ऐका आणि थंड बसा! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणातून शिवसैनिकांना काही नवीन ऐकायला मिळेल, ही अपेक्षा फोल ठरली. सत्तेत राहून विरोधी अवकाश व्यापण्याची जुनीच खेळी ते चालू ठेवणार असे दिसते; पण यातून पक्षाची प्रतिमा उंचावेल का, हा प्रश्‍न आहे. 

विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे सातत्याने होणाऱ्या दोन राजकीय मेळाव्यांकडे केवळ मराठी माणसाचेच नव्हे, तर अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असते. एक मेळावा महाराष्ट्राच्या राजधानीत होतो, तर दुसरा उपराजधानीत. शिवसेना तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या या दोन मेळाव्यांबरोबरच यंदा हाच मुहूर्त साधून आणखीही काही राजकीय हालचाली होतील, असे बोलले जात होते; मात्र मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत साऱ्यांचेच लक्ष शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या मेळाव्याकडे लागले होते.

उद्धव ठाकरे या मेळाव्यात भाजपशी असलेल्या आपल्या 'हृद्य' नात्याचा काही फैसला या मेळाव्यात करतील आणि देवेंद्र फडणवीस सरकार अडचणीत आणतील, अशी हवा या मेळाव्यापूर्वी चांगलीच तापवण्यात आली होती. 'भूकंप होईल!' वगैरे गर्जनाही उद्धव यांच्या शिलेदारांनी केल्या होत्या. प्रत्यक्षात उद्धव यांचे भाषण ऐकून बाळासाहेब ठाकरे यांच्या 1960च्या दशकात 'मार्मिक'मधून प्रसिद्ध होणाऱ्या 'वाचा आणि थंड बसा!' या उपरोधिक स्तंभाचेच शिवसैनिकांना स्मरण झाले असेल! तेव्हा बाळासाहेब मुंबईतील विविध आस्थापनांमध्ये कसे अमराठी लोक भरले आहेत, त्यांच्या याद्या या शीर्षकाखाली प्रसिद्ध करत. आता उद्धव यांचे भाषण वाचण्याऐवजी टीव्हीवरून ऐकले जात असल्यामुळे ते शीर्षक 'ऐका आणि थंड बसा!' असे करावे लागेल एवढेच.

खरे तर गेल्या काही दिवसांत शेतकरी कर्जमाफी असो की पेट्रोल-डिझेलची रोजच्या रोज होणारी दरवाढ असो, की मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा ऑनलाइन घोळ असो, शिवसेनेने थेट रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे या दसरा मेळाव्यात 'सत्तेवर लाथ मारण्याची' थेट घोषणा होईल, या अपेक्षेपोटी शिवसैनिकांनी चांगली गर्दी केली होती. प्रत्यक्षात घडले ते भलतेच! सत्ता सोडण्याची बात तर सोडाच; उलट आम्ही सत्तेत राहूनच सरकारविरोधात आंदोलने करणार आहोत, असे शिवसैनिकांना ऐकावे लागले आणि त्यामुळे 'ऐका आणि थंड बसा!' हेच ते शिलंगणाचे विचारांचे सोने, असे म्हणत शिवसैनिक निमूटपणे घरोघरी आणि गावोगावी परतले. 
खरे तर यंदाचा हा दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी म्हणजे गेल्याच वर्षी झालेल्या मेळाव्याचा थेट 'ऍक्‍शन रिप्ले'च होता! तेव्हाही उद्धव यांनी 'मला वाटेल तेव्हाच मी सत्ता सोडेन, मग त्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही!' हेच आतापावेतो घासून गुळगुळीत झालेले वाक्‍य उच्चारले होते. यंदाही त्यांनी तेच वाक्‍य,

तसाच आवेश आणत उच्चारले खरे; पण त्यातून त्यांची अगतिकताच दिसत होती. उद्धव यांना सत्ता सोडवत नाही, यावरच त्यामुळे शिक्‍कामोर्तब झाले. उद्धव यांनी स्वत:ही भाषणाच्या पूर्वार्धात चांगलाच टीपेचा सूर लावला होता. 'गाईला जपायचं आणि ताईला झोडायचं!' आणि 'इकडे सत्ता, तिकडे सत्ता; कारभार मात्र बेपत्ता!' अशी बाळासाहेबांच्या ठाकरी भाषेची आठवण करून देणारी चमकदार वाक्‍येही त्यांच्या भाषणात पेरलेली होती. त्यामुळे 'भाषणाची 'कॉपी' उत्तम होती; मात्र त्यातील ठाकरी भाषेचा आत्मा मात्र हरवला आहे,' असेच म्हणावे लागते! खरे तर या मेळाव्याच्या आदल्याच दिवशी मुंबईत एलफिन्स्टन रोड स्थानकात घडलेल्या दुर्घटनेमुळे, भाजप सरकारला कोंडीत पकडण्याची आयती संधी उद्धव यांना मिळाली होती. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्‍या 'बुलेट ट्रेन'वरून सोशल मीडियात प्रचंड संताप व्यक्‍त झाला होता; मात्र मेळाव्यास चार-सहा तास राहिले असतानाच राज ठाकरे यांनी 'बुलेट ट्रेन'चा मुद्दा उचलून थेट मोदी यांना लक्ष्य केले आणि उद्धव यांच्या भाषणातील हवा काढून घेतली. 

सत्तेतच राहायचे आणि धोरणात्मक पातळीवर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस तसेच भाजप यांना विरोध करायचा ही आपली एक धूर्त खेळी आहे, असे उद्धव आणि त्यांचे काही मोजके सल्लागार भले समजत असतीलही; मात्र गेली जवळपास तीन वर्षे एकीकडे सत्ता उपभोगतानाच हा राज्यातील विरोधी अवकाश गिळंकृत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आता हास्यास्पद ठरू पाहत आहे. फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला, तेव्हा विरोधी बाकावर बसलेली शिवसेना महिनाभरातच हाती येतील तेवढी मंत्रिपदे आणि मिळतील ती खाती घेऊन सरकारात सामील होताना शिवसेनेची अगतिकता दिसून आली होतीच. आता तीन वर्षांनंतर रस्त्यावरच्या आंदोलनांची भाषा करत सत्तेचे फायदे राखण्याच्या निर्णयामागेही तीच अगतिकता असल्याचे दिसते. 'सत्तेतून बाहेर पडण्यासाठी मी मुहूर्त बघणार नाही!' असे उद्धव यांनी गेल्या वर्षीही सांगितले होते आणि यंदाही तेच सांगण्याची पाळी त्यांनी स्वत:हून ओढवून घेतली. शिवसैनिकांना मात्र 'मुहूर्त बघणार नाही!' या वाक्‍याचा अर्थ कळून चुकला आहे आणि तो म्हणजे 'शिवसेनेच्या कुंडलीत असा योग येणे कठीणच आहे!' हा आहे. त्यामुळे पाच दशकांपूर्वी 'वाचा आणि थंड बसा' या बाळासाहेबांच्या शीर्षकामुळे पेटून उठलेल्या शिवसैनिकांना आता उद्धव यांच्या पोकळ धमक्‍या 'ऐका आणि थंड बसा!' यापलीकडे दुसरे काम शिल्लक राहिलेले नाही, हेच खरे!

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Shiv Sena Saamana PM Narendra Modi Uddhav Thackray