एक बंगला बने न्यारा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सामान्य माणसाची ससेहोलपट सुरू असतानाच, भाजपचे कर्नाटकातील नेते जनार्दन रेड्डी यांनी कन्येचा विवाह उधळपट्टी करून साजरा केला. त्यापाठोपाठ शेजारच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ऊर्फ ‘केसीआर’ यांच्या ५० कोटींच्या बंगल्याने वादळ उठवले आहे. हैदराबादेतील बेगमपेठ या उच्चभ्रूंच्या वस्तीत वाय. एस.

हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सामान्य माणसाची ससेहोलपट सुरू असतानाच, भाजपचे कर्नाटकातील नेते जनार्दन रेड्डी यांनी कन्येचा विवाह उधळपट्टी करून साजरा केला. त्यापाठोपाठ शेजारच्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ऊर्फ ‘केसीआर’ यांच्या ५० कोटींच्या बंगल्याने वादळ उठवले आहे. हैदराबादेतील बेगमपेठ या उच्चभ्रूंच्या वस्तीत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दोन बंगल्यांचे संकुल मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून जाहीर केले होते; मात्र ते राहण्यास वा कामकाजासअपुरे पडतात, असे कारण देऊन ‘केसीआर’ यांनी तेथे आणखी काही आलिशान आणि दिमाखदार वास्तू उभारल्या. या उधळपट्टीमुळे हैदराबाद, तसेच तेलंगणात संतापाची लाट उसळली आहे.

स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी प्रदीर्घ काळ झालेल्या आंदोलनाच्या काळात कार्यकर्त्यांच्या व्यथा-वेदना आणि हाल-अपेष्टा यांचे प्रत्यक्ष दर्शन ‘केसीआर’ यांना घडले होते; मात्र सत्ता मिळताच त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्यांनी वास्तुशास्त्राचा आधार घेत, ही उधळपट्टी केली. याच काळात पाच कोटींची बुलेटप्रूफ टोयोटा लॅंड क्रुझर ही आलिशान गाडीही जनतेच्याच पैशांनी खरेदी केली. या न्याऱ्या बंगल्याच्या खिडकीच्या काचा बुलेटप्रूफ आहेतच; शिवाय ‘केसीआर’ यांनी स्वच्छतागृहासही बुलेटप्रूफ काचा बसवून घेतल्या आहेत. सात एकरांच्या विस्तीर्ण परिसरातील या बंगल्यांच्या संकुलात सुमारे २०० गाड्यांच्या पार्किंगचीही व्यवस्था, तसेच आलिशान सभागृहही आहे; मात्र नोटाबंदीच्या निर्णयानंतर या वास्तू-संकुलावर होणारी टीका लक्षात घेऊन ‘गृहप्रवेशा’चा सोहळा साधेपणाने झाला. ‘केसीआर’ यांचे चिरंजीव रामाराव हे खरे तर त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत; पण त्यांच्याबरोबरच अन्य काही मंत्र्यांनी या गृहप्रवेश सोहळ्यावर बहिष्कार टाकला!  खरे तर ही उधळपट्टी रोखण्याचे काम त्यांनी पूर्वीच करायला हवे होते. ‘केसीआर’ यांच्या मनात सचिवालयाची इमारत पाडून तेथे १०० कोटींची नवी वास्तूही उभारण्याचे होते. सुदैवाने उच्च न्यायालयाने तूर्तास त्यास चाप लावला आहे. जनतेच्या पैशांच्या उधळपट्टीचे हे देशभरातील प्रयोग काळ्या पैशांच्या विरोधात प्रचंड गाजावाजा करणारे केंद्र सरकार कायमचे थांबवेल का?

Web Title: marm article