राजधानी मुंबई : अरे, पुन्हा ‘नवनिर्माणा’च्या पेटवा मशाली

मृणालिनी नानिवडेकर
Saturday, 8 February 2020

‘मनसे’च्या स्थापनेला चौदा वर्षे झाल्याचे निमित्त साधून राज ठाकरे यांनी पक्षात पुन्हा प्राण फुंकण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी नवे वैचारिक वळण घेतले आहे. पण हा नवा डाव यशस्वी होईल?

‘मनसे’च्या स्थापनेला चौदा वर्षे झाल्याचे निमित्त साधून राज ठाकरे यांनी पक्षात पुन्हा प्राण फुंकण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी नवे वैचारिक वळण घेतले आहे. पण हा नवा डाव यशस्वी होईल?

फुटून बाहेर पडणे तसे कठीण, बाहेर पडून वेगळी दुनिया उभारणे त्याहून कठीण अन्‌ या दुनियेतले रंग उडून गेल्यावर पुन्हा नव्याने रिलाँचिंग करणे तर महाकठीण. राज ठाकरे या कठीण आव्हानास सामोरे जाण्यास निघाले आहेत. नऊ फेब्रुवारी रोजी ते महामोर्चा काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत आणि ‘बांगलादेशी घुसखोरांना हाकला’, अशी मागणी करणार आहेत. पक्षाला पुन्हा संजीवनी देण्याचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरणार आहे. पण या प्रयत्नाकडे वर्तमानाच्या चष्म्यातून पाहिले जाईल, हे उघड आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या राजकारणाचे विभाजन हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वविरोधक असे झाले आहे. दोन ध्रुवात सतत टणत्कार होत आहेत. तसे ते व्हावेत, यासाठी दिल्लीकर भाजप नेते प्रयत्न करतात. त्यात त्यांना यश मिळते आहे. काही राज्ये हातून गेली असली, तरी मोदी- शहा आजही बिगरभाजप पक्षांना अन्‌ धर्मनिरपेक्ष विचारवंतांना मोठे आव्हान वाटतात. त्यांच्या निर्णयांना कडाडून विरोध केला जातो. मुंबईबाग, नागपाडाबाग अशा सीएएविरोधी आंदोलनाच्या शाखावार आवृत्त्या सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असतात.

त्या आंदोलनांऐवजी वेगळी भूमिका घेणारे मोर्चे मोदींची भलावण करणारे समजले जातात. राज ठाकरे यांनी आयोजित केलेला मोर्चा या पार्श्‍वभूमीमुळे आपसूकच मोदींच्या समर्थनाचा प्रयत्न ठरवला जातो आहे. या राष्ट्रीय ध्रुवीकरणाला खरे तर महाराष्ट्राची गहिरी किनार आहे. राज यांचे चुलतभाऊ, ठाकरे घराण्याची औपचारिक, मूळपीठ असलेली थोरली पाती उद्धव ठाकरे भाजपला आव्हान देत थेट मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनेच्या राजकारणाला विरोध करणे हाच ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चा धर्म असल्याची सोपी, सरधोपट मांडणी भलतीच चलनात आहे. त्यामुळे या मोर्च्यालाही केंद्र सरकार समर्थक आणि राज्य सरकारविरोधक अशा चौकटीत बसवले गेले. हे अपरिहार्य असले तरी राज ठाकरेंवर अन्याय करणारे आहे.

पदार्पणातच दमदार कामगिरी करणाऱ्या मनसेची अशा सरळ विभागणीत बोळवण करणे योग्य नाही. राज्याच्या सतत बदलणाऱ्या राजकारणात पाय रोवून उभे राहण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत असतात. त्यादृष्टीने या मोर्च्याकडे पहावे लागेल. त्यामुळेच बांगलादेशी घुसखोर, सीएए या विषयांपूर्वी ‘मनसे’चे आजचे अस्तित्व आणि भविष्यातले भवितव्य यावर नजर टाकायला हवी. करिष्म्यामुळे त्यांनी पदार्पणातच उत्तम कामगिरी नोंदवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही मनसेने केलेल्या मतविभाजनामुळे मुंबईतून एकही शिवसेना खासदार दिल्लीत संसदेत पोचू शकला नव्हता. अकरा आमदार राज यांनी एकहाती निवडून आणले. त्यानंतर संघटनाबांधणीत राज यांना अपयश आले, तर त्याच बळावर उद्धव ठाकरे पुन्हा उभे झाले. पडझड मोठी होती. त्यातून सावरण्यासाठी राज यांनी केलेले प्रयत्नही महत्त्वाचे होते. समस्याग्रस्त महाराष्ट्राच्या ब्लूप्रिंटचे त्यांनी केलेले निर्माण वेधक होते. पण त्याबाबतचा ‘इव्हेन्ट’ही राज यशस्वी करू शकली नाहीत. त्यातील तरतुदी जनतेपर्यंत पोचल्याच नाहीत. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ‘रझा अकादमी’च्या मोर्च्यात पोलिसांनाच लक्ष्य केले गेले, तेव्हा राज रस्त्यावर उतरले. त्यांनी विरोध नोंदवला.

शिवसेना हिंदुत्वाची वोटबॅंक जवळ बाळगून असल्याने मुस्लिम मते आपल्याकडे यावीत, असे खरे तर राज यांना वाटत असे आणि तसा त्यांचा प्रयत्न होता. पण पोलिसांवर काही माथेफिरूंनी हात टाकला, तेव्हा राज यांनी तो प्रश्‍न हातात घेतलाच. 

आरंभशूरतेचे ग्रहण
प्रशासनाच्या अनास्थेमुळे परळ स्थानकात चेंगराचेंगरी झाली अन्‌ शासकीय बेपर्वाईने मुंबईकरांचे बळी घेतले, तेव्हा राज पुन्हा रस्त्यावर आले. हा मोर्चा महत्त्वाचा होता. मुंबईकरांसाठी कुण्या राजकीय पक्षाला काहीतरी वाटते, याची ग्वाही देणारा होता; पण आरंभशूरतेचे ग्रहण लागलेल्या राज यांनी पुढे काही केले नाही. ज्या मोदींचे जाहीर कौतुक करण्यात त्यांनी आघाडी घेतली, त्याच मोदींना दूषणे देण्यासाठी ते काही विशिष्ट गावी लोकसभेच्या प्रचारात उतरले. ‘मनसे’चे उमेदवार नव्हतेच, त्यामुळे मग निष्ठा विकल्याचा आरोप झाला. काही स्वयंसेवी संस्थांची माहिती हाच राज यांच्या हल्ल्याचा स्त्रोत. विधानसभेत ते कुंपणावर थांबले नाहीत. ‘मनसे’ मैदानात उतरली, तेव्हा थक्‍क करणारी मते पुन्हा एकदा मिळाली. ही त्या वेळी एकत्र असलेल्या भाजप -शिवसेनेच्या कारभारावर नाराज असलेली मते असावीत. तरुणांची अस्वस्थता या मतातून व्यक्‍त झाली, असा कयास करता येईल.

आता राज ठाकरे यांनी ‘मनसे’च्या स्थापनेला चौदा वर्षे झाल्याचे निमित्त साधून पुन्हा पक्षात प्राण फुंकण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना धर्मनिरपेक्ष आघाडीत गेल्याने आक्रमक हिंदुत्वाची जागा रिक्‍त आहे, असे म्हणावे तर ‘आपण सीएए विरोधक नाही’, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगून टाकले आहे.  काही वर्षांपूर्वी राज यांनी बांगला तसेच अन्य घुसखोरांवर माहितीपूर्ण फिल्म तयार केल्या होत्या, आंदोलन छेडले होते. ते घुसखोरांविरोधात आहेत, याचे विस्मरण एव्हाना झाले आहे. पक्ष जिवंत आहे हे दाखवण्यासाठी आता ‘मनसे’ने पुन्हा हा मुद्दा हाती घेतला आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

भूमिपुत्र विरुद्ध उपरे हे लढे बाहेर तीव्र होत असताना मुंबईत बोथट झाले आहेत. भाजप एकाकी पडला असला तरी तो ‘मनसे’ला मनापासून स्वीकारण्यास तयार नाही. जे मोदीशहा आपल्यासमवेत राहणाऱ्या शिवसेनेलाच माफ करत नाहीत, ते झाले गेले विसरून राज यांना स्वीकारतील? हिंदीभाषक भाग हा भाजपचा बालेकिल्ला आहे, तेथे राज बोथट झाले आहेत. प्रश्‍न फारसे सोपे नसतात. ‘तुझा तू वाढवी राजा’ म्हणण्यासारखी परिस्थितीही नसते. त्यामुळेच पक्षाच्या आयुष्याची मशाल पुन्हा पेटवणे तसे कठीणच आहे. शक्तिप्रदर्शनाचे, पक्षात प्राण फुंकण्याचे प्रयत्न वैचारिक आव्हाने बरोबर घेऊन येणार आहेत, याची राज यांना जाणीव असेलच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article mrunalini naniwadekar