आता 'विराट' ध्येय बाळगा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

युवा विश्‍वकरंडक चौथ्यांदा पटकावलेल्या भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या चढत्या आलेखाची व्याप्ती विराट करायची असेल, तर त्यासाठी चिकाटी, सातत्य ठेवतानाच अपार मेहनत घेण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. 

"पृथ्वी सेने'ने भारतीय क्रिकेटच्या वर्चस्वाचे वर्तुळ दिमाखदारपणे पूर्ण केले. "विराट सेने'ने भले दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावली असली, तरी त्यातील आपले अव्वल स्थान कायम ठेवले. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवकांनी 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक जिंकला आणि लहानांपासून ते वरिष्ठांपर्यंतच्या क्रिकेटमध्ये भारताचे अव्वल स्थान निर्विवादपणे अधोरेखित झाले. वास्तविक यात आश्‍चर्य वाटण्यासारखे नाही. कारण पाया मजबूत असेल, तर इमारत भक्कम असणारच. 2008 मध्ये विराट कोहलीने 19 वर्षांखालील स्पर्धेत विश्‍वविजेतेपद मिळविले आणि त्यानंतर यशाची मालिका सुरूच राहिली. परिपक्वतेचा हा प्रवास केवळ विराटचा नाही, तर तो भारतीय क्रिकेटचा आहे.

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मोहिमेस निघण्यापूर्वी विराट कोहलीबरोबर पृथ्वी शॉचीही पत्रकार परिषद झाली. त्यानिमित्ताने युवक संघाला वरिष्ठ संघाबरोबर वावरण्याची संधी मिळाली नि विराटकडून अनुभवाचे बोलही ऐकता आले. दुसऱ्या बाजूला "द ग्रेट इंडियन वॉल'- राहुल द्रविड यांच्याकडून मार्गदर्शन, तंत्र, मंत्र, संयम, वास्तव आणि सभ्यता असे सगळेच रसायन मिळाल्यानंतर हा संघ अजिंक्‍य ठरला नसता तरच नवल. असो, शेवटी गुणवत्ता मैदानावरच सिद्ध करावी लागते, तेव्हाच यशाची चव चाखता येते. या स्पर्धेत पृथ्वी शॉच्या संघाने दिमाखात आपला दरारा दाखवून दिला. अशी परिपूर्ण कामगिरी एका रात्रीत होत नसते, त्यासाठी सिस्टीम परिपूर्ण आवश्‍यक असते. भारतात आता शालेय क्रिकेटपासून ते मुख्य संघापर्यंतची सर्व रचना उत्तम आहे. साधारणतः शालेय-महाविद्यालयीन-युवक-प्रथम श्रेणी आणि मुख्य संघ अशी रचना असते. परंतु, आपल्या युवक संघात प्रथम श्रेणी (रणजी) क्रिकेट खेळलेले सहा- सात खेळाडू आहेत. थोडक्‍यात हा संघ पूर्ण तयारीचा होता. असाच काहीसा ढाचा ऑस्ट्रेलियाचाही आहे, म्हणूनच तोही श्रेष्ठ आहे. परंतु, अशा संघाला आपला संघ दोनदा पराभूत करतो, तेथेच आपले एकतर्फी वर्चस्व सिद्ध झालेले असते. त्यामुळेच केवळ विश्‍वविजेते झालो, म्हणून युवक संघाचे कौतुक करायचे नाही, तर प्रतिस्पर्ध्यांना लढण्याचेही बळ शिल्लक ठेवले नाही, इतका जबरदस्त खेळ या संघाने केला. 

या विजेतेपदातून एक नाही, तर अनेक रत्ने भारताला सापडली. फलंदाजीत पृथ्वी शॉ, शुभम गिल, मनज्योत कार्ला यांचीच नावे प्रामुख्याने घेता येतील. त्याचे कारण इतरांना फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. हा दोष त्यांचा नाही, तर प्रतिस्पर्ध्यांचा कमकुवतपणा त्याला कारणीभूत होता. कमलेश नागरकोटी, ईशान पॉरल आणि शिवम मावी हे वेगवान गोलंदाज म्हणजे आपल्याला मिळालेले हिरे आहेत. "भारताकडे आता चांगले वेगवान गोलंदाज आहेत, तरीही तो वेगवान गोलंदाजांचा देश अजून झालेला नाही,' असे विधान काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरने केले होते. या पार्श्‍वभूमीवर या विश्‍वकरंडक स्पर्धेत आपल्या तिन्ही गोलंदाजांनी केलेली वेगवान गोलंदाजी सर्वांना तोंडात बोटे घालायला लावणारी ठरली. 

या ऐतिहासिक विजयानंतर "पृथ्वी सेने'वर कौतुकाचा वर्षाव केला जात असताना त्यांना वास्तवाची जाणीव करून देणेही आवश्‍यक आहे. सचिन तेंडुलकरने शाबासकी देतानाच आपल्या संदेशात "ही तर सुरवात आहे. बरीच मजल मारायची आहे,' असे म्हटले ते योग्यच आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही याच वास्तवाची जाणीव करून दिली आहे. स्पर्धेदरम्यानच झालेल्या "आयपीएल' लिलावाच्या वेळी असे लिलाव दरवर्षी येतील, पण विश्‍वकरंडक एकदाच येतो, हे द्रविड यांचे बोल आणि अंतिम सामन्याअगोदर तीन दिवस मोबाईलबंदी असा "द्रविडी' अनुभव योग्य वेळी मिळणे हे या खेळाडूंचे भाग्यच म्हणायला हवे. द्रविड यांचे या विजयातील योगदान मोलाचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते मोह, पैसा, प्रसिद्धीपासून दूर राहात या तरुण खेळाडूंना पैलू पाडण्याचे काम करत आहेत. आता द्रविड यांच्या "शाळे'तून पुढच्या वर्गात गेल्यावर हे खेळाडू कशी प्रगती करतात हे अधिक महत्त्वाचे आहे. 2008 च्या स्पर्धेतील विजेता विराट कोहली दहा वर्षांनंतर आता मुख्य संघाचा आधारवड आहे. पण 2012 मधील युवक विश्‍वकरंडक विजेता कर्णधार दिल्लीचा उन्मुक्त चंद मुख्य संघात तर दूरच, पण चर्चेतही आलेला नाही. 

विराटसारखे प्रगती झालेले आणि उन्मुक्तसारखे प्रगतीचा आलेख मधेच थांबलेले तरुण विश्‍वविजेते खेळाडू बरेच आहेत. आपल्या आलेखाची व्याप्ती विराट करायची, तर त्यासाठी चिकाटी, सातत्य ठेवताना या खेळाडूंना अपार मेहनत घ्यावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या "आयपीएल'मधून पैसा-प्रसिद्धीची प्रलोभने समोर येतील, पण खरे ध्येय "भारतीय कॅप' मिळणे हेच असायला हवे, तरच 19 वर्षांखालील विश्‍वकरंडकाचे हे यश सुफळ संपूर्ण होईल.  

 
 

Web Title: Marathi News Pune Edition Editorial Virat Article