'जन, गण, मन'ला 'युनेस्को'चा पुरस्कार मिळाला का..?

सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

भारताचं 'जन गण मन' हे 'युनेस्को'ने जगातलं सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत म्हणून गौरवलंय', 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून निवडण्यात आलंय', 'सुरतच्या रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या या मुलीला स्वत:च नाव सांगता येत नाही, फोटो 'फॉरवर्ड' करा, तिची मातापित्याशी भेट झाली तर पुण्य लागेल', 'सावध राहा, दोन हजारांच्या नव्या नोटेत मायक्रो चिप आहे' या व अशा असंख्य पोस्ट 'व्हॉटस्‌ऍप'वर वाचल्या नाहीत, असा माणूस सापडणार नाही. खरंतर सगळ्यांना माहिती असतं की हे 'फेक' आहे; तरीही फावल्या वेळेत करत बसतात लोक 'फॉरवर्ड'चे रिकामे उद्योग.

आतापर्यंत हा रिकामटेकड्यांचा फालतूपणा म्हणून आपण ज्याकडं पाहात आलोत, तो प्रकार तितकासा फालतू राहिलेला नाही. आपल्याकडं 'व्हॉटस्‌ऍप' हे या विषारी प्रचाराचं प्रमुख माध्यम आहे, तर तिकडं अमेरिकेत गेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीवेळी रशियाशी संबंधित मंडळींनी 'फेसबुक' व 'ट्विटर'वर लाखो 'पोस्ट' पसरवल्या. निवडणुकीचा निकाल बदलला गेल्याच्या संशयावरून गंभीर चौकशी सुरू आहे. कॅलिफोर्नियाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून चिथावणी दिल्याचंही उघडकीस आलंय. 'फेक न्यूज' हा एक विषारी व्हायरस असल्याचं आता जगाला पटायला लागलंय. पोप फ्रान्सिस यांनी 13 मे 2018 चा 'वर्ल्ड कम्युनिकेशन डे' हा 'फेक न्यूज'बद्दल जनजागृतीसाठी पाळण्याचं जाहीर केलंय. महत्त्वाचं म्हणजे, 'फेक न्यूज' हा 2017 चा 'वर्ड ऑफ द इअर' ठरलाय. साडेचार अब्ज शब्दांचा संग्रह प्रकाशित करणाऱ्या स्कॉटलंडमधल्या कॉलिन्स इंग्लिश डिक्‍शनरीनं तसं परवा जाहीर केलं.

इंटरनेटवर लॉटरी लागल्याच्या ई-मेलपासून सुरू झालेला हा प्रवास आता सोशल मीडियावरच्या भस्मासुरापर्यंत येऊन पोचलाय. 'फेक न्यूज', खोट्या पोस्ट केवळ रिकामेपणाचा उद्योग नाही. त्यामागं एक पद्धतशीर षड्‌यंत्र असतं. लोकांमध्ये भ्रम तयार करणं, दिशाभूल करणं, त्या माध्यमातून राजवटी उलथवणं, हितसंबंधीयांना सत्तेवर आणणं, अर्थव्यवस्थेला नख लावणं असं बरंच काही त्या षड्‌यंत्रांमध्ये असतं, हे एव्हाना जगाला पटलंय. विशेषकरून राजकीय पक्षांनी अशा बनावट संदेशांद्वारे विरोधकांचं चारित्र्यहनन, सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या प्रक्षोभक पोस्टचा रतीब घालणारे 'कारखाने'च उघडल्याचं भारतातलं चित्र आहे. विडंबन किंवा उपरोधाची, खोटी माहिती देणारी किंवा खोटा संबंध जोडणारी, भाबड्या लोकांना प्रक्षोभक माहिती, दृश्‍य, व्हिडिओ, 'फोटोशॉप' केलेली चित्रं पाठवण्यानं केवळ दिशाभूल किंवा मनःस्ताप होतो असं नाही. निधनाच्या खोट्या बातम्यांमुळं कोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागतं, हे ज्यांच्यावर बेतलं तेच सांगू शकतील.

पूर्वी जातीय व धार्मिक दंगली स्थानिक कारणांवरून व्हायच्या. आता सोशल मीडियावरच्या 'पोस्ट'मुळं त्या पेटतात. मुलं पळवणारी टोळी आल्याच्या अशा अफवांमुळं निरपराधांचे जीव गेल्याच्या घटना ताज्या आहेत. बंगळूरमध्ये हत्या झालेल्या गौरी लंकेश यांचा त्यांच्या पत्रिकेतला शेवटचा अग्रलेख 'फेक न्यूज'वर होता. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या, अफवा वगैरेचं वास्तव शोधणं व ते वाचकांपुढं ठेवण, हा देशभरात विस्तारू पाहणारा नवा व्यवसाय बनलाय. 'बूम', 'अल्टन्यूज' वगैरे वेबसाइट तेच काम करतात. टीव्ही चॅनलवरही 'रिऍलिटी चेक' नावानं अशा 'पोस्ट'चं खरंखोटेपण दाखवणारे कार्यक्रम जोरात आहेत. जसं कॉम्प्युटरचा 'मालवेअर' किंवा 'व्हायरस'पासून बचाव करणं हे नवं आव्हान, पर्यायानं व्यवसायही बनलाय, तसाच हा सोशल मीडियावरच्या खोट्या 'पोस्ट'चा प्रकार आहे. 'गुगल' व 'फेसबुक' कसलीतरी चाळणी लावण्याचा विचार करतंय; पण ते किती प्रभावी ठरेल सांगणं शक्‍य नाही.

इटालियन शाळांमध्ये खऱ्याच्या आग्रहाचा प्रयोग
जगभरात 'फेक न्यूज'नं धुमाकूळ घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर, इटली सरकारनं 31 ऑक्‍टोबरपासून नवं पाऊल उचललंय. देशातल्या आठ हजारांहून अधिक शाळांमध्ये नेहमीच्या अभ्यासक्रमाशिवाय विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरच्या खोटेपणाबाबत जागरूक बनवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. पूर्वाश्रमीच्या पत्रकार व संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्ष लॉरा बोल्ड्रिनी यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. इंटरनेट व सोशल मीडियाच्या माध्यमातून स्मार्टफोन किंवा संगणकाच्या पडद्यावर खोटी माहिती जाणीवपूर्वक पाठवलेली असू शकते. तेव्हा कोणताही मजकूर, छायाचित्र खरेपणाची खातरजमा झाल्याशिवाय शेअर करायचं नाही. त्याचा स्रोत, पुरावा संबंधिताकडे मागायचा, ही सवय विद्यार्थिदशेतच नागरिकांमध्ये रुजवण्याच्या या प्रयत्नाचं जगभर कौतुक होतंय.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shrimant mane writes on social media fake messages