राजधानी मुंबई : आता दिसू दे सरकार

Mahavikasaghadi
Mahavikasaghadi

सत्तेत राहण्याच्या एकमेव उद्देशाने आघाडी सरकारे स्थापन होतात आणि सायासाने मिळवलेली सत्ता राखणे या एकमेव उद्देशाने कामे करतात. सत्ता राखणे या संकल्पनेत स्वपक्षाचा विस्तार, सहकारी पक्षाला अंकीत ठेवणे, जमेल तेथे समोरच्याला न दुखावता कुरघोडी करणे अशा बाबी येतातच, पण जनतेकडे लक्ष देणे आणि प्रश्न सोडवणे असे एक पोटकलम त्यात असतेच. सत्तेची मोट बांधताना हे पोटकलम सर्वाधिक महत्त्वाचे आहे हे विसरून चालत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष पक्षांशी तडजोड करून सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारसमोर शंभरच्या वर जागा जिंकलेला भाजप विरोधी पक्ष म्हणून उभा आहे. सत्तारूढ आघाडीत भले भले नेते आहेत, अनुभव आहे. राज्यातल्या भाजपकडे तसे काही नाही. दिल्लीतले मोदी- शहा हेच येथील कारभारी देवेंद्र फडणवीस यांची शक्ती आहेत. या दोघांना महाराष्ट्रातल्या सत्ताप्रयोगात सध्या रस नसल्याचे लक्षात आल्याने फडणवीस गावोगाव फिरत आहेत. वेळप्रसंगी निवडणूक आलीच तर ती राखण्याचे आव्हान पेलायला भाजप सरसावलेली दिसते. फडणवीस जागोजाग फिरताहेत. सरकार पाडणे शक्‍य नाही, हे फसलेल्या शपथविधीने त्यांना कळले असावे. त्यामुळे ‘आम्हाला सत्तेच्या खेळात रस नाही,’ असे सांगत सेवेचे नाव घेतले जाते आहे. त्यांना द्राक्षे आंबट वाटत असतील; निदान विरोधक फिरताहेत तरी; पण सत्ताधाऱ्यांचे काय?

मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान
विरोधी पक्ष सक्रिय झाला की सत्ताधारी अस्वस्थ होतात, एकत्रही येतात आणि कामाला लागतात असा अनुभव. दुखावलेला पक्ष पोराटोरांचा का असेना सक्रिय झाला ही धोक्‍याची सूचना असल्याचे लक्षात घेत ‘राष्ट्रवादी’चे मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार कामाला लागले आहेत. पण बाकी सरकार मात्र आपल्याला पाडणार तर नाहीत ना या धास्तीतच दिसतात. मुख्यमंत्री ठाकरे कमालीचे आग्रही आहेत. ते नव्या आघाडीतही फारसे वाकत नाहीत. शिवसेनेचे पारनेरसारख्या आडगावातले नगरसेवक त्यांनी ‘राष्ट्रवादी’तून परत आणले. त्यांना न विचारता पोलिसांच्या ज्या बदल्या झाल्या, त्या त्यांनी रद्द केल्या. रात्रंदिवस राबणाऱ्या मुंबई पोलिस दलाचे प्रमुख निर्णय बदलल्याने नाराज होतील याची तमा न बाळगता आपण या राज्याचे प्रमुख आहोत हे दाखवण्यास त्यांनी मागेपुढे पाहीले नाही. त्यांच्या या स्वाभिमानी वागणुकीमुळे सरकार कुणाचे हे तर राष्ट्रवादी काँग्रेसलाच नव्हे, तर प्रशासनालाही कळाले, पण शिवसैनिकांचे काय ?

नागरिकांना हवा दिलासा
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी एकजीव असल्याचा दाखला देण्यासाठी मुखपत्रात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखती प्रसिद्ध होणार आहेत. ठाकरे पिता-पुत्रांना आजवर मिळालेला मान आयता चालत येणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमाई, पण शिवसेनेचे यात काय होते आहे ? आज मुख्यमंत्रिपद लाभलेल्या या पक्षाच्या बालेकिल्ल्याला ‘कोरोना’ने घेरले आहे. मुंबई आजारी आहे अन्‌ फैलाव आता मुंबईलगतच्या शहरांत पसरला आहे. ठाणे जिल्हा शिवसेनामय. मुंबईत शिवसेनेच्या रुग्णवाहिका दिसत नाहीत, शाखा सक्रिय नाहीत अशा तक्रारी सुरू आहेत. मंत्रालयात शिवसेनेचे अस्तित्व नाही अशी टीका आहे.

आजवर मुंबईत रुग्णव्यवस्थापन नीट होत नव्हते, आता तीच तक्रार ठाण्याबाबत सुरू झाली आहे. अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेवर औषधोपचार तर दूर, मलमपट्टीही स्वातंत्र्योत्तर काळात कधी केली गेली नाही. मुंबई सभोवतालचा परिसर सुजला, पण नागरी सुविधा वाढल्याच नाहीत. मुंबईचा इलाखा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने पिंजून काढला. येथील मराठी माणसाला भावनात्मक आधार दिला. ऐहिक उत्कर्ष कधी रडारवर आला नाही, भावनांच्या धुमाऱ्यात ते आवश्‍यक वाटलेच नसावे. बाळासाहेबांचे पुत्र  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर ‘कोरोना’ची साथ आली हे दुर्दैव. पण संकटात संधीही दडलेली असते. ती हेरावी लागते. 

परप्रांतांतले कामगार गावी परतल्याने उद्योगांची गरज भागवण्यासाठी ‘महाजॉब्ज’सारखे उपक्रम सुरू झाले आहेत, ते मतदारांपर्यंत पोहोचतील काय ? गरजूंना कामे मिळतील काय? मुख्यमंत्री आता रोज बैठका घेताहेत. युतीच्या कार्यकाळातले अधिकारी त्याच जागांवर आहेत. ते नव्या सरकारला आपले मानताहेत की हे औटघटकेचे कारभारी आहेत या समजात आहेत? मंत्र्यांना जसे राजकीय नेत्याचे संदेश गरजेचे वाटतात, तसेच नोकरशाहीलाही आदेश आवश्‍यक असतात. ‘कोरोना’ची लढाई मोठी, त्यासाठी सजग, सक्रिय सरकार आवश्‍यक आहे. फडणवीस फिरले तर बातमी होईल, पण सरकार हलले तर दिलासा मिळेल. कुरघोडी आणि प्रत्यारोपांची ही वेळ नाही. लढाई जिंकण्यासाठी मैदानात उतरणे उद्धवजींची प्रतिमा लोकप्रिय करणारे ठरेल. ती त्यांची गरज आहे अन्‌ दिलासा शोधणाऱ्या नागरिकांचीही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com