शिवसेनेला मिळणार पुन्हा 117 जागा?

शिवसेनेला मिळणार पुन्हा 117 जागा?

महाराष्ट्र माझा : मुंबई
विधानसभा निवडणुकीत युती झाली नाही, तरी भाजपचे आजघडीला नुकसान होणार नाही, उलट फायदा होण्याचीच शक्‍यता जास्त. तरीही स्वतःहून युतीला तयार झालेला भाजप या वेळी शिवसेनेला किती जागा देणार, हाच या निवडणुकीतला सर्वांत मोठा, खरे तर, एकमेव प्रश्‍न आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीचे दिवस. ‘अबकी बार ३०० पार’चा नारा तर भाजपने दिला होता, पण पक्षाध्यक्ष अमित शहा सोडून त्यावर कुणाचा विश्‍वास नसावा अशी स्थिती होती. भाजपला हिंदुत्वप्रधान राष्ट्रवादामुळे भगवा झेंडा दिमाखाने मिरवणारी शिवसेना समवेत हवी होती. त्यांची वेगळी चूल नकोच, असा दिल्लीचा निर्णय होता. युतीच्या प्रतिष्ठापनेपासून शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या प्रकाश जावडेकरांनी ‘चर्चेसाठी भेटू’ असा निरोप दिला.

‘मातोश्री’ने ही जबाबदारी ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंवर सोपवली. काही निवडक नेते खलबतासाठी जमले. जागावाटपाची प्राथमिक बोलणी कुठल्यातरी जागेवर अडकली, तेव्हा जावडेकरांनी विचारले म्हणे : आमच्या जागी तुम्ही असतात तर काय केले असते? चाणाक्ष देसाईंनी हा मुद्दा पकडला अन्‌ ते म्हणाले : आम्ही तर समवेत लढण्याची चर्चा करण्याचे निमंत्रणच दिले नसते. हा किस्सा आहे की हकीगत? माहीत नाही. पण हे विधान वास्तव दाखवणारा आरसा आहे हे मात्र खरे. 

स्वबळावर ३०० पार झाल्यावर ‘मोदी २.०’ सरकारने ३७० वे कलम रद्द करत खऱ्या अर्थाने ५६ इंची छातीचे प्रदर्शन केले आहे. शेती, बेरोजगारी या प्रश्‍नांच्या चर्चेऐवजी राष्ट्रवादाने भारलेले वातावरण हा विषय दशांगुळे व्यापून वर उरतो आहे. अशा देशप्रेमाने ओथंबलेल्या वातावरणात भाजपशी पंगा घेणे कठीण असल्याची जाणीव शिवसेनेला आहे. मात्र संकटातील संधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शोधता येते हे वारंवार सिद्ध झाले आहे.

२०१४ मध्ये मोदी लाट सगळे कवेत घेत असतानाही उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्वबळावर लढत सर्वोत्तम कामगिरीच्या केवळ नऊ जागा मागे राहिली. तब्बल ६३ मतदारसंघ शिवसेनेने जिंकले, तर भाजप १२३ वर पोहोचला. तरीही महाराष्ट्राचे मन युतीच्या बाजूचे आहे, हे लक्षात घेत भाजपने शिवसेनेला समवेत घेतले. 

युतीतील भूमिकांमध्ये बदल

विधानसभा निवडणुकीनंतर ‘मोठा भाऊ, लहान भाऊ’ भूमिका बदलल्या. पण भावकीला मूठमाती मात्र दोघांनीही दिली नाही. दोघांचे मतदार एका अर्थाने एकच- बिगरकाँग्रेसी. म्हणजे संपत्ती एक. इस्टेटीवरून निर्माण होणारे भावकीचे प्रश्‍न मोठे असतात. ते सोडवले नाहीत, तरी भाजपचे आजघडीला नुकसान होणार नाही, फायदा होण्याचीच शक्‍यता जास्त. तरीही स्वतःहून युतीला तयार झालेला भाजप या वेळी शिवसेनेला किती जागा देणार, हाच या निवडणुकीतला सर्वांत मोठा, खरे तर, एकमेव प्रश्‍न आहे.

२०१४ मध्ये भाजपने १२२ जागा जिंकल्या. २००९ पेक्षा ७६ जागा जास्त. त्यानंतर महेश लांडगे, गणपत गायकवाड, विनायक पाटील, मोहन फड या चार आमदारांनी पाठिंबा दिला. रवी राणांसारख्या अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेता ही संख्या सहा होते. राधाकृष्ण विखे- पाटील, शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर आणि वैभव पिचड या आमदारांनी राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रतापराव चिखलीकर खासदार झाले भाजपकडून, पण होते आमदार शिवसेनेचे. ती जागा कोणाची हा प्रश्‍नच. उन्मेष पाटील यांचाही मुद्दा तोच. शिवाय राणा जगजितसिंह, जयकुमार गोरे, झालेच तर अब्दुल सत्तार भाजपमध्ये येऊ घातले आहेत. ही संख्या १४५ वर जाते. यापुढच्या प्रत्येक निवडणुकीत जागावाटप अर्धेअर्धे अशा आणाभाका लोकसभेपूर्वी झाल्या आहेत.

तसे असेल तर या सूत्रानुसार एक जागा भाजपला अतिरिक्‍त मिळते. त्यामुळे हे शक्‍य नाही असे धरून, दुसरे सूत्र धरले तर शिवसेनेने जिंकलेल्या ६३ त्यांच्या अन्‌ भाजपने जिंकलेल्या १२२ सोडून उरलेल्या जागा अर्ध्या वाटणे हा सर्वांत रामबाण तोडगा. त्यानुसार राहिलेल्या १०३ पैकी हिशेबाच्या दृष्टीने १०२ जागा अर्ध्या अर्ध्या वाटल्या, तरी त्या होतात ५१. म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला येणार ११४ आणि भाजप लढणार १७३. हे सूत्र चालणारे नाही असे मित्रपक्ष म्हणतात. गेल्या वेळी राहुल कुल हे मित्रपक्षाचे एकमेव उमेदवार निवडून आले. या वेळी मित्रपक्षांना १४ जागा देऊन, मगच शिवसेनेशी जागावाटपाची चर्चा असाही एक पतंग सोडला गेला. एक मात्र घडले या काळात शिवसेनेने कुठेही विपरीत वक्‍तव्य केलेले नाही. खासदार संजय राऊत यांनीही ५०० टक्‍के युती होणार असा निर्वाळा दिला. म्हणजे विरोधच संपला. 

‘मोठे-छोटे’ एवढेच ठरायचेय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेदरम्यान शिवसेना लढवत असलेल्या मतदारसंघांत फिरकले नाहीत. त्यांची जागा घेण्याचे स्वप्न पाहणारे आदित्य ठाकरे सर्वत्र फिरताहेत. त्यांच्या आगेमागे झालेली खूषमस्कऱ्यांची गर्दी शिवसेनेतील जुन्या नेत्यांच्या जिवाला घोर लावते आहे म्हणे. ते मुख्यमंत्री असे होतील याची काळजी वाहणारे नवे दरबारी ‘मातोश्री’त पायधूळ झाडताहेत.

रोज नवे प्रवेश सुरू आहेत. देशाचे भविष्य मोदींच्या अन्‌ महाराष्ट्राचे फडणवीस यांच्या हाती असल्याच्या खात्रीने बडी घराणी टोप्या बदलू लागली आहेत. ‘मातोश्री’तला पायरव मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यामुळेच वाढला आहे म्हणतात. येणाऱ्याला त्याने कुठे जायचे तो पक्ष फडणवीस-ठाकरे मिळून ठरवून देतात म्हणे. त्यातच एकाने १७१ आणि ११७ हा आकड्यांची नऊ बेरीज करणारे संख्याबळ वाटले जाईल, असे सांगितले आहे.

‘आमचं ठरलंय’ या घोषणेत ‘मोठे-छोटे’ एवढेच ठरायचे आहे. तेव्हा भाजपमय वातावरणात त्यांच्या साथीने राहून ‘मी लाभार्थी’ म्हणण्याचा चाणाक्षपणा उद्धव ठाकरे दाखवतील, अशीच चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com