कुस्तीतील नवा किरण

ज्ञानेश भुरे
सोमवार, 5 मार्च 2018

ऑलिंपिकमधील पदकविजेती पहिली महिला कुस्तीगीर म्हणून साक्षीने कुस्तीमधील भारतीय महिलांची प्रगती दाखवून दिली, तोपर्यंत फोगट बहिणींच्या कामगिरीवर आपली प्रामुख्याने भिस्त होती. आता साक्षीच्या जोडीला पंजाबच्या नवजोत कौर हिचे नाव जोडले गेले आहे.

ऑलिंपिकमधील पदकविजेती पहिली महिला कुस्तीगीर म्हणून साक्षीने कुस्तीमधील भारतीय महिलांची प्रगती दाखवून दिली, तोपर्यंत फोगट बहिणींच्या कामगिरीवर आपली प्रामुख्याने भिस्त होती. आता साक्षीच्या जोडीला पंजाबच्या नवजोत कौर हिचे नाव जोडले गेले आहे. कुस्तीत कारकीर्द घडविणाऱ्या प्रत्येक कुस्तीगिराप्रमाणेच नवजोतची कौटुंबिक परिस्थिती आहे. घरची शेती आणि त्यात मुलांच्या खेळाचा खर्च अशा दुहेरी जबाबदारीत मुलाचे किंवा मुलीचे स्वप्न साकार करण्यासाठी पंजाबमधील कित्येक आई-वडील आपल्या सुखाचा त्याग करतात. नवजोतबाबत हेच घडले. पण इथे फक्त आई-वडील नाही, तर तिच्यासाठी बहीण नवजीत आणि क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेला भाऊ युवराजसिंग यांनीही स्वतःची स्वप्ने दूर ठेवली. 

एकाद्या कुस्तीगिरास शोभेल अशीच शरीरयष्टी लाभल्यामुळे तिच्या खालसा शाळेतील शिक्षकांनीच तिला कुस्तीची निवड करण्यास भाग पाडले. हा निर्णय त्या शेतकरी कुटुंबाला कठीण गेला. गावातील अनेकांनी मुलींना कुस्तीसारख्या मर्दानी खेळात ढकलल्याबद्दल त्या वेळी नाके मुरडली होती; पण आज घरची बेताची परिस्थिती आणि मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्याला नवजोतच्या कामगिरीने छेद दिला आहे. आपल्यासाठी सुखाचा त्याग करणाऱ्या आई-वडिलांचा भार हलका करण्यास या कामगिरीची मदत होईल, असा तिला विश्‍वास वाटतो. भारतीय महिलांनी तब्बल 13 वर्षे आशियाई सुवर्णपदाची आस बाळगली होती. प्रत्येकवेळेस भारतीय महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यात नवजोतही होती. ती 2013 मध्ये याच स्पर्धेत रौप्यपदक विजेती ठरली होती. पण आज तिने सुवर्णपदकाची कमाई केली. तिला जागतिक कुस्ती संघटनेच्या बदलत्या नियमाचाही फायदा झाला. 

अर्थात, तो फायदा करून घेण्याची क्षमता तिच्याकडे होती. सुशील कुमारच्या कामगिरीने भारतीय कुस्तीचा चेहरा बदलू लागला. प्रत्येक ऑलिंपिकमध्ये आपल्याला पदक मिळू लागले. पुढे साक्षीने हा आदर्श घालून दिला. साक्षीसमोर अजून मोठी कारकीर्द शिल्लक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या पदकाचा "रंग' बदलण्याची अपेक्षा तिच्याकडून धरली जात होती. साक्षीला अजून तरी यश आलेले नाही; पण तंदुरुस्तीच्या आघाडीवर सर्वांच्या पुढे असणाऱ्या नवजोतने पदकाचा रंग बदलून दाखविला आहे. तब्बल तेरा प्रयत्नांनंतर भारतीय महिला कुस्तीत हा रंग बदलला आहे. तिने खऱ्या अर्थाने भारतीयांना रंगोत्सवाची सोनेरी भेट दिली. 

 
 

Web Title: Marathi News Pune Editorial Pune Edition Wrestling Written by Dnyanesh Bhure