नितीश यांची हुकमी खेळी! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नितीशकुमार राजकारणातील स्वतःची वेगळी रेघ काढण्याचा आणि ठळक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्ताधाऱ्यांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना त्यामुळे धक्का बसला आहे. 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणीत 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी पाठिंबा दिला, तेव्हाच विरोधी पक्षांचे ऐक्‍याचे मनसुबे पाण्यात बुडाले होते. त्यानंतर आता दिवसेंदिवस या तथाकथित विरोधी ऐक्‍याची लक्‍तरे चव्हाट्यावर येऊ लागली असून, त्या तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्ट होऊ लागला आहे.

कोविंद यांना नितीशकुमार यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपच्या गोटात ऐन आषाढात दिवाळी साजरी झाली होती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे नितीशकुमार हाच विरोधकांच्या हातातील हुकमाचा एक्‍का होता. नितीशकुमार यांनी गेली चार वर्षे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घेतलेली ठाम भूमिका आणि मुख्य म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा यामुळे यदाकदाचित विरोधकांनी 2019 मध्ये भाजप आणि मोदी यांच्यापुढे काही आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्यासाठी नितीशकुमार हाच त्याचा मुख्य चेहरा असणार होता. मात्र, नितीशकुमार यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त साधून कोलांटउडी घेतली आणि त्यामुळे विरोधकांच्या तथाकथित ऐक्‍याला मोठेच भगदाड पडले.

अर्थात, नितीशकुमार हेही कच्च्या दमाचे खेळाडू नसल्यामुळे ते आपल्या हातातील सर्वच पत्ते आता उघड करायला तयार नाहीत. त्यामुळेच भाजप तसेच 'रालोआ' यांच्या विरोधात मजबूत फळी उभी करायची जबाबदारी एक मोठा पक्ष म्हणून काँग्रेसवर टाकून ते मोकळे झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी वार्ताहर परिषद घेऊन विरोधकांकडे सध्या कोणताही अजेंडा नाही, असा घरचा आहेर अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसला दिला आणि हा अजेंडा निश्‍चित करण्याची जबाबदारीही मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचीच असल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले! बिहारमधील सरकारात नितीशकुमार यांच्याबरोबरीने सामील असलेले लालूप्रसाद यादव यामुळे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. शिवाय, त्याच सरकारात सामील असलेल्या काँग्रेसच्या पायाखालील वाळूही घसरू लागल्याचे राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यावरून परतताच पुढच्या आठवड्यात बोलवलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमुळे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी नितीशकुमारांची भेट घेण्याचाही निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. एकंदरीत कोविंद यांना पाठिंबा देण्याची खेळी करून, नितीशकुमार यांनी विरोधकांचे सारे डावपेच कसे आपल्यावरच अवलंबून आहेत, तेही दाखवून दिले आहे. 

खरे तर लालूप्रसाद यादव यांच्याविरोधातील पशुखाद्य गैरव्यवहाराच्या खटल्यांना संजीवनी देण्याचा निर्णय न्यायालयाने जाहीर केला, तेव्हापासूनच नितीशकुमार वेगळा विचार करू लागलेले दिसतात. बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांनी लालूप्रसादांशी हातमिळवणी केली; पण ती आता अंगाशी तर आलेली नाही ना, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. त्यातच लालूंचे एकमेव उद्दिष्ट नितीशकुमार मंत्रिमंडळातील आपल्या दोन चिरंजीवांच्या राजकीय पायाभरणीपुरता मर्यादित आहे. शिवाय, याच दोन चिरंजीवांच्या वाढत्या कारवायांमुळे नितीशकुमार यांच्या प्रतिमेवर अनेक शिंतोडेही उडत आहेत. त्यामुळेच लालूप्रसाद तसेच काँग्रेस यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला, हे उघड आहे. मात्र, त्यांची ही खेळी केवळ दबावाच्या राजकारणापुरतीच मर्यादित आहे, की भविष्यात ते लालूप्रसाद आणि काँग्रेस यांना सोडचिठ्ठी देऊन, थेट भाजपबरोबर बिहारात सरकार बनवतील, हे आजमितीला सांगता येणे कठीण आहे. त्यांना तसे करायचेच असेल, तर विधानसभेतील समीकरणेही त्यांच्या पथ्यावरच पडणारी आहेत. एक मात्र नक्‍की!

विरोधी पक्षाच्या या राजकारणात नितीशकुमार हे स्वत:चा स्वतंत्र राजकीय अवकाश (पोलिटिकल स्पेस) निर्माण करू पाहत आहेत आणि असे त्यांनी अनेकदा केले आहे. 1994 मध्ये जनता दलातून बाहेर पडून समता पार्टीची स्थापना केली तेव्हा आणि पुढे जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या बड्या नेत्याला केवळ उमेदवारी नाकारूनच नव्हे तर निवडणुकीत पराभूत करून, त्यांनी असेच राजकीय स्थान मजबूत केले होते. आताही एकीकडे भाजप आणि 'रालोआ'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोविंद यांना पाठिंबा देताना, शिवाय काँग्रेसवर विरोधकांचा अजेंडा निश्‍चित करण्याची जबाबदारी टाकून नितीश पुन्हा एकवार तेच करू पाहत आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर आता विरोधक काय करणार, हा खरा प्रश्‍न आहे. गुजरात तसेच कर्नाटकातील विधानसभा निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत. मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीच्या मुहूर्तावर सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीस 17 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहत असतानाही नितीशकुमार यांनी त्या बैठकीस दांडी मारली होती. त्यामुळे आता लालूप्रसाद ऑगस्ट महिन्यात आयोजित करत असलेल्या विरोधकांच्या मेळाव्यास तरी नितीश उपस्थित राहणार काय, हा प्रश्‍नच आहे. 2019 मध्ये मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आल्यास निवडणूक आपण जिंकणारच, अशा गमजा लालूप्रसाद यादव मारत असताना, नितीशकुमार मात्र आपले स्वत:चे स्वतंत्र डावपेच लढून स्वत:चे महत्त्व वाढवण्याच्या खेळीत यशस्वी होताना दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पूर्णपणे निष्किय झालेल्या काँग्रेसची फरफट मात्र सुरूच राहणार, अशीच चिन्हे आहेत.

Web Title: marathi news Narendra Modi Presidential Election Ramnath Kovind Nitish Kumar BJP