पाऊसगाणं

गुरुवार, 29 जून 2017

मल्हार अरणकल्ले

कृष्णगर्द ढगांच्या दाटीनं डोक्‍यावरच्या निळ्याभोर गाभाऱ्याचं रूप क्षणाक्षणाला बदलू लागलं आहे. कधी ते स्फटिकशुभ्र दिसतं आहे. गाण्याच्या शब्दांतून हळवे-कोवळे सूर पाझरावेत, तसं कधी ते रिमझिमतं आहे. कधी भरून येतं आहे. अवखळपणाचेच डोहाळे लागावेत, तसं आवेगानं कोसळतं आहे. लपवून ठेवलेल्या टपोऱ्या थेंबांची नक्षी इथं-तिथं रेखाटतं आहे. स्वप्नांतल्या आकारांना घेऊन उघडमीट करतं आहे. एका ठिकाणी दिसता दिसता क्षणात नव्या आकारात दुसरीकडं पोचतं आहे. ढगांचे अनेक छोटे-मोठे पुंजके फेर धरताहेत. कधी दुसऱ्याच्या तळव्यांवर; तर कधी स्वतःच्याच तळव्यावर टाळी देत गिरकताहेत.

कधी हात गुंफताहेत; तर कधी ते सुटे सुटे उंचावताहेत. डोंगरांच्या उंच शिखरांशी, आकाशओढी माडांशी शिवाशिवी खेळताहेत. शिवारात ढग अचानक उतरून येताहेत. नद्यानाल्यांत तुडुंबताहेत. रस्त्यांवरच्या खड्ड्यांत भरून जाताहेत. कोवळ्या कोंभांच्या तळाशी एकजीव होताहेत. तहानलेल्या पाखरांच्या इवल्या चोचींतून हळुवार उतरताहेत. रिमझिमणं, अनावर कोसळणं, वाऱ्यावर नाचणं; आणि कधी तृषार्तांच्या कंठांत हलकेच मिसळून जाणं. पाऊसथेंबांची केवढी ही रूपं! आठवावीत तेवढी; आणि एकाहून दुसरं भिन्न असलेली...

पाऊस म्हणजे नभांचं गाणं असतं. पाऊस ढगांचं देणं असतं. पाऊस नुसतं येणं-जाणं वाटलं, तरी ते अवघ्या सृष्टीचं अस्तित्व असतं. पाऊस म्हणजे कधी कुणावर रुसणं असतं; तर कधी कुणाशी मिसळून जाणं असतं. पाऊस म्हणजे रिमझिमणं असलं, तरी ते मनाचं आत-आत भिजणं असतं. पाऊस म्हणजे कधी मनातून उदास होणं असतं. कधी खुलणं असतं. कधी अनावर होणं असतं; तर कधी संयमी होणं असतं. पाऊस म्हणजे पाखरांसारखं भिरभिरणं असतं. कधी ढगांशी जाणं असतं; तर कधी धरतीच्या कुशीत पहुडणं असतं. पाऊस म्हणजे कुणाशी सूत जुळणं असतं; तर कधी कुणाशी तुटणं असतं. पाऊस कधी कुणाला दुरून बघणं असतं. पाऊस गप्प होणं असतं; तर कधी शब्दांच्या मुसळधारांत चिंब होणं असतं. पाऊस म्हणजे कधी निरोप घेणं असतं; आणि नंतर आठवणींत चिंब, सैरभैर होणं असतं.
पाऊस म्हणजे आकाशनिळाईचे झिरझिरीत पडदे अंगावर ओढून घेणं असतं. पाऊस म्हणजे अंतर्बाह्य गाणं होऊन जाणं असतं. पाऊस म्हणजे अभंगांत रुजणं असतं; आणि शब्दांनी भक्तिमळे फुलवणं असतं. पाऊस म्हणजे रेशीमधारांनी कशिदाकाम करणं असतं. पाऊस म्हणजे इवलंसं फुलपाखरू होणं असतं; आणि रंगभार झालेले नाजूक पंख पसरून मनसोक्त लहरणं असतं. पाऊस कुणाची वाट पाहणं असतं; तर कधी सारे बंध तोडून कुणाच्या वाटे जाणं असतं. पाऊस म्हणजे गालांत जिभेचा आवळा धरून कुणावर डोळे मोठ्ठे करणं असतं; किंवा इतर कुणी पाहत नाहीसं बघून आपल्या कुणाला वेडावून दाखवणं असतं. पाऊस म्हणजे हिरवंगार होणं असतं. पाऊस म्हणजे आतून बहरणं असतं. पाऊस म्हणजे गंध उधळणं असतं. पाऊस म्हणजे आपल्याच मनाचं, ओल्या सुरांचं निखळ गाणं असतं...

Web Title: marathi news sakal editorial rain song