पाहुणा तुपाशी! (अग्रलेख)

Narayan_Rane
Narayan_Rane

राजकारण हा भल्या-भल्यांना समजू न शकणारा "खेळ' कसा आहे, याचे आकलन विधान परिषदेच्या निवडणुकीत साधा उमेदवारी अर्जही भरता न आल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आता झाले असणार! राणे यांनी ही आपत्ती स्वत:वर ओढवून घेतली, यात शंकाच नाही. मात्र, त्यामुळेच राज्यसभा तसेच विधान परिषद यांच्या निवडणुकांचे राजकारण आता "राजकारण' कसे राहिलेले नाही आणि त्यात "अर्थकारण'च कसे महत्त्वाचे ठरत आहे, यावरही लख्ख प्रकाश पडला आहे. ज्या भारतीय जनता पक्षाच्या नादी लागून, राणे यांनी कॉंग्रेस तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला, त्याच भाजपने अखेर त्यांनीच राजीनामा दिल्यामुळे रिक्‍त झालेल्या जागेसाठी त्यांना उमेदवारी नाकारली आहे. शिवाय, भाजपने ही उमेदवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अलीकडेच भाजपमध्ये आलेल्या प्रसाद लाड या धनाढ्य उमेदवारास दिल्यामुळे माधव भांडारी तसेच शायना एन. सी. यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांपुढेही आता केवळ टीव्ही चॅनेलवर जाऊन, आपण उमेदवारी कशी मागितलीच नव्हती, हेच पुराण लावण्यापलीकडे दुसरे काम उरलेले नाही. भांडारी पक्षाचे प्रदीर्घकाळ निष्ठावान कार्यकर्ते राहिले असून, पक्ष अडचणीत असतानाही आमदारकीसाठी दुसऱ्या पक्षाचे दरवाजे ठोठावण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. ते पक्ष कार्यालयात पडेल ते काम करत राहिले. अखेर भाजपने त्यांना महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्‍तेपद बहाल केले आणि ते त्यांनी चोखपणे सांभाळले. मात्र, विधान परिषद सदस्यत्व देण्याची वेळ येताच भाजपने त्यांना डावलले आणि लाड यांच्या गळ्यात ती माळ पडली! अर्थात, या साऱ्या "खेळा'त शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा अत्यंत महत्त्वाचा ठरला. शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळेच भाजपला राणे यांना विधान परिषदेत पाठवता आले नाही आणि भांडारी यांना रोजची शिवसेनेवरची कठोर टीकाही भोवली असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

हे जे काही घडले त्यामुळे राजकारण कसे विधिनिषेधशून्य झाले आहे, तेच पुन्हा एकदा बघावयास मिळाले. राणे काय किंवा लाड काय, हे राजकारणातील सत्तापदांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे स्पष्ट झाल्यामुळे त्यावर शिक्‍कामोर्तबच झाले. केवळ बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद असल्यामुळेच राणे हे मुख्यमंत्री म्हणून "वर्षा' बंगल्यावर आठ-दहा महिने काढू शकले. पुढे आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांना शिवसेनेत पदांसाठी बाजार होत असल्याचा "साक्षात्कार' झाला आणि त्याची जाहीर वाच्यता करून, त्यांनी शिवसेनेतून आपली हकालपट्टी ओढवून घेतली. पुढे ते कॉंग्रेसमध्ये गेले आणि लाल दिव्याची गाडी मिरवत राहिले. मात्र, तरीही "वर्षा' बंगला आपल्या नशिबात नाही, हे लक्षात येताच त्यांनी बंडाचे नाटकही एकदा करून बघितले. मात्र, कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी त्यास बधले नाहीत. त्यानंतर त्यांनी प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांवर तोंडसुख घेणे सुरूच ठेवले. 2014 मध्ये कोकणातल्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या पदरी पराभव आल्यावर त्यांना पुन्हा वांद्रे येथील एका पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, तेथील जनतेनेही त्यांना धुडकावून लावल्यावरही कॉंग्रेसने त्यांना विधान परिषदेतील आमदारकी बहाल केली होती. तरीही त्यांचे समाधान झाले नाही आणि भाजपने टाकलेल्या गळास वश होऊन, त्यांनी "स्वाभिमानी' पक्षाची स्थापना केली आणि ते मंत्रीपदाची आर्जवे करत राहिले. आता तूर्तास तरी त्यावर पडदा पडला आहे. लाड यांची गोष्टही वेगळी नाही. ते राष्ट्रवादीचे आमदार होते आणि त्या पक्षातील उच्चपदस्थांच्या विश्‍वासास पात्र ठरले होते. मात्र, 2014 मध्ये ते पराभूत झाले आणि थेट मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या गोटात जाऊन बसले. मध्यंतरी विधान परिषदेच्याच एका निवडणुकीत भाजप पाठीशी असूनही ते पराभूत झाले होते. आता अखेर त्यांचे घोडे गंगेत न्हायले आहे! 

अर्थात, भाजपने अलिकडे पक्षांतरांचा जो काही खेळ चालवला आहे, तो त्यांच्या वाल्याचा वाल्मिकी बनवण्याच्या शुद्धिकरण मंत्रास साजेसास झाला! या आधीही भाजपने नाना आरोपांचे किटाळ पदरी असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवीण दरेकर यांना आमदारकी बहाल केली होतीच. शिवाय, विधानसभा निवडणुकीच्या वेळीच भाजपने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना पावन करून घेतले होते. त्यामुळे एवढेच झाले, की भाजप हा अन्य पक्षांपेक्षा वेगळा नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आता शिवसेना "आमच्यामुळे राणे यांची आमदारकी टळली' अशा गमजा मारत असली, तरी शिवसेनेनेही अनेक निष्ठावान शिवसैनिकांवर अन्याय करून चंद्रिका केनिया, मुकेश पटेल अशा अनेक बाहेरून आयात केलेल्यांना राज्यसभेत पाठवले होतेच. कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी या पक्षांमध्येही विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवाऱ्या अशाच पद्धतीने दिल्याची उदाहरणे खंडीने सापडतात. अर्थात, या "अनर्थकारणा'मुळे ज्येष्ठांच्या या सभागृहात विविध विषयांतील बिगर राजकीय तज्ज्ञांना पाठवण्याचे तत्त्व केव्हाच धुळीस मिळाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com