esakal | जान है तो जहान है...
sakal

बोलून बातमी शोधा

 गोरेगाव येथील कोविड केंद्र.

महाराष्ट्रातल्या कोविड रुग्णांची संख्या जगातल्या कित्येक कोरोनाग्रस्त देशांपेक्षा जास्त आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपाची ही वेळच नाही. गरज आहे ती माणसे जगवायची, हे सगळ्यांनीच लक्षात घ्यावयास हवे. 

जान है तो जहान है...

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

महाराष्ट्रातल्या कोविड रुग्णांची संख्या जगातल्या कित्येक कोरोनाग्रस्त देशांपेक्षा जास्त आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपाची ही वेळच नाही. गरज आहे ती माणसे जगवायची, हे सगळ्यांनीच लक्षात घ्यावयास हवे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विमानतळावर आलेल्या संशयितांचे विलगीकरण मनावर न घेणाऱ्या आपल्या राज्यात आता घरघर रुग्णशोध मोहीम राबवली जाणार आहे म्हणतात. महाराष्ट्रातल्या कोविड रुग्णांची संख्या जगातल्या कित्येक कोरोनाग्रस्त देशांपेक्षा जास्त आहे. आंध्रप्रदेश ,कर्नाटक ,तमिळनाडू आणि उत्तरप्रदेश या चार राज्यांसह महाराष्ट्र मिळून देशातला ६२टक्के कोरोनाग्रस्तांचा भार वहातात. त्यात महाराष्ट्राची संख्या सर्वाधिक. गेल्या आठवड्यात तब्बल एक लाख रुग्ण वाढले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशोत्सव कितीही छोट्या प्रमाणावर साजरा झाला तरी संख्या वाढण्याची भीती होतीच. सार्वजनिक देखावे नसले तरी पूजअर्चेसाठी २०,२५जणांना निमंत्रणे देणारी घरे कमी नव्हती. मोहर्रमचे ताजिये निघाले नाहीत, तरी अंतर पाळणे, मुखपट्टी लावणे गावीही नसलेली मंडळी ठिकठिकाणी आहेत. मागासांना कळत नाही अन प्रगतांना वळत नाही. फैलाव वाढतो आहे. मनमंदिरात अर्चना करून ‘घर एक मंदिर’ असे शहाण्यासुरत्या जनतेला कळत असावे; पण विरोधी पक्षांना मंदिर प्रवेशाचे राजकारण करायचे आहे,

अन्‌ सत्ताधाऱ्यांना साथीच्या रोगातील संधीचा लाभ घ्यायचा आहे. अर्धवट उभारलेल्या ‘कोविड जंबो सेंटर’चे पैसे पोराबाळांना मिळवून देणाऱ्या काहींची नावे विरोधकांनी जाहीर केली आहेतच.  वैद्यकीय सामग्रीचे दर कसे वाढले ते हळुहळू उघड होईल. रेमिडिसीवर, टोसी ही औषधे काही डॉक्‍टरमंडळी उपचारासाठी आवश्‍यक मानतात. ती तशी आहेत का हा वादविषय; पण या औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून ती चढ्या दराने विकली जात आहेत. कोरोनाला आपल्याबरोबर रहायचे आहे का, हा सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा मनोरंजक प्रश्न गैरलागू झाला आहे.

रुग्णवाहिकांचा अभाव
मार्चमध्ये पहिले दोन कोरोनारुग्ण सापडले ते पुण्यात. हे महानगर आज देशातले सर्वाधिक रुग्ण अंगाखांद्यावर घेवून वावरते आहे. रुग्णवाहिका नाहीत, घोषणा झाल्या तितक्‍या खाटा नाहीत, उपचारकेंद्रात सुविधांअभावी मृत्यू असे वास्तव असले तरी पुण्यातले कोरोनाव्यवस्थापन चांगले असल्याचा निर्वाळा उपमुख्यमंत्र्याच्या साक्षीने विरोधी पक्षनेत्यांनी जाहीरपणे दिला आहे. त्यामुळे जनतेला ‘स्वयंदीप हो’च्या धर्तीवर आत्मनिर्भर व्हावे लागणार आहे. तसे व्हायला पर्याय नाहीही; पण रुग्णालयात खाटा, प्राणवायूपुरवठा यंत्रे, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका स्वत:च तयार करता येत नसल्याने सरकारचे ‘चेस द व्हायरस’ सुरु असताना जनतेचे ‘चेस द बेड’ ,‘चेज द ॲम्ब्युलन्स’ असे सारे सुरू आहे. एप्रिल- मेमध्ये मुंबईत जी अवस्था होती, तशीच आज पिंपरी चिंचवडला आहे. नवी मुंबईला आहे, ठाण्याला आहे. सोयीसुविधात कुग्राम ठरणाऱ्या कल्याण- डोंबिवली महापालिकेत जी गत आहे, ती तशीच पूर्वेचे ऑक्‍सफर्ड असा जगभर लौकिक पसरलेल्या पुण्यातही आहे. सगळीकडची स्थिती एक. उद्या अशीच अवस्था नागपूर, कोल्हापूर, सातारा, लातूरची होणार हे वेगळे सांगायला नको. विकसनशील देशांत आरोग्य सुविधांसाठी सर्वसामान्य नागरिक अवलंबून असतो तो सार्वजनिक रुग्णालयांवर. भारत सरकार उत्पन्नातील अवघा १.३ टक्के हिस्सा सार्वजनिक आरोग्यावर खर्च करते. 

आरोग्यावर अत्यल्प तरतूद
भौतिकदृष्टया संपन्न असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राने हा खर्च अर्ध्यावर ०.५ टक्‍क्‍यांवर आणून ठेवला आहे. येथे खाजगी रुग्णालयात दोन लाख ४१ हजार ८०४ रुग्णखाटा आहेत तर सार्वजनिक रुग्णालयात ६८ हजार ९९८ .ही आकडेवारी प्रसिद्ध करणाऱ्या ‘सेंटर फॉर डिजीज डायनॅमिक्‍स इकॉनॉमिक्‍स ॲण्ड पॉलिसी’ या पहाणीगटाने काही अनुमाने केली आहेत. भारतात असणाऱ्या ४८ हजार व्हेंटिलेटरपैकी सुमारे २२ टक्के यंत्रे महाराष्ट्रात असावीत. हे आठवायचे कारण म्हणजे आज कोरोनाग्रस्त असलेल्या आठ लाख रुग्णांसाठी राज्यात जेमतेम १० ते ११ हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. ते अर्थातच काही बड्या शहरात, मोठ्या ठिकाणी. मुंबई, पुण्यासारख्या बड्या महानगरात खाजगी रुग्णालये मोठ्या प्रमाणात असतात. अर्थात या महानगरात गरिबांना उपचार परवडत नाहीयेत, अन धनिकही आजारी पडलेच तर रुग्णालयात जागा मिळेल का या विवंचनेत आहेत. मोठ्या शहरातला व्हायरस चेसिंगच्या सरकारी प्रयत्नांत न अडकता अन्यत्र पसरला तर? जिल्हास्थानी बरी रुग्णालये नाहीत अशी स्थिती तर तालुक्‍याचे काय बोलावे ? नाशिक, औरंगाबाद आणि मध्यभारताचे रुग्णसेवा मुख्यालय झालेल्या नागपुरात फार तर सेवा मिळतील.बाकीच्या गावातील रुग्णांनी काय करायचे? डॉक्‍टर मंडळी रक्ताचे पाणी करून झटताहेत. चार दोन सडके आंबे असतीलही; पण आरोग्यसेवक अथक प्रयत्न करताहेत.रुग्णालय व्यवस्थापन संधी असल्याने खोऱ्याने पैसे कमावते आहे; पण  कुठे तर जेथे ती अगोदरच उभी  होती  तिथे.राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग, संचालनालय काय करतेय हा प्रश्न आहेच. 

बचेंगे तो...
राजकीय आरोप्रत्यारोपाची ही वेळच नाही. गरज आहे ती माणसे जगवायची. ‘चेस द व्हायरस’ शोधमोहीम  सरकारने सुरु ठेवावी. आपला खारीचा वाटा नागरिकांनीही उचलायला हवा. घरी बसणे, सार्वजनिक स्थळी अंतर पाळणे आवश्‍यक आहे. कोणत्याही जबाबदारीपासून चार हात लांब रहाण्याचा सार्वजनिक रोग आपल्या जनुकात शिरला आहे. सरकारी अनास्था आणि सार्वजनिक बेशिस्त असा समसमा संयोग हे भारताचे दुर्दैव. जीव वाचवायचा असेल, तर त्यास तिलांजली देणे आवश्‍यक आहे.शेवटी काय तर ‘जान है तो जहान है...बचेंगे तो और भी लडेंगे.

Edited By - Prashant Patil