श्रेयांक बँकेची ‘एबीसी’

उच्च शिक्षणात श्रेयांक पद्धत लागू झाली आहे, तर सीबीएसईने श्रेयांक पद्धत लागू करण्यासाठी निवडक शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे.
Merit System by CBSE education abc id digilocker
Merit System by CBSE education abc id digilockerSakal

- डॉ. वसंत काळपांडे

उच्च शिक्षणात श्रेयांक पद्धत लागू झाली आहे, तर सीबीएसईने श्रेयांक पद्धत लागू करण्यासाठी निवडक शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्रासह देशातील इतर बोर्डांच्या शाळांतही श्रेयांक पद्धत लागू व्हायला फारशी वाट पाहावी लागेल, असे दिसत नाही.

त्या दृष्टीने आतापासूनच आपली मानसिक तयारी करायला हवी. कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या श्रेयांकांचा हिशोब ठेवणे हे अतिशय जिकिरीचे आणि किचकट काम तंत्रज्ञानाने आज सोपे केलेले आहे.

ते सुरळीतपणे आणि कार्यक्षमतेने व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने संपूर्ण देशातील शिक्षणसंस्थांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC) ही एक आभासी बँक सुरू केली आहे.

या ‘एबीसी’मध्ये खाते उघडल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक कायमस्वरूपी बाराअंकी खातेक्रमांक मिळेल. ‘एबीसी’वर आतापर्यंत तीन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. देशभरातील तीस कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची खाती उघडली जातील अशी तयारी ठेवून ‘एबीसी’चे सॉफ्टवेअर आणि कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे.

देशातील कोणत्याही शिक्षणसंस्थेत विद्यार्थी शिकायला गेले किंवा तेथून बाहेर पडले तरी त्यांचा खातेक्रमांक तोच राहील. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या ‘डिजिलॉकर’ची लिंक, म्हणजे किल्लीच मिळेल.

या ‘डिजिलॉकर’मध्ये विद्यार्थ्याने मिळवलेले श्रेयांक आणि परीक्षांचे निकाल साठवून ठेवले जातील; गरज असेल तेव्हा ते त्याला सहजपणे पाहता आणि हाताळता येतील. शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांचे श्रेयांक आणि परीक्षांचे निकाल त्यांच्या खात्यात अपलोड करू शकतील; त्याचप्रमाणे त्यांच्या कागदपत्रांची सत्यता पडताळून देऊ शकतील.

दुसऱ्या संस्थेत किंवा वेगळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश, नोकऱ्यांसाठी अर्ज अशा बाबी ‘एबीसी’मुळे सुकर होतील. ‘एबीसी’कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीचे विश्लेषण करून अध्ययन-अध्यापन आणि इतर शैक्षणिक प्रक्रियांशी संबंधित विषयांवरील सखोल आकलन करून देणारे शैक्षणिक अहवाल तयार करता येतील.

राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी किमान ४० श्रेयांक मिळवणे अपेक्षित असले तरी शिक्षणाच्या प्रत्येक इयत्तेच्या श्रेयांकांचा स्तर चढता राहील. शिक्षणाच्या अर्हता-सोपानात आठवीनंतर पीएच.डी.पर्यंतच्या प्रत्येक वर्षाच्या श्रेयांक-स्तरात ०.५ने वाढ होईल. उदाहरणादाखल, आठवी,

बारावी आणि पीएच.डी.साठी श्रेयांकाचे स्तर अनुक्रमे २, ४ आणि ८ एवढे असतील. विविध शैक्षणिक अर्हतांची समकक्षता ठरवण्यासाठी श्रेयांक-स्तर हा प्रमुख आधार असेल. ही समकक्षता एकदा ठरली की सामान्य, व्यवसाय किंवा अभियांत्रिकी या तिन्ही शाखांच्या अभ्यासक्रमांतील लवचिकता वाढून एका अभ्यासक्रमातून दुसऱ्या कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेणे सुकर होईल. या संदर्भात एक उदाहरण पाहूया.

हर्षदने लवकरात लवकर अर्थार्जन सुरू करता यावे म्हणून दहावीनंतर (श्रेयांक-स्तर ३) आयटीआयमधून एक वर्षाचा पेंट टेक्नॉलॉजीचा (श्रेयांक-स्तर ३.५; अकरावीला समकक्ष) अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्यानंतर त्याला थोडीफार कामे मिळून आर्थिक गरज काही प्रमाणात भागायला लागली, म्हणून त्याने पुन्हा सामान्य शिक्षण सुरू केले. हर्षदला आयटीआयमध्ये मिळालेले श्रेयांक परीक्षा मंडळात त्याच्या बारावीच्या (श्रेयांक-स्तर ४) प्रवेशासाठी वर्ग झाले. त्याने बारावीत मराठी, इंग्रजी, रसायनशास्त्र, मानसशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि उपयोजित कला हे सहा विषय निवडले.

हर्षदच्या शिक्षकांच्या मते बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्याच्या पूर्वज्ञानात मानसशास्त्र वगळता कोणतीही कमतरता नव्हती. हर्षदने बारावीत शिकत असतानाच मानसशास्त्राचे श्रेयांक नसलेले (शून्य श्रेयांकाचे) एक छोटे सेतु-मोड्यूल पूर्ण करणे अपेक्षित होते.

‘एबीसी’चे सॉफ्टवेअर आणि ते हाताळणाऱ्या व्यक्तींच्या कार्यक्षमतेइतकेच तिला पूरक असे इतर काही घटकसुद्धा महत्त्वाचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची उपस्थिती, श्रेयांकांसाठी शाळेने आयोजित केलेले विविध उपक्रम, त्यांतील विद्यार्थ्याचा सहभाग यांच्या वस्तुनिष्ठ नोंदी ‘एबीसी’मध्ये करणे फारच महत्त्वाचे आहे.

विद्यार्थी शाळेत येतात, व्याख्याने ऐकतात, एवढ्यासाठीच त्यांच्या खात्यावर वर्षाच्या शेवटी ४० श्रेयांक जमा करणे हा मोठाच अप्रामाणिकपणा होईल. ‘एबीसी’मध्ये असे पोकळ श्रेयांक जमा झाल्यामुळे श्रेयांक फुगवटा निर्माण होऊन शिक्षणाचा दर्जा खालावेल. श्रेयांक आणि श्रेणी यांचा संचय आणि वापर विवेकाने केला तरच ‘एबीसी’ विद्यार्थिहिताची होईल; अन्यथा श्रेयांक पद्धत एक कर्मकांडच ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com