आई असती तर... (मुक्तपीठ)

अरुणा देशपांडे-सांब्राणी
गुरुवार, 23 जून 2016

चळवळीनं प्रेरित झालेले, नवा देश घडवण्याची स्वप्नं पाहणारे असे लोक आता मशागतीसाठी शिल्लक नाहीत, म्हणून तर नदी-ओढे रुसले नसतील ना? आज आई असती, तर भोवतालच्या इतरांना प्रेरणा देत राहिली असती... 

मी आणि माझ्या वयाच्या, म्हणजे सत्तरीच्या आसपासच्या कित्येकांनी आपापल्या गावांत झुळझुळणारे, खळखळणारे रम्य ओढे-नद्या पाहिल्या असतील. तो रम्य परिसर, नद्यांच्या काठावरची हिरवीगार झाडी यांच्या आठवणी त्यांच्या मनाला रुखरुख लावत असतील. 

चळवळीनं प्रेरित झालेले, नवा देश घडवण्याची स्वप्नं पाहणारे असे लोक आता मशागतीसाठी शिल्लक नाहीत, म्हणून तर नदी-ओढे रुसले नसतील ना? आज आई असती, तर भोवतालच्या इतरांना प्रेरणा देत राहिली असती... 

मी आणि माझ्या वयाच्या, म्हणजे सत्तरीच्या आसपासच्या कित्येकांनी आपापल्या गावांत झुळझुळणारे, खळखळणारे रम्य ओढे-नद्या पाहिल्या असतील. तो रम्य परिसर, नद्यांच्या काठावरची हिरवीगार झाडी यांच्या आठवणी त्यांच्या मनाला रुखरुख लावत असतील. 

माहेरच्या म्हणजे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरच्या आठवणी माझ्या मनात पिंगा घालतात. आमच्या गावाच्या दोन्ही बाजूंना ओढे होते. एका बाजूनं कमंडलू नावाची नदी आणि दुसऱ्या बाजूनं कापूरहोळ नावाचा जणू कापरासारखं स्वच्छ पाणी असलेला ओढा. हे दोन प्रवाह गावाच्या टोकाशी एकत्र होत आणि पुढे काही किलोमीटर वाहत जाऊन कृष्णामाईला मिळत. सुमारे 1970 पर्यंत हे प्रवाह रहिमतपूरचे जीवनदायी होते. नंतर कृष्णा नदीची पाणीपुरवठा योजना आली. घरोघरी नळाचं पाणी येऊ लागलं. तेव्हापासून गावानं या खळखळणाऱ्या ओढ्यांकडे जणू पाठ फिरविली! इतकी, की पुलावरून कचरा ढकलून देण्याची जागा एवढाच या ओढ्यांचा नाममात्र उपयोग राहिला! 

1945 मध्ये माझी आई आशाताई देशपांडे या गावची सून म्हणून आली. तिनं एसएनडीटी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. स्वातंत्र्यलढ्याच्या चैतन्यानं भारावलेल्या युवतींपैकी ती एक. साने गुरुजी, महर्षी कर्वे आणि महात्मा गांधींच्या विचारांच्या मुशीत ती तयार झाली होती. गावाच्या सामाजिक सुधारणेचा, वैचारिक उन्नतीचा तिनं वसा घेतला. त्यात 'गावचे अण्णा‘ म्हणजे माझे वडील डॉ. पु. न. देशपांडे यांचा संपूर्ण सहभाग असे. महिलांना, तरुण मुलामुलींना बरोबर घेऊन श्रमदानाद्वारे गावातील कामं होत असत. असाच एक कार्यक्रम दरवर्षी उन्हाळ्यात होत असे. कमंडलू नदी सुकली, की तिची सफाई आणि गाळ काढून खोली वाढविण्याचा कार्यक्रम. त्यासाठी घरोघर जाऊन आई आपुलकीनं आवतण देई, 'उद्या खोरी, फावडी, घमेली घेऊन सकाळी ओढ्यावर जमायचंय. सगळ्यांनी यायचं हं.‘ तिचा प्रेमळ निरोप सर्वदूर पोहोचायचा. त्याप्रमाणे सर्व जण यायचे. कपडे धुण्याच्या खडकांभोवतीचे खड्डे काढणं हे पहिलं काम असे. खड्ड्यांत जमलेल्या पाण्याला पुढे वाट करून द्यायची. असं करता करता प्रवाह तयार व्हायचा. खडकांभोवती जमलेला गाळ, शेवाळं काढून दूर नेऊन टाकलं जाई. या मुख्य प्रवाहाशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी वेगळे झरे असत. झरे म्हणजे नदीच्या काठावर, प्रवाहापासून काहीसे दूर थोड्या उंचीवर वाळू दूर करून खोलगट खड्डे तयार केले जात. त्यांच्या कडांना नीटनेटके दगड रचून बंदिस्ती केली जाई. त्या खड्ड्यांत झिरपून पाणी जमा होई. ते निवळशंख पाणी वाडग्या-वाडग्यानं आपापल्या कळशीत किंवा हंड्यात भरून गावकरी घरी घेऊन जात. घरोघरी हे पाणी डेऱ्यात भरून ठेवले जाई. लोक तृप्त होत. फक्त ओढ्याच्या सफाईचंच नव्हे; तर सर्व प्रकारच्या सामाजिक आणि श्रमदानाच्या उपक्रमांत आईला मनापासून साथ देणारे अनेक हात होते. श्रमदान करताना- 
'तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून
उद्या पिकंल, सोन्याचं रान,
चल, उचल हत्यार, गड्या होऊन हुशार
तुला नव्या जगाची आण‘
या कविवर्य वसंत बापटांच्या काव्यपंक्ती त्यांच्या ओठांवर असत. चळवळीनं प्रेरित झालेले, नवा देश घडवण्याची स्वप्नं पाहणारे असे लोक आता मशागतीसाठी शिल्लक नाहीत, म्हणून तर नदी-ओढे रुसले नसतील ना? आज आई असती, तर तिच्यातलं धडपडणारं मूल सतत धडपडत भोवतालच्या इतरांना प्रेरणा देत राहिलं असतं.. रहिमतपूर स्वच्छ ओढ्यांना मुकलं नसतं. 

अलीकडे सर्वत्र पाणीटंचाईबद्दल बोललं जातं. माध्यमं 'पाणी‘ या विषयावर भरपूर प्रबोधन करताहेत. जनसहभागातून जलसंधारणाची कामं अनेक ठिकाणी सुरू झाली आहेत. एक चांगलं झालं, की पाण्यासारख्या जीवनावश्‍यक बाबीची बूज राखण्याचे विचार पुन्हा खडबडून जागे झाले! त्यात सातत्य राहो! 

Web Title: Muktapeeth Sakal