...न लग जा गले! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

"डोकलामचा विषय कालायचा नाही, असं ठललं होतं...'' जिनपिंग गंभीरपणाने म्हणाले. गुजराथी डोकला आणि डोकलाम ह्यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, हे आम्ही त्यांना स्पष्ट करून सांगितले. 

अत्यंत उदात्त आणि कृतार्थ भावना मनात घर करून राहिली आहे. इतिहासाने आमच्यावर टाकलेली एक फार्फार मोठी जबाबदारी आम्ही पार पाडू शकलो ह्याचे विलक्षण समाधान वाटते आहे. नुकतेच आम्ही चीनहून परत आलो आहो! चीनहून हा काही कुठला प्रांत नव्हे. सुरवातीच्या काळी आम्हास चीनहून हा शब्दच मांडारिन वाटत असे. 

पण जेव्हा आम्ही ही भाषा आत्मसात केली, तेव्हा आमचा गैरसमज दूर झाला. नुकत्याच पार पडलेल्या चिनी दौऱ्यात चिनी राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग आणि श्रीश्री नमोजी ह्यांच्यामधील भाषिक दुवा बनण्याची ऐतिहासिक कामगिरी आम्ही पार पाडली. ह्या ऐतिहासिक भेटीत चिमुकल्या कपांतून चहापान झाले. 

नौकेवरती भोजनाचा स्वादही चाखला गेला. ह्या भेटीतील संवाद मात्र प्रसिद्ध झाले नाहीत. ते आम्ही मराठीत भाषांतर करून येथे देत आहो... 

स्थळ : वुहान. (हे एका चिनी गावाचे चिनी नाव आहे. भोजपुरीशी ह्याचा काहीही संबंध नाही.) 
वेळ : चहाची...म्हंजे कुठलीही! 
श्रीश्री नमोजी ह्यांचे (गडद जाकिट आणि कुर्त्यातील) राजबिंडे व्यक्‍तिमत्त्व ताड ताड चालत येत असताना पाहून चिनी राष्ट्रप्रमुखांनी नकळत अंग चोरले. 
""...हे ग्लुहस्थ आम्हाला आता मिठी मालनार काय?,'' शी जिनपिंग ह्यांनी "शी:!'असे म्हणताना करतात, तसा चेहरा करुन आम्हाला विचारले. 

""नाही...चिनी लोकांना अंगचटीला जाणे अजिबात आवडत नाही. पाच फूट दूर उभे राहून कमरेत वाकून नमस्कार करण्याची तिथे पद्धत असल्याचे नमोजींना सांगण्यात आले आहे...,'' आम्ही घाईघाईने खुलासा केला. ह्या संदर्भात आम्ही स्वत: नमोजींना ट्रेनिंग दिले होते. आमच्या कपाळावरील चौदा टेंगळे त्याला साक्षी आहेत. आमच्या खुलाशामुळे शी जिनपिंग ह्यांचा जीव (चिनी) भांड्यात पडला. असो. 

"नी हाव...'' शी जिनपिंग म्हणाले. यापुढे आम्ही त्यांचा उल्लेख श्री. जिनपिंग असा करू. शी हे त्यांचे नाव आहे, ह्याचे आम्हाला वाईट वाटते. तरी बरे चिनी भाषेत शी हे पुरुषी नाव आहे. शी ह्यांचे नाव ऐकून शेक्‍सपिअरनेही "नावात काय आहे?' हा भंपक सवाल केला नसता. असो. 

"केम छो?..,'' गदागदा हस्तांदोलन करून श्रीश्री नमोजींनी (श्री) जिनपिंग ह्यांचे त्यांच्याच देशात स्वागत केले. बाहेरदेशी गेल्यावर यजमानाला संकोच वाटेल असे करू नये! मागल्या खेपेला अमेरिकेत...जाऊ दे. भेटीदाखल आणलेले पुडके काढून नमोजींनी श्री. जिनपिंग ह्यांच्या हातात दिले. म्हणाले, ""आ लो, तमारी माटे लाव्या...ढोकला!'' 

"डोकलामचा विषय कालायचा नाही, असं ठललं होतं...'' जिनपिंग गंभीरपणाने म्हणाले. गुजराथी डोकला आणि डोकलाम ह्यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, हे आम्ही त्यांना स्पष्ट करून सांगितले. 

वुहानच्या रम्य बागेत हिंडून फिरून झाल्यावर नमोजी ह्यांनी "चाय पे चर्चा' करण्याचा प्रस्ताव मांडला. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच बागेत एका झाडाखाली दोन-तीन चिनी कन्या भातुकली खेळत बसल्या होत्या. त्यांनी भातुकलीच्या कपबशीत चहा ओतून दोघांनाही पिण्यास दिला. चिमुकल्यांनी खोटा खोटा चहा दिल्यावर "व्वा, झक्‍क बरं का ताई' असे म्हणायची आपली पद्धत असते.

परंतु, श्रीनमोजी ह्यांनी "मीही लहानपणी चहा विकत असे' अशी सुरवात करून पुढचा आख्खा दिवस "चहा विकणे : एक किफायतशीर राजकारण' ह्या विषयावर परिसंवाद रंगवला. पुन्हा असो. उभय नेत्यांनी निरोप घेतला तेव्हा श्री. जिनपिंग थकलेले दिसले. निरोपाचे हस्तांदोलन करताना ते चिनी भाषेत म्हणाले, "मिठी न मालल्याबद्दल आभाल!'' 

...जिनपिंग ह्यांच्या शेवटच्या वाक्‍याचे भाषांतर आम्ही विमानात बसून उड्डाण केल्यावर नमोजींना सांगितले. त्यावर तळहातावर मूठ आपटून हळहळत ते म्हणाले, ""शी:!!'' 

-ब्रिटिश नंदी
 

Web Title: Marathi Pune Edition Editorial Ding Tang Article