मर्म: "किलो'चे नवे मापन

मर्म: "किलो'चे नवे मापन

काळाच्या ओघात काही गोष्टी हद्दपार करणे गरजेचे ठरते...एक किलोग्रॅम हे वजन मोजण्यासाठी जगभरात आतापर्यंत वापरात असलेली मापनपद्धती आता बदलण्यात येणार आहे.

फ्रान्समधील व्हर्सेलस येथे वजन आणि मापांवर आधारित एका संमेलनात 50पेक्षा अधिक देशांनी एकत्र येऊन बदलाचा हा निर्णय घेतला. सध्या वापरात असलेले एक किलोग्रॅमचे माप 1889मध्ये प्लॅटिनम आणि इरिडियमच्या मिश्रधातूच्या मदतीने बनविण्यात आले होते. त्याचे नाव होते "ली ग्रॅण्ड के'. या वजनाच्या आधारे जगभरातील वजने प्रमाणित केली जात होती. मात्र, काचेच्या तीन बरण्यांच्या आतमध्ये ठेवलेले असूनही, वातावरणातील बदल, धूळ आणि सफाईमुळे या वजनामध्ये फरक पडत होता. हा फरक आजच्या नॅनोटेक्‍नोलॉजी, औषधनिर्मिती व आधुनिक इंजिनिअरिंगच्या जमान्यात जास्त असल्याने वजन मोजण्याच्या पद्धतीत बदल करणे क्रमप्राप्त असल्याचे संशोधकांचे मत होते.

संशोधकांनी एक किलो वजनाची व्याख्या विद्युत चुंबकीय ऊर्जेवर आधारित करण्याचा निर्णय घेतला व त्यातून "किबल बॅलन्स' या नव्या तंत्राचा जन्म झाला. त्यानुसार किलोग्रॅम आता "प्लॅन्क कॉन्स्टंट' या अत्यंत छोट्या; मात्र अपरिवर्तनीय मूलभूत एककाने मोजले जाईल. विद्युत चुंबक वस्तूवर बल निर्माण करते. त्याने तयार केलेले बल त्यातील विद्युत ऊर्जेच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे एखादी वस्तू उचलण्यासाठी लागलेल्या विद्युत चुंबकीय ऊर्जेच्या आधारावर त्या वस्तूचे वजन आता मोजले जाईल.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

हा फरक एका किलोचे एक भाग केल्यानंतर त्यातल्या 50 भागांएवढा म्हणजे, पापणीच्या वजनाएवढा असेल! मात्र, नवी प्रणाली स्थिर आणि सर्वसमावेशक असेल, असे या प्रकल्पावर काम करणारे संशोधक डॉ. स्टुअर्ट डेव्हिडसन यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वी जगभरातील वजनांची तुलना दर दहा वर्षांनी "ली ग्रॅण्ड के' या वजनाशी करणे क्रमप्राप्त होते. नव्या प्रणालीत ती गरज भासणार नाही. कोणीही कोठेही "किबल बॅलन्स'च्या मदतीने मोजमाप करू शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी 1967 मध्ये "सेकंदा'ची पुनर्मोजणी करण्यात आली होती व त्यामुळे जगभरात "जीपीएस' आणि इंटरनेट वापरणे सुलभ झाले. किलोग्रॅमची ही पुनर्व्याख्याही जगभरातील वजन मोजण्याच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणेल, या शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com