हा काळोख फार झाला... (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

लोकशाहीच्या गाभ्याच्या मूल्यांवरच आघात केले जात आहेत. आपल्या विरोधातील मते ऐकून घेण्याची, ती व्यक्त करण्याचा त्यांचा हक्‍क मान्य करण्याची सहिष्णुता हरवत चाललेली आहे.

समाजाला माणुसकीच्या मार्गावर नेणारे, कर्मकांड-कुप्रथांची जळमटे फेकून देण्यासाठी उद्युक्‍त करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या निर्घृण हत्यांच्या जखमा देशाच्या स्मृतिपटलावर अजूनही भळभळत असताना, त्या हत्यांचे तपास विविध टप्प्यांवर लटकलेले असताना, बंगळूरमधील ज्येष्ठ पत्रकार-संपादक गौरी लंकेश यांची त्या तिघांसारखीच अगदी जवळून गोळ्या झाडून मंगळवारी सायंकाळी निर्घृण हत्या झाली. आधीच्या वेदनांची ठसठस कायम असताना घडलेल्या या निंदनीय घटनेने पाठीच्या मणक्‍यातून भीतीची व संतापाची एक सणक सरसरत गेली असेल, तर आश्‍चर्य नाही.

देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर जगभरातून गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध होतोय. ही लोकशाहीची, प्रजासत्ताकाने भारतीय नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्‍कांची हत्या असल्याच्या प्रतिक्रिया उमटताहेत. हे खरेही आहे. कारण, लोकशाहीत प्रत्येक नागरिकाच्या जीविताचा हक्‍क मूलभूत आहे. मग ती व्यक्‍ती कोणत्याही विचारधारेची असो. तिचा सर्वशक्तिमान सत्ताधाऱ्यांच्या विचारधारेला विरोध की पाठिंबा असो; तिचा मते मांडण्याचा अधिकार, लेखन-भाषणस्वातंत्र्य अबाधित राखणे ही व्यवस्थेची, देशाची व समाजाची जबाबदारी असते. विशेष करून भारतीय राज्यघटना माणसाच्या जगण्याला विज्ञानवादाचे, चिकित्सेचे, प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधण्याचे अधिष्ठान मान्य करते. तेव्हा, गौरी लंकेश किंवा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारखे कोणी तसे करीत असेल तर त्यांची अभिव्यक्‍ती बंदुकीच्या गोळ्यांनी खोडून काढणे हा फॅसिझम ठरतो.

गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जाताहेत. देशातल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील त्यांची प्रखर भूमिका, विचारांनी त्यांचे डावीकडे झुकलेले असणे, पश्‍चिम घाटातल्या माओवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या करीत असलेले प्रयत्न, मालमत्तेवरून भावासोबतचा वाद आदी बाबी चर्चेत आहेत. पण, हिंदू मूलतत्त्ववादाविरोधात, धर्माच्या अकारण अवडंबराविरोधात, फॅसिझमविरोधात त्यांनी उघडलेली आघाडी या मुद्द्याची चर्चा प्रामुख्याने होत आहे आणि आधीच्या तीन हत्यांशी असलेले साम्य पाहता ते स्वाभाविकही आहे. एकूणच आता जबाबदारी पोलिसांची आहे आणि या हल्लेखोरांचा, त्यांच्या हेतूंचा आणि त्यामागील सूत्रधारांचा छडा लवकरात लवकर लावण्यासाठी त्यांनी कसून प्रयत्न करायला हवेत. याआधीच्या हत्यांच्या तपासाबाबत अशी तत्परता दिसली नाही, ही चिंतेची बाब आहे. 

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कारणांपलीकडे काही गंभीर प्रश्‍न समोर येतात. समाजात निर्माण झालेली दुभंगलेली अवस्था सामाजिक स्वास्थ्याचा विचार करता अधिक चिंताजनक आहे. गौरी लंकेश यांच्या विचारधारेबद्दल ममत्व असलेल्यांनी पोलिसांच्या निष्कर्षाची वाट न पाहता थेट उजव्या मंडळींवर ठपका ठेवणे काय किंवा राष्ट्रवादाचा उन्माद चढलेल्या मंडळींनी त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना देशद्रोही, धर्मद्रोही ठरवून हत्येबद्दल आनंद व्यक्‍त करणे काय, दोन्ही निंदनीय. दोन्ही फळ्या बेभान झाल्याचे हे निदर्शक आहे. हत्येची पार्श्‍वभूमी व गुन्ह्याचा प्रकार दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येशी मिळतीजुळता असल्याने त्या रांगेत गौरी लंकेश यांना बसविणे एकवेळ समजू शकतो. तथापि, धर्मनिष्ठेचा व देशप्रेमाचा बुरखा चढवलेल्यांकडून हत्येचा आसुरी आनंद जाहीरपणे व्यक्‍त करण्याचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. जे असे करताहेत ते अप्रत्यक्षरीत्या त्यांचीच विषारी, हिंसामूलक विचारधारा हत्येमागे असल्याचे सिद्ध करीत आहेत. वैचारिक मतभेदामुळे निर्माण झालेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर हिंसा, हत्या असू शकत नाही, याचा विसर आपल्याला पडला आहे. अप्रत्यक्षरीत्या अशा हत्यांचे समर्थन करणे, अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी त्यांना मृत्यू आल्याची संतापजनक भाकडकथा जोडणे आणि चारित्र्यहननाचे उपद्‌व्याप करणे, हे सारे निव्वळ किळसवाणे आहे. 

एकापाठोपाठ एक अशा हत्यांची ही मालिका, तिच्यावरील प्रतिक्रियांमुळे अत्यंत दूषित असे वातावरण देशभर तयार झाले आहे. इतके की माणसांच्या, समाजाच्या नसानसांमध्ये रक्‍त नव्हे तर द्वेष वाहतोय की काय, असा प्रश्‍न पडावा. विरोधी मते ऐकून घेण्याची, विरोधकांचा तो हक्‍क मान्य करण्याची सहिष्णुताच जणू संपुष्टात आली आहे. त्याचप्रमाणे ही चिन्हे आपण वैचारिक अराजकतेच्या उंबरठ्यावर किंवा वैचारिक अंधाराच्या एका गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर उभे असल्याचीदेखील आहेत. या अंधाराचे व त्यात रममाण झुंडीचे नीतिनियम कधीच मानवीय नसतात. केवळ ध्वनीच्या अदमासाने सावज टिपण्याच्या कौशल्याची झुंडींमध्ये वाहवा होते. मग ती हाक कधी धर्माच्या, कधी संस्कृतीच्या, तर कधी देशाच्या नावावर दिलेली असते. हिंसेच्या बदल्यात हिंसा, हत्येच्या बदल्यात हत्या, अवयवाच्या बदल्यात अववय व रक्‍तपाताला रक्‍तपाताने उत्तर, ही मध्ययुगीन मानसिकता हा अंधार जोपासतो. गौरी लंकेश यांच्या हत्येने हा अंधार अधिक गडद बनला आहे. त्यांच्या हत्येचा तीव्र निषेध नोंदवितानाच एकविसाव्या शतकातला देशाचा, समाजाचा हा उलटा प्रवास शक्‍य तितक्‍या लवकर थांबविणे, माणुसकीचा प्रकाश पेरण्यासाठी एकत्र येणे, ही आजची सर्वांत मोठी गरज आहे.

Web Title: marathi news marathi websites Gauri Lankesh Murder Sakal Editorial