esakal | केवळ तरले नव्हे; सरावलेही!
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikasaghadi

तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळेल, असे सांगत मुहूर्त काढले गेले. तरीही प्रतिकूलतेवर मात आणि आव्हानांना तोंड देत सरकारने वर्षपूर्ती साधली.

केवळ तरले नव्हे; सरावलेही!

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळेल, असे सांगत मुहूर्त काढले गेले. तरीही प्रतिकूलतेवर मात आणि आव्हानांना तोंड देत सरकारने वर्षपूर्ती साधली. 

म्हणता म्हणता महाविकास आघाडी सरकारने कारकिर्दीचे वर्ष पूर्ण केले. तब्बल ३६५दिवस. आज पडेल, उद्या जाईल या घोषणा खोट्या ठरल्या अन्‌ तीन पक्षांनी १२ महिने राज्य चालवले. सात-आठ महिने कोरोनाच्या पट्टया लावूनच गेले. कोणतीही कामे झाली नाहीत. महसूल घटला. रुग्णखाटांच्या व्यवस्थापनात मुंबई, पुणे येथे दाणादाण झाली. हेळसांड अक्षम्य होती; पण आता सगळे स्थिरस्थावर होते आहे. वर्षपूर्तीला परिस्थिती नियंत्रणात आहे. साथ नियंत्रणात आल्याने सुस्कारा सोडलेल्या महाविकास आघाडीने वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव केला नाही; पण वाटचालीबद्दल पुस्तिका प्रकाशित केली. सगळीच सरकारे अशा पुस्तिका प्रकाशित करतात. या वेळचा सकारात्मक बदल म्हणजे, माहिती व जनसंपर्क या सरकारी खात्याने ही पुस्तिका प्रसिद्ध केली. कोट्यवधींच्या निविदा न मागवता देखणी पुस्तिका बनवली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन्हीही काँग्रेसना लाभ
यानिमित्ताने आघाडीचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले भाषण महत्वाचे ठरले. भिन्न मतांचे सरकार अल्पजीवी ठरेल, हा समज खोटा ठरला असल्याचा धागा पवारांच्या भाषणाचा गाभा होता. सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्‍वास वर्षाच्या वाटचालीमुळे सुखावलेले नेते करत आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पाच वर्ष पूर्ण होतील असा कद्रूपणा करु नका; तर २५ वर्षे हेच सरकार असेल असा विश्वास बाळगा असे उद्गार पवारांनी काढले. शिवसेना भाजपचे १९९५मध्ये सत्तेत आलेले सरकार पायउतार होत निवडणुकीला सामोरे गेले. शिवसेना-भाजपमधील नेत्यांच्या सत्ताईर्ष्येमुळे परस्पर पाडापाडीचा खेळ झाला. नेत्याबाबत एकमत झाले नाही अन्‌ युती विरोधी बाकावर बसली. तिथे तब्बल १५ वर्षे काढल्यानंतर मोदी करिश्‍म्यात सत्ता परत आली. तरीही पूर्ण बहुमतासाठी स्वबळावर लढलेली शिवसेनेची गरज लागलीच. दोघांनाही एकमेकांशिवाय पर्याय नाही हे कळले तरी २०१४सारख्या वेगवेगळ्या निवडणुका न लढता २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पाडापाडीचे खेळ झालेच. मग महाविकास आघाडीच्या नावाने भाजपला वगळून सगळे एक आले. ही एकी आता पुढची पंचवीस वर्षे सत्तेत असेल, असे प्रतिपादन त्यामुळेच महत्वाचे आहे. आरोपांच्या गर्तेत गेलेल्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाचे स्थान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत रहाण्याची या पक्षाला सवय आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा लाभ झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपच्या वळचणीला राहून मिळतील ती पदे स्वीकारण्यापेक्षा राष्ट्रवादी आज निर्णयप्रक्रीयेत मोलाची भूमिका बजावते आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावर काहीच ठीक नसताना महाराष्ट्रात सत्तेत वाटा मिळाला आहे. त्यामुळे लाभ होत आहेत. प्रश्न आहे तो शिवसेनेचा. ज्या पक्षाने वचनभंग झाल्याची भूमिका घेत बाजू बदलली आणि अपमान सहन करणार नाही, अशी भूमिका घेतली त्या पक्षाचे हे सरकार. या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल असे वर्षपूर्तीनिमित्त पत्रकारांना सांगितले. महाराष्ट्राच्या चार पक्षांच्या राजकारणात तीन विरुद्ध भाजप असा संघर्ष झाला तर तो विषम असेल. राजकारणात दोन अधिक दोन चारच होतात, असे नाही. हे सांगत भाजप ही शक्‍यता नाकारत तर होती, पण परिषद निवडणुकांनी आघाडी प्रत्यक्षात जनतेत काम करत असल्याचे दाखवले. वर्षपूर्तीला ठाकरे सरकार शक्तिशाली झाले. जनतेच्या मनात या सरकारबद्दल रोष नसल्याचे हे द्योतक आहे. संघटना कमी पडली पदवीधरांची नोंदणी झाली नाही, अशी कारणे भाजपकडून सबबीदाखल पुढे होतील. ती थोड्याफार प्रमाणात योग्य असतीलही, पण भाजपला धक्का बसला आहेच. संख्येत शंभरीचा आकडा ओलांडलेल्या पक्षाला त्यामुळे आत्मचिंतन करावे लागणार असले तरी सरकार टिकणार हा सध्याचा मतितार्थ आहे. 

भाजपने हे लक्षात घ्यावे!
भारताच्या संघराज्य व्यवस्थेत वेगवेगळ्या पक्षांशी जुळवून घेणे केंद्र सरकारसाठी आवश्‍यक आहे. तसे झाले नाही तर केंद्र राज्य संबंधात अडचणी येतील. सततचा संघर्ष जनतेला आवडत नाही. दुखावलेल्या भाजपने ते लक्षात घ्यावे. तसेच महाविकास आघाडीने या यशामुळे आपली जबाबदारी वाढली आहे, हेही ओळखावे. राज्याचा महसूल वाढणे, उद्योग आणि सेवाक्षेत्राचे जाळे विस्तारणे आवश्‍यक आहे. ते पुढच्या पाच वर्षात साधले तर वीस वर्षांची बेगमी होईल.

चतुर, अबोल अन पाटी पेन्सिल 
वर्षपूर्तीपुस्तिका प्रकाशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी महाविकास आघाडी खाली खेचण्याचे स्वप्न बघू नका, हे सांगून टाकले. ते थेट बोलले, विधान परिषद निकालांचा हवाला दिला. या आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे कमी बोलतात पण चतुर आहेत, हे सांगितले. त्यांच्या विधानाचा अर्थ जाणकारांना समजलाच. दुसरीकडे उद्धवजी मुलाखतीत पवारसाहेब भेटायला येतात. पण मी पाटी पेन्सिल घेवून बसलेलो नसतो, असे हसत हसत नमूद केले. दोन्ही विधाने बोलकी आहेत. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे मोठेच नुकसान झाले, शिवसेनेची अमरावतीची जागा गेली. जुन्या मित्रांच्या वादात काँग्रेस-राष्ट्रवादीचा लाभ होताना दिसतो. हे असेच चालत राहणार की मुख्यमंत्री राजकीय चातुर्याचा वापर करत शिवसेनेला बळकट करणार ते आता पाहावे लागेल.

Edited By - Prashant Patil

loading image