबतच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. दहशतवादाची बदललेली व्याख्या लक्षात घेऊनच अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी उपाय करावे लागतील. 
 

इराकमधील मोसुल शहर 'इसिस'च्या ताब्यातून घेतल्यानंतर आता 'इसिस'ची स्वयंघोषित राजधानी असलेल्या सीरियातील रक्का शहराला वेढा पडला आहे. 'इसिस'च्या ताब्यातील प्रदेश झपाट्याने कमी होत असताना, आता थेट बालेकिल्ल्यात होणारी पीछेहाट या दहशतवादी संघटनेचे मनोबल कमी करत आहे. मोसुल आणि रक्का शहरात मरण पावलेल्या आणि जिवंत असलेल्या नागरिकांची, सैनिकांची, तसेच दहशतवाद्यांची निश्‍चित संख्या समजलेली नाही. मात्र, दोन्ही शहरांतील विस्थापितांचा आकडा काही लाखांवर आहे. या विस्थापितांबरोबरच दहशतवादी युरोपमध्ये जाऊन तेथील तरुणांना हाताशी धरून 'स्लिपर सेल'ची ताकद वाढवत असल्याचे दिसते. त्यात 'इसिस'ची 'खिलाफत' स्थापन करू पाहणाऱ्या अरबेतर, परदेशी युवकांची-युवतींची संख्या जास्त आहे. कमी पैशांत आणि कमी साधनसामग्रीच्या आधारे हल्ले करण्याची सूचना 'इसिस'च्या अबू मोहंमद अल-अदनानीने केली होती. 2016 मध्ये अलेप्पोत त्याचा काटा काढल्यानंतरही त्याच्या विचारांच्या आधारे आजही हल्ले केले जात आहेत. युरोपमधील ताज्या हल्ल्यांनी हेच अधोरेखित केले आहे. 

अस्थिर सीरियातील पेच सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. आपल्या हत्यारबंद विरोधकांना पुरून उरत सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांनी रशिया, इराण आणि 'हेजबोल्लाह' यांच्या मदतीने आपली सत्ता राखली आहे. अमेरिका, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान या विरोधकांच्या पाठीशी होते. गेल्या महिन्यात ट्रम्प प्रशासनाने असद विरोधकांना रसद पुरवण्याचा कार्यक्रम गुंडाळण्याचे ठरवले. असे करून त्यांनी असद विरोधकांची हवाच काढून टाकली आहे. हे करत असतानाच, ट्रम्प प्रशासनाचा असद यांच्याप्रती मावळत असलेला विरोध हा सीरियाच्या प्रश्नाबाबत रशियासाठी अनुकूल आहे. या सगळ्या गोंधळात सीरियातील 'अल-कायदा' जोर धरू पाहत आहे. गेल्या महिन्यात सीरियात 'अल-कायदा'चे प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या 'हयात तहरीर अल-शम' या दहशतवादी गटाने आपला विरोधी गट 'अहरार अल-शम'चा पराभव केला. 'हयात तहरीर'चा वायव्य सीरियातील इदलीब प्रांतावर मोठा प्रभाव आहे. 'हयात तहरीर' हा पाच छोट्या दहशतवादी गटांची मोट बांधलेला गट आहे. 'हयात तहरीर'चे म्होरके 'अल-कायदा'शी असलेले आपले नाते उघडपणे मान्य करत नसले, तरी या गटाची विचारधारा 'अल-कायदा'कडे झुकणारी आहे. 'जब्हत अल-नुस्रा' गुंडाळून स्थापन केलेली 'जब्हत फतेह अल-शम' आणि त्यानंतर स्थापित झालेली 'हयात तहरीर' असा 'अल-कायदा'चा सीरियातील प्रवास आहे. 'हयात तहरीर'चा म्होरक्‍या अबू मोहंमद अल-जोलानी हादेखील पूर्वाश्रमीचा 'अल-कायदा'शी संबंधित आहे. 'इसिस'च्या अतिहिंसक कृत्यांच्या तुलनेत आपली कार्यपद्धत मवाळ असल्याचे दर्शवण्यात 'अल-कायदा' यशस्वी ठरली आहे. धीम्या गतीने, संयम राखत, स्थानिक गटांना आपल्या कवेत घेत पसरवलेली विचारसरणी ही 'अल-कायदा'ची कार्यपद्धत आहे. सीरिया आणि इराकमध्ये 'इसिस'चा बोलबाला आणि 'इसिस'शी युद्ध सुरू असताना, 'अल-कायदा'चे म्होरके आपले जाळे विणत होते असे दिसते. ओसामा बिन लादेननंतर हा दहशतवादी गट संपला असे म्हणणे चुकीचे ठरेल, इतका प्रभाव आणि ताकद 'अल-कायदा' आजही राखून आहे. सीरियात सुरू असलेल्या गोंधळात बेमालूमपणे या गटाने कात टाकली आहे. सातत्याने विकसित होणे हा या संघटनेची कार्यपद्धती आहे. 'इसिस' हा 'अल-कायदा'तून फुटून स्थापन झालेला दहशतवादी गट आहे. मात्र, या गटाशी फारकत घेत, 'अल-कायदा'ने 'इसिस'च्या कृत्यांचे कधीच समर्थन केले नाही. 'अल-कायदा'चा म्होरक्‍या अयमान अल-जवाहिरी आणि 'इसिस'चा अबू बकर अल-बगदादी यांच्यातून विस्तव जात नसल्याचे जाणकार सांगतात. मोसुल आणि रक्का ही 'इसिस'च्या दृष्टीने दोन मोठी आणि महत्त्वाची शहरे आहेत. या शहरांसाठीची लढाई सुरू असतानाही अल-बगदादी मौन राखून आहे. तो मारला गेल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गेले दीड वर्षे त्याची सगळीकडे असलेली अनुपस्थिती, खासकरून मोसुल आणि रक्कामध्ये 'इसिस'चे दहशतवादी लढत असताना त्यांना स्फुरण चढेल, असा कुठलाही संदेश त्याने न दिल्याने 'इसिस'मध्ये मरगळ आल्याचे आता बंदिवासात असलेले 'इसिस'चे दहशतवादी कबूल करतात. वरिष्ठांकडून कुठलाच कार्यक्रम न मिळाल्यामुळे उरलेले 'इसिस'चे तरुण आता इतर गटांबरोबर चूल मांडू शकतात. ओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा बिन लादेन आता 'अल-कायदा'चे काम पाहू लागला असताना, आपला वैरी असलेल्या 'इसिस' किंवा अल-बगदादीबद्दल त्याने अवाक्षरही काढलेले नाही. त्याचा हा चाणाक्षपणा 'इसिस'च्या उरलेल्या दहशतवाद्यांना 'अल-कायदा'चे दार त्यांच्यासाठी किलकिले असल्याचा संदेश देतो. व्यापक भरती, संयम आणि योग्य वेळी विरोधी गटांबरोबरील स्पर्धा कमी केल्यामुळे 'अल-कायदा' स्वतःचे पुनरुज्जीवन करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. सीरियाबरोबरच येमेन, सोमालिया आणि पश्‍चिम आफ्रिकेत 'अल-कायदा'ला मोठे समर्थन आहे. गटातटांमध्ये 'अल-कायदा'च्या विचारांचा वाढता प्रभाव आणि 'जिहाद'ची हाळी ही काही चांगली चिन्हे नाहीत. 

नवनवीन क्‍लृप्त्या आणि दहशतवादाच्या परिमाणाचे सर्व आडाखे मोडून नवे रूप धारण करणाऱ्या सांप्रत काळातील दहशतवादाला चाप लावणे त्यामुळेच तितकेसे सोपे नाही. राजकीय स्वार्थासाठी कित्येक दशक दहशतवाद पोसत ठेवणे, हे दहशतवादाचा पडद्यामागून अथवा थेट पुरस्कार करणाऱ्या घटकांच्या आणि देशांच्या अनेकदा अंगाशी आले आहे. झपाट्याने बदलणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत दहशतवादही वेगाने कात टाकत असताना अशा विचारसरणीला पाठिंबा देणे आगामी काळात त्यांना जड जाईल. संघटित, योजनाबद्ध दहशतवादाबरोबरच आता कमी संख्याबळावर चालणारा दहशतवाद वाढीस लागतो आहे. त्याचे परिणाम पश्‍चिम आशियाबरोबरच युरोपमध्येही सर्रास दिसत आहेत. धोक्‍याच्या या घंटेकडे दुर्लक्ष करणे युरोपमधील प्रगत देशांची डोकेदुखी ठरत आहे. भविष्यात, हे जटिल वास्तव स्वीकारत आणि त्याचे भान राखत या नव्या दहशतवादी गटांशी आणि प्रामुख्याने त्यांच्या विचारसरणीशी दोन हात करावे लागतील, याचे भान सर्वांनाच ठेवावे लागेल. 

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: marathi news marathi websites Barcelona Terror Attack Spain Terror Attack