सर्व काही गुजरातकेंद्रित! (अनंत बागाईतकर)

सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पराभूत होण्याची अजिबात शक्‍यता नसतानाही त्या पक्षाच्या नेतृत्वाने ही निवडणूक कमालीच्या प्रतिष्ठेची केली आहे आणि ती जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. हे कशाचे लक्षण आहे?

गुजरात विधानसभा निवडणूक ही एका राज्याची विधानसभा निवडणूक राहिलेली नाही. तिला राष्ट्रीय परिमाण प्राप्त झाले आहे. देशातील दोन सर्वोच्च नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे किंवा या दोघांनी ती पणाला लावलेली आहे. गुजरातची निवडणूक हरणे म्हणजे देश गमावण्यासारखे आहे, असेच चित्र निर्माण झाले आहे. पूर्वीच्या कोणत्याही पंतप्रधानांनी स्वतःच्या "गृहराज्या'ची निवडणूक एवढी प्रतिष्ठेची केलेली नव्हती. सत्ताधारी पक्ष गुजरातमध्ये पराभूत होण्याची सुतराम शक्‍यता नसतानाही या दोन नेत्यांच्या जिवाची घालमेल का? गुजरातमध्ये आजही सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप हा सुस्थितीतला पक्ष आहे. पक्षाकडे प्रभावी संघटनात्मक यंत्रणा आहे. अनुकूल प्रशासन यंत्रणा आहे. देशाचे सर्वशक्तिमान प्रधानसेवक ऊर्फ पंतप्रधान आणि त्यांच्या खालोखाल सामर्थ्यवान असलेले भाजप अध्यक्ष हे दोघेही गुजरातचेच. केंद्रीय पातळीवरील सर्व मोक्‍याच्या जागांवर गुजरातचे अधिकारी आहेत. एवढी अनुकूल परिस्थिती असल्यानेच सामर्थ्यवान भाजप अध्यक्षांनी गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 पैकी 150 जागा जिंकण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यांचा हा आत्मविश्‍वास वाजवी मानायला हरकत नाही. याखेरीज सर्व चलाख्या- युक्‍त्या असफल ठरल्या, तर "कळ-कमळ' युक्ती वापरली जाईल, असे काहींचे म्हणणे आहे. 

विजयासाठी या दोन नेत्यांनी रणनीती आखलेली आहे. साधारणपणे तिची तीन- चार प्रमुख सूत्रे आहेत. सर्वप्रथम गुजराती अस्मिता! त्यानंतर प्रमुख किंवा गुजरातमधील एकमेव प्रतिस्पर्धी विरोधी पक्ष काँग्रेसतर्फे पूर्वीच्या "खाम' म्हणजेच क्षत्रिय, हरिजन, आदिवासी व मुस्लिम या सामाजिक समीकरणाचे पुनरुज्जीवन; तसेच काँग्रेसचे मुस्लिमप्रेम इ. इ. आता या मुद्द्यांचे तपशील! 

सर्वसाधारणपणे सत्ताधारी पक्षातर्फे असे भासवले जात आहे, की भाजपतर्फे विकास व प्रगतीच्या मुद्द्यांवर मते मागितली जात आहेत. परंतु, काँग्रेस मात्र जातीपातींचे राजकारण करीत आहे आणि विशिष्ट जातींना एकत्र करून भाजपला सामाजिक आघाडीवर शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. या मुद्द्याच्या समर्थनासाठी काँग्रेसच्या "खाम' समीकरणाच्या पुनरुज्जीवनाचा दाखला ते देतात. एकेकाळी गुजरातमध्ये काँग्रेसचे एकछत्री राज्य होते. माधवसिंह सोळंकी (क्षत्रिय) हे तालेवार नेते मुख्यमंत्री होते. त्यांनी ताकदवान अशा पटेल (पाटीदार) समाजाला वगळून "क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लिम' या चार समाजांना एकत्रित आणून प्रभावी सामाजिक-राजकीय समीकरण तयार केले होते. यातून पटेल समाजाला सत्तेपासून वंचित व्हावे लागले. जो 14 ते 16 टक्के समाज आहे आणि अशा ताकदवान समूहाला बाजूला काढले जाते, तेव्हा त्याची प्रतिक्रिया अटळ असते. ज्या गुजरातमध्ये भाजपचे अस्तित्व नव्हते, त्या भाजपने व भाजपच्या पितृसंस्थेने पटेल समाजाशी जवळीक केली. केशूभाई पटेल यांच्यासारखे नेते त्यांना मिळाले आणि बघता बघता भाजपने गुजरातेत सत्ता काबीज केली. भाजपने हा मुद्दा चतुराईने निवडला आहे. "खाम' समीकरणाचे कर्तेकरविते माधवसिंह सोळंकी यांचे पुत्र भरतसिंह सध्या प्रदेश काँग्रेसाध्यक्ष आहेत. त्यांनी अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी यांच्यासारख्या मागास व दलित नेत्यांना काँग्रेसबरोबर घेतले आहे. थोडक्‍यात, काँग्रेसला अनुकूल होत असलेल्या पटेल समाजाला "खाम'चा बागुलबुवा दाखवून रोखण्याचा प्रयत्न भाजपतर्फे सुरू आहे. त्यासाठी हा "खाम'चा पत्ता खेळला जात आहे. पटेल समाज काँग्रेसपासून दुरावण्याचा राजकीय लाभ भाजपला मिळू शकेल. 

गुजराती अस्मिता हा भाजपच्या भात्यातला दुसरा प्रमुख बाण. प्रधानसेवकांनी गुजरात निवडणुकीला एवढे महत्त्व दिले आहे, की त्यांच्या किमान 50-60 जाहीर सभा, अनेक "रोड शो', परिषदा वगैरे भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत. प्रचारात ते गुजरातीमधून भाषणे करणार आहेत. पक्षाध्यक्षांनी तर तेथे तंबूच ठोकला आहे. अलीकडे प्रधानसेवक आणि गुजरातमधील एक छोटासा दुकानदार यांच्या फोन संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर फिरत आहे. जाणीवपूर्वक "लिक' करण्यात आलेल्या या फितीत त्यात भावपूर्ण अशा संभाषणात प्रधानसेवक त्यांचे आणि गुजरातचे अतूट नाते, गुजरात दंगल, त्यामुळे त्यांना झालेल्या मानसिक यातना, त्याआधारे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली जिव्हारी लागणारी टीका वगैरे वगैरे हृदयद्रावक संभाषण आहे. अलीकडेच गुजरातवर सवलतींचा वर्षाव करण्यासाठी झालेल्या प्रधानसेवकांच्या दौऱ्यातही त्यांनी गुजराती अस्मितेला गोंजारण्याचा प्रकार केलेला होता आणि ते मुख्यमंत्री असताना केंद्रातील काँग्रेस सरकारने गुजरातची कशी कोंडी केली होती, याच्या कहाण्या सांगितल्या होत्या. गुजरातमुळेच ते देशाचे प्रधानसेवक कसे झाले हेही त्यांनी आळवून आळवून सांगितले. 

समजा, हे बाण निरुपयोगी ठरले, तर जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाचे ब्रह्मास्त्रही सुसज्ज करण्यात आले आहे. काँग्रेस हा कसा मुस्लिमधार्जिणा पक्ष आहे आणि काँग्रेसला विजय मिळाला तर पुन्हा महंमद, याकूब, इस्माईल यांचे राज्य कसे येईल, असा प्रचारही पक्षाच्या प्रभावी प्रचार यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आला आहे. पक्षाध्यक्षांनी तर एका मुलाखतीत सांगितले, की देशाची सुरक्षितता हादेखील प्रमुख मुद्दा या निवडणुकीत असेल आणि काँग्रेसतर्फे रोहिंग्या मुस्लिमांना कसे संरक्षण दिले जात आहे, हे जनतेला सांगण्यात येईल. त्यांच्या निवेदनाचा आशय असा होता, की काँग्रेस हा मुस्लिमांचा अनुनय करणारा पक्ष आहे. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी रात्री साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन "आयएसआयएस'च्या एका हस्तकाला पकडण्यात आल्याचे सांगून काँग्रेसचे नेते व सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याशी तो संबंधित आहे, असा आरोप केला. पकडलेली व्यक्ती वैद्यकीय व्यवसायाशी निगडित आहे. भडोच येथील ज्या अत्याधुनिक रुग्णालयाच्या संचालक मंडळावर अहमद पटेल होते, त्या रुग्णालयात हा पकडलेला माणूस कामाला होता आणि त्यामुळे अहमद पटेल यांनी खुलासा करावा व राज्यसभेचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. अहमद पटेल यांनी भाजपच्या- नव्हे, पक्षाध्यक्षांच्या सर्व कारवायांना पुरून उरून राज्यसभेची जागा जिंकल्याने चवताळलेल्या भाजपने त्यांचा पाठपुरावा चालविला आहे. त्यातून हे हास्यास्पद प्रकरण समोर आणले आहे. अहमद पटेल यांनी तत्काळ याप्रकरणी "एसआयटी'ची नियुक्ती करून तपास करावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली. थोडक्‍यात, भाजपने असा हा तिहेरी हल्ला करण्याचे ठरविले आहे. ही लक्षणे आत्मविश्‍वासाची आहेत की आणखी कसली?

Web Title: marathi news marathi websites Gujrat Elections BJP Narendra Modi Amit Shah Congress Anant Bagaitkar