राजकीय महत्त्वाकांक्षेतून आखातात भडका

निखिल श्रावगे
गुरुवार, 15 जून 2017

सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली नऊ देशांनी कतारबरोबरील संबंध तोडल्याने आखातात तणाव निर्माण झाला आहे. अविश्वासार्ह असलेल्या अमेरिकेच्या आडून आपला शेजार असा पेटत ठेवणे या देशांच्या अंगाशी येण्याची शक्‍यता आहे.

शेजारील अरब देशांसोबत बंधुता रुजल्याचा भास आखातात नेहमीच होतो. त्याचा प्रत्यय नुकताच पुन्हा आला. कतारबरोबरील संबंध सौदी अरेबियासह नऊ देशांनी तोडले. बहारीनने कतारसोबतच्या सर्व व्यापारी, राजकीय आणि दळणवळणाच्या वाटा बंद केल्या. बहारीनचीच तळी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्तने उचलली. वरकरणी अनपेक्षित वाटणाऱ्या या निर्णयाच्या आड खोलवर रुजलेले राजकारण आहे. आखातातून सगळ्यात जास्त तेल निर्यात करणारा देश म्हणून सौदी अरेबियाचा मान मोठा आहे. तसेच सौदीत मक्का व मदिना ही महत्त्वाची श्रद्धास्थळे आहेत. सौदी हा सुन्नीपंथीय देशांचा मेरुमणी असल्याने या प्रदेशातील सुन्नीबहुल देशांनी आपल्याला अनुकूल असणारेच धोरण राबवावे असा त्या देशाचा आग्रह असतो. कतार हा सौदीच्या या अपेक्षेला अपवाद ठरला आहे. कतारचे सध्याचे राजे तमीम बिन हमद अल-तहनी हे सौदीशी फटकून वागताना दिसतात. कतारकडे द्रवरूप नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत. त्यामुळे लहान असूनही कतार श्रीमंत देश आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत अव्वल देशांच्या पंक्तीत कतारचे स्थान आहे. 2013 मध्ये गादीवर आलेले तमीम बिन हमद हे वास्तवाचे भान ठेवत कारभार हाकतात.

सुन्नीबहुल असूनही त्यांनी शियाबहुल इराणशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. हे संबंध फक्त राजकीय नसून, त्यांना अर्थकारणाची किनार आहे. सौदीला कतारच्या अशा स्वतंत्र धोरणाचा जाच वाटतो. इराणला खिंडीत गाठू पाहणाऱ्या सौदीला कतारचे इराणसोबतचे चांगले संबंध रुचत नाहीत. तीच गोष्ट संयुक्त अरब अमिरातीची. कतार हा "मुस्लिम ब्रदरहूड' संघटनेचा पाठिराखा आहे. वादग्रस्त इतिहास असलेली ही संघटना आपल्या सिंहासनाला नख लावेल अशी भीती सौदी व अमिरातीला आहे. त्यामुळेच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे कारण पुढे करत या देशांनी कतारवर बहिष्कार घातला. दैनंदिन सर्व वस्तूंची कतार आयात करतो. ते सगळे बहिष्कारामुळे थांबल्याने रमजानच्या महिन्यात कतारमध्ये अन्नधान्याची टंचाई भासत आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सौदी भेटीवर गेले असताना सौदीबरोबरील संबंधांतील दुरावा मिटविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच 50हून अधिक सुन्नी देशांची मोट बांधत इराण व दहशतवादाला आवरण्याचे आवाहन त्यांना केले. त्यांच्या भूमिकेचा सोईस्कर अर्थ लावत सौदीने आपल्या वाटेत आडव्या येणाऱ्या कतारची अडचण केली आहे. त्यात सौदीला बहारीनची मदत मिळाली. सौदीचे राजे सलमान यांच्यामार्फत मोठे निर्णय घेणारे उपयुवराज मोहंमद बिन सलमान आणि अमिरातीचे युवराज मोहंमद बिन झाएद हे विरोधकांचा काटा काढण्याच्या उद्देशाने आता एकत्र येत आहेत. पश्‍चिम आशियातील अमेरिकेचा सर्वांत मोठा लष्करी तळ कतारमध्ये आहे. तो अमिरातीत हलवण्याचा डाव बिन झाएद खेळत आहेत. या तळाचा आणि तेथील सुमारे अकरा हजार अमेरिकी सैनिकांचा विचार न करता कतारवर बहिष्कार घालून दहशतवादाला पायबंद घातला म्हणून ट्रम्प हे सौदीचे कौतुक करत आहेत. कतार हा अमेरिकेचा आखातातील जवळचा आणि विश्वासू सहकारी मानला जातो. सीरियातील "इसिस'ची स्वयंघोषित राजधानी असलेल्या रक्कावर सुरू असलेल्या हल्ल्यात अमेरिकेला याच तळाची मदत होणार आहे. ट्रम्प मात्र याचा विचार न करता कतारची अडचण वाढवू पाहत आहेत. असे करतानाच, ज्या सौदीच्या रसदीवर "इसिस'चा भस्मासुर फोफावला, त्याकडे ट्रम्प सोईस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. दोन्ही गटांना समान अंतरावर न ठेवता एकाची बाजू घेऊन ट्रम्प हे सौदीच्या हिंसक राजकीय आकांक्षांना खतपाणी घालत आहेत. कतारवरील बहिष्काराचा प्रश्न न सुटल्यास कतार व इराणचे संबंध वृद्धिंगत होण्याचा धोका ट्रम्प यांना पत्करावा लागेल. चीन आणि रशियाशीही कतारचे चांगले संबंध आहेत. कतार आर्थिकदृष्ट्या भक्कम देश असून, "सिमेन्स', "फोक्‍सवॅगन' आणि जगभरातील इतर नावाजलेल्या व्यवसायांमध्ये त्याची भरघोस गुंतवणूक आहे. ट्रम्प यांनी 50हून अधिक सुन्नीबहुल देशांच्या "अरब नाटो'ला प्रारूप देऊन एक महिनाही होत नसताना कतारसारखा आर्थिक, भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा भिडू इराणच्या गोटात गेल्यास पश्‍चिम आशियाचा राजकीय समतोल बिघडण्याचा धोका नक्कीच वाढेल.

वाढती राजकीय महत्त्वाकांक्षा हा सत्ताकारणाचा घटक आहे. निरंकुश सत्ता आणि नेतृत्वाचे वारे कानात शिरले असताना, सामरिक विचार करून धोरण राबवणे फार कमी नेत्यांना जमते. मोहंमद बिन सलमान आणि मोहंमद बिन झाएद हे आपापल्या देशांचे तरुण नेते कतारचे तरुण नेते तमीम बिन हमद यांना टक्कर देऊ पाहत आहेत. त्यांच्या या आक्रमक पवित्र्याला ट्रम्प यांच्या एकांगी दृष्टिकोनाच्या पाठिंब्याची जोड आहे. मात्र असा लंगडा पाठिंबा म्हणजे अमेरिकेकडून मिळालेला कोरा "चेक' असल्याच्या थाटात बिन सलमान आणि बिन झाएद आपले मनसुबे राबवू पाहत आहेत. अविश्वासार्ह अमेरिका आणि तितकेच बेभरवशी असलेले ट्रम्प यांच्या आडून आपला शेजार पेटत ठेवणे या दोघांच्या अंगाशी येऊ शकते. सौदी आणि संयुक्त अरब अमिराती या नावाजलेल्या देशांनी संवेदनशील पश्‍चिम आशियात सलोखा प्रस्थापित करणे अभिप्रेत आहे. आधीच तापलेल्या पश्‍चिम आशियात वैर आणि नवे संबंध सत्यात उतरवत असताना, हे दोघे बदलत्या जागतिक संदर्भांची आणि घडामोडींची जाणीव ठेवत फक्त व्यावहारिक फायदा-तोटा पाहतील अशी अपेक्षा आहे. सांप्रत काळातील मात्र त्यांचा आवेग पाहता ते असे सामंजस्य दाखवणार नाहीत, असे स्पष्टपणे दिसते.

Web Title: marathi news sakal editorial article on international dispute