आव्वाज कुणाचा...?

मृणालिनी नानिवडेकर
Saturday, 31 October 2020

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोकळेपणाने बोलले. फेसबुक लाइव्हवरची त्यांची मनोगते अन् दसऱ्याचे भाषण यांत जमीन-अस्मानाचे अंतर होते. मुख्यमंत्रिपद ते कसे सांभाळताहेत यावर मतभेद  असू शकतील; पण पक्षाचे कार्यप्रमुखपद मात्र ते उत्तमरीतीने सांभाळत असल्याचे दसरा भाषणाने दाखवून दिले.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोकळेपणाने बोलले. फेसबुक लाइव्हवरची त्यांची मनोगते अन् दसऱ्याचे भाषण यांत जमीन-अस्मानाचे अंतर होते. मुख्यमंत्रिपद ते कसे सांभाळताहेत यावर मतभेद  असू शकतील; पण पक्षाचे कार्यप्रमुखपद मात्र ते उत्तमरीतीने सांभाळत असल्याचे दसरा भाषणाने दाखवून दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख  या नात्याने उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते. कोरोना हाताळण्यात ते प्रशासक या नात्याने फार यशस्वी झाले नसले तरी पक्षसंघटनेत प्राण फुंकण्यात ते यश मिळवू शकतात. आम्ही हिंदुत्वाला तिलांजली देणार नाही अन् वारसदार आदित्यची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, ही या भाषणातील महत्त्वाची विधाने.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवी महाविकास आघाडी उभारणे शिवसैनिकांना, जनतेला रुचले आहे काय हे कळायच्या आत कोरोनाने कहर केला. महाराष्ट्र सर्वाधिक ग्रस्त राज्य ठरले. महाविकास आघाडीत अनुभवी मंत्र्यांचा समावेश. सर्वोत्तम ठरावा, असा मंत्र्यांचा संघ. तरीही ना खाटा मिळू शकल्या ना उपचार. आता कहर ओसरतो आहे. जनता सरकारला माफ करेल की संधी मिळताच घरी पाठवेल, याचे उत्तर काळ देईल. मुख्यमंत्री ठाकरे त्यावर विचार करत असतीलच; पण या काळातील बदनामीला पुरून उरण्याची इच्छा पक्षप्रमुख ठाकरेंमध्ये दिसते आहे. भाजपप्रणीत आक्रमकतेला आपण उत्तर देऊ शकू अशी खात्री त्यांनी सैनिकांमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जागवली आहे. उद्धव ठाकरे जे बोलले, ते शिवसैनिकांमध्ये प्राण फुंकणारे होते. 

आरोपांना आक्रमक उत्तरे
मुळात शिवसेना-भाजपची महाराष्ट्रातील ताकद भौगोलिक सीमात वाटली गेलेली. ‘मिल बाट के’ हा दोहोंचा तह. ते मागे टाकून, सैद्धान्तिक भूमिकेला तडा देऊन स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार शिवसेना पक्षाला भावले काय? या सत्तेत शिवसैनिकांचा जीव रमतोय का? काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली जवळीक हिंदुत्वाचे कोंदण ल्यायलेल्या मराठमोळ्या कार्यकर्त्यांना आवडतेय का? प्रश्नांची ही जंत्री उपस्थित करण्यात शिवसेनेचे विरोधक यशस्वी झाले होते. मोदी ब्रॅण्डशी ठाकरे कुलोत्पन्नांनी घेतलेली फारकत मोठी आगळीक आहे, हा प्रचारही होत होता. कोरोना हाताळण्यातील गफलतीही ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत होत्याच. त्यातच सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूशी आदित्य ठाकरे यांचा संबंध जोडून शिवसेनेच्या वाटचालीसमोर यक्षप्रश्न उभा केला गेला होता.

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला कलंकित करणाऱ्या प्रचाराला शिवसेना पुरून उरेल की गोंधळून जाईल, या शंकेला उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात, उशिराने का होईना, पण उत्तर दिले. आदित्य यांचे पदार्पणातच मंत्री होणे भुवया उंचावणारे खरे. पण मुलाला राजकारणात स्थिर करण्याचा निश्‍चय ठाकरे यांनी केला असल्याने या प्रश्नार्थक नजरांकडे त्यांनी दुर्लक्ष केले असावे. आदित्य आधुनिक पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांना राजकीय जबाबदारी झेपेल काय, याबद्दल आजच बोलणे अनुचित; पण कोणत्याही परिस्थितीत ते सत्ताकारणाच्या केंद्रबिंदूच्या आसपास असतील हे ठाकरे यांनी सांगितले. बरेच केले. ताकाला जाऊन भांडे लपवण्यात अर्थ नसतोच. महाराष्ट्र आदित्य यांना स्वीकारेल का ते पहायचे.

हिंदुत्वावर दावा
भाषणातला दुसरा मुद्दा आहे हिंदुत्वाचा. महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवते हा समज सर्वदूर पसरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या सरकारला त्यांची इच्छा असेल त्या दिशेला नेईल, अन सत्तेवाचून जगू न शकणारी काँग्रेस या समविचारी पक्षाला बळ देईल. शिवसेनेला त्यांच्या मागे फरफटत जावे लागेल असे चित्र. त्या समजांना सैनिकांनी दूर लोटावे हे सांगण्यावर उद्धव ठाकरे यांनी भर दिला. पक्षसंघटनेत प्राण फुंकण्यासाठी ते आवश्‍यक होते. कोरोना हाताळणीच्या अपयशामुळे शिवसैनिक आतून हलला आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक संकटात मदतीला धावून येणारी शिवसेना कुठेच दिसली नसल्याने नागरिकही गोंधळले आहेत.या अपयशी भावनेतच  कंगना राणावतपासून राजभवनापर्यंतची चमू मैदानात उतरली. तिच्या आगलाव्या वक्तव्यांनी शिवसैनिक विद्ध झाले. मुंबईला पाकव्याप्त कश्‍मीर म्हटल्याने जो परिणाम झाला तो उलटा आहे. हताश सैनिकांना उभारणी देणारा आहे.

अमराठी मंडळी कारस्थान करत असल्याचे शिवसैनिकाला वाटते. दुसरीकडे मतदाराला भाजपचे हिंदुत्व, मोदींचा विकासवाद भावू शकतो. राममंदिर उभारणी, फ्रान्समध्ये सुरु झालेली  धार्मिक हिंसा यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर पुन्हा येईलही. अशा वेळी बाळासाहेबांच्या हिंदुत्वात तयार झालेला शिवसैनिक अस्वस्थ न झाला तरच नवल. त्याला चुचकारत समवेत ठेवणे आवश्‍यक असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले असावे. यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांचेही उल्लेख करण्यात आले. कुणाचे हिंदुत्व सरस हा खेळ लवकरच रंगेल.

कोरोनामुळे हतोत्साहित झालेल्या शिवसेनेच्या सैनिकांना कंगनाने रस्त्यावर आणले. शिवसेनेसारख्या भावनेवर चालणाऱ्या पक्षाला चिथावणीच कामाला लावते. बिहारमध्ये भाजपला यश मिळेल काय, यावर राज्यातील लढाईत कुणाला बळ मिळेल ते अवलंबून असेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article mrunalini naniwadekar