नवा अफगाणिस्तान घडविण्यासाठी.... 

मसूद खलिली
शनिवार, 15 एप्रिल 2017

एकीकडे 'तालिबान'चा उच्छाद, तर दुसरीकडे पाकिस्तानचे उपद्‌व्याप यांच्या कात्रीत सापडूनही अफगाणिस्तानमधील जनतेची उज्ज्वल भविष्याची आशा कायम आहे. मात्र नवा अफगाणिस्तान घडविण्यासाठी तेथील जनतेला कंबर कसावी लागेल. 

अफगाणिस्तानच्या दक्षिण व पूर्वेकडील सात जिल्हे 'तालिबान'च्या ताब्यात आहेत. तेथे सरकारचे काही चालत नाही. तथापि, अफगाण जनतेचा निर्धार कायम असून, कोणत्याही परिस्थितीत 'तालिबान'पुढे झुकण्यास ती तयार नाही. 'गुड तालिबान' व 'बॅड तालिबान' असे मी काही मानीत नाही. भारताचीही तीच भूमिका आहे. 'तालिबान'शी बोलणी करणे सोपे नाही, तथापि अशक्‍यही नाही; पण जे (तालिबान) चुकीचे आहे, ते फार काळ टिकत नाही, असे इतिहास आपल्याला सांगतो.
 

'अल कायदा'ची शक्ती क्षीण झाली आहे. ती फक्त एक संघटना म्हणून उरली आहे. आजही 'तालिबान' सर्वांत धोकादायक असून, 'इसिस' पेक्षाही अफगाणिस्तानात ती अधिक प्रबळ आहे. 

दुसरीकडे अफगाणिस्तानमधील पाकिस्तानचा हस्तक्षेप थांबलेला नाही. त्यामुळे राजकीय अस्थिरता कायम असून, सुरक्षा स्थिती अधिक बिकट होत आहे, ही चिंतेची बाब आहे. पाकिस्तानला समजावण्याचे प्रामाणिक प्रयत्न गेली अनेक वर्षे आम्ही करीत आहोत. तथापि, पाकिस्तानची भूमिका व कारवाया यात बदल झालेला नाही. हे सारे पाकिस्तानने गरीब अफगाण जनतेच्या हिताकडे पराकोटीचे दुर्लक्ष करून चालविले आहे. 'अफगाणिस्तानकडे पाकिस्तानच्या चष्म्यातून पाहू नका,' असे चीनलाही आम्ही सांगितले आहे. चीनबरोबर आमची सीमा केवळ 170 किमी आहे; पण चीनबाबत पाऊल उचलण्यापूर्वी आम्ही सावध असतो. चीनने पायाभूत सुविधांची उभारणी करण्यास; तसेच खनिज संपत्तीच्या उत्खननाच्या संदर्भात अफगाणिस्तानला साह्य करण्याची तयारी दर्शविली आहे. 

मी आमच्या देशाला 'लॅंडलॉक्‍ड कन्ट्री,' म्हणत नाही. भौगोलिकदृष्ट्या ते सत्य असले, तरी अफगाणिस्तानला मी 'एनिमीलॉक्‍ड कन्ट्री' म्हणतो. कारण, आम्ही शत्रूने घेरलेलो आहोत. या बिकट परिस्थितीतही गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तानने बरीच प्रगती केली. त्यात भारताने मोठे साह्य केले. आमच्याकडे तीन लाख सैन्य आहे. आज वीस लाख मुली शाळेत जातात. विद्यार्थ्यांची संख्या 40 लाख आहे. 'तालिबान'च्या कारकिर्दीत लाखो शाळा उद्‌ध्वस्त करण्यात आल्या. मुलींना शिक्षणच काय; पण घराबाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती. हेच भावी तरुण आमची आशा आहेत. तेथे माहितीविश्‍वात झालेल्या प्रगतीचीही दखल घ्यावी लागेल.

उदा. अफगाणिस्तानात 47 दूरचित्रवाणी वाहिन्या व 200 रेडिओ केंद्रे असून, त्यावरून बातम्यांव्यतिरिक्त करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जातात. भारतीय चित्रपटसृष्टीने जनता व युवकांच्या मनात स्थान मिळविले आहे. मनोरंजनाचे ते महत्त्वाचे साधन बनले आहे. इतकेच नव्हे, तर क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने केलेल्या प्रगतीचीही दखल घ्यावी लागेल. अलीकडे 'आयपीएल'च्या 2017 मधील लिलावात भारताच्या वतीने खेळण्यासाठी आमच्या देशाचे रशिद खान व महंमद नबी या क्रिकेटपटूंची झालेली निवड बरेच काही सांगून जाते. भारताने दोन अब्ज डॉलर खर्चून सलमा धरण बांधण्यास, ऊर्जानिर्मिती करण्यास व पायाभूत सोयी उभारण्यास केलेली मदत अफगाण जनता विसरणार नाही. भारत व अफगाणिस्तानचे संबंध व मैत्री ही सिंधू संस्कृती वसली, तेव्हापासून हजारो वर्षांची आहे. ती तोडणे कदापि शक्‍य नाही. 

गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तानमधील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी भारतात शिक्षण घेतले. आजही सोळा हजार अफगाण विद्यार्थी निरनिराळी महाविद्यालये व अन्य संस्थांमध्ये शिकत आहेत. भारतीय लोकशाही व समाज यांचे ते अवलोकन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यातही अफगाणिस्तानात लोकशाही रुजविण्याचा विचार पक्का होत आहे. म्हणूनच मी अफगाणिस्तान सरकारला वेळोवेळी सांगत आलोय, की अफगाणिस्तानमधील सैनिक व तरुण पिढीला पाश्‍चात्त्य देशांत प्रशिक्षण देण्याऐवजी त्यांना भारतात प्रशिक्षणासाठी, पदवी संपादनासाठी पाठवा. अफगाणिस्तानच्या 34 प्रांतांतून प्रत्येकी 500 विद्यार्थी भारतात पाठवावेत, अशी शिफारस मी केली आहे.

येत्या दहा वर्षांत आणखी लाख, दोन लाख विद्यार्थी भारतात येऊन शिकले, तर येथील स्वतंत्र लोकशाहीची मूल्ये अफगाणिस्तानात रुजविण्याची त्यांची इच्छा व ऊर्मी अधिक दृढ होईल व ते अफगाणिस्तानच्या भवितव्याच्यादृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल. 
अफगाणिस्तान शांततामय देश होता; परंतु पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत महासंघाने 1979 मध्ये आक्रमण केल्यापासून सुरू झालेली अस्थिरता, दहशतवाद, पाश्‍चात्त्य देशांचा हस्तक्षेप संपुष्टात आलेला नाही. आजही अफगाणिस्तानची ससेहोलपट चालू आहे. 'तालिबान'ला पदच्युत करण्यासाठी अमेरिकेने केलेल्या हस्तक्षेपामुळे परिस्थितीत बदल झाला. सरकारे स्थापन झाली. संसदीय प्रणाली आली. संसदेत व मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व मिळाले. हे सारे भविष्यात टिकवावे लागेल. भ्रष्टाचाराशी मुकाबला करावा लागेल. विशेष म्हणजे, 'तालिबान'च्या कारकिर्दीपेक्षाही आज अफूचे पीक शंभर टक्‍क्‍यांनी वाढले आहे. त्यावर नियंत्रण आणावे लागेल. अशी एक ना अनेक आव्हाने आमच्यापुढे आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी अफगाणिस्तानला कंबर कसावी लागेल. 

'तालिबान-इसिस' संबंध कळीचा मुद्दा 
अफगाणिस्तानातील ताज्या घडामोडींनुसार, 'इसिस'ला नेस्तनाबूत करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने नांगरहार प्रांतातील त्यांच्या भुयारी व तळघरातील छावण्यांवर जगातील सर्वात मोठ्या अण्वस्त्ररहित बॉम्बने केलेल्या हल्ल्यांमुळे त्यांचा कणा मोडण्याची; किमान कमकुवत होण्याची शक्‍यता आहे. त्यांच्याविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकी व अफगाणी सैन्याला मोठे साह्य मिळेल; परंतु 'तालिबान' 'इसिस'ला साह्य करणार काय, हा कळीचा मुद्दा आहे. कारण, आमचा संघर्ष 'इसिस' व 'तालिबान' या दोघांविरूद्ध आहे. हल्ल्याचे नेमके काय परिणाम होतील, हे कळण्यास काही वेळ वाट पाहावी लागेल. मात्र अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीचा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा आहे. 

(लेखक अफगाणिस्तानचे भारतातील माजी राजदूत आहेत)

Web Title: Masood Khalili writes about developing new Afghanistan