हिंदी प्रसाराचा ध्यास

हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे (पुणे) संचालक जयराम फगरे आज ९३व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
moto to spread hindi language jayram fagare turn 93th year old
moto to spread hindi language jayram fagare turn 93th year oldSakal

- प्रकाश सुतार

हिंदी भाषा हा त्यांचा श्वास, हा त्यांचा ध्यास, हिंदी त्यांच्यासाठी त्यांचे सर्वस्व. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत हिंदीचा प्रचार आणि प्रसार करत राहणार, हा महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे संचालक जयराम फगरे सर यांचा आत्मविश्वास आहे.

फगरे सरांच्या वयाची ९२ वर्षे पूर्ण झाली. तरीही शनिपार चौकात असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या कार्यालयामध्ये ते पूर्णवेळ उपस्थित राहतात. हिंदीच्या प्रचाराचे कार्य राबवण्यासाठी झटत असतात. फगरे सरांचा जन्म १२ जानेवारी १९३१ रोजी झाला. बी.ए.बी.एड. शिक्षण झालेले फगरे सर साहित्य विशारद, साहित्यरत्न असेही झाले आहेत.

त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात पुण्यातील नूतन मराठी विद्यालय प्रशालेतून अध्यापक म्हणून केली. आनंददायी शिक्षण पद्धतीचा वापर करत ते अध्यापन करत; त्यामुळे ते एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. अनेक संघटना पातळीवर हिंदी शिक्षकांच्या अडीअडचणी सरकार दरबारी मांडून; प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढून त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली.

फगरे सर यांचे लेखन, वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व हे शब्दापलीकडचे आहे. त्यांनी समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, अनेक शैक्षणिक संस्थांना अर्थसाहाय्य केले आहे. हिंदी भाषा ही जागतिक भाषा बनली पाहिजे या ध्यासापोटी ते आजही अहोरात्र काम करत असतात.

संपूर्ण राज्यभरामध्ये समितीच्या वतीने शालेय स्तरावर हिंदीच्या विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. ‘संवाद’ या मासिकातून हिंदी भाषेविषयी, परीक्षांबद्दल, समितीच्या कार्याची माहिती दिली जाते. महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे (पुणे) मंत्री संचालक म्हणून तसेच कार्य समितीचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.

यापूर्वी त्यांनी हिंदी प्रचार संघ (पुणे), पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर सेवक संघाचे अध्यक्ष अशी पदे भूषवून काम केले आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. ‘समिती संवाद’ या मासिकाचे ते संपादक आहेत.

फगरे सरांनी हिंदी भाषेच्या सेवेबद्दल केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्यावतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. फगरे सरांची आजवर ‘ऊर्जावान विभूतीया’, ‘मराठी-हिंदी शब्दकोश’, ‘बापू की बातेर’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. हिंदीच्या प्रचार आणि प्रसारासाठी अखंडितपणे कार्य करणाऱ्या जयराम फगरे सर यांच्या कार्याला सलाम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com