राजधानी मुंबई : परभणीचे वारे रोखता येतील ?

Sanjay jadhav-Uddhav Thackeray
Sanjay jadhav-Uddhav Thackeray

पुढच्या काळात आपले प्रभावक्षेत्र वाढविण्याची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्पर्धा खऱ्या अर्थाने होईल, ती मराठवाड्यात. राष्ट्रवादी काँग्रेसला तेथे विस्तार करायचा असेल तर तेथे प्रबळ असलेल्या शिवसेनेशीच दोन हात करावे लागतील.

राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. या राजकारणाला अनेक कंगोरे आहेत. ती राजकीय स्पर्धा जशी सत्ताधारी आणि विरोधकांतील आहे, तशीच महाविकास आघाडीतील घटक पक्षांतीलही आहे. परभणीतून मुंबईत पोहोचलेला खलिता हे ताजे उदाहरण. ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या हक्काची संधी हिरावून घेत आहे’ अशी तक्रार परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. प्रकरण अगदी साधे आहे. लोकसभा मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय प्रशासक महाविकास आघाडी सरकारमधील कोणत्या पक्षाचे असावेत, असा साधा सरळसोट प्रश्न. नवी समीकरणे आकार घेतात, तेव्हा आणाभाका घेतल्या जातात, त्या पाळण्याचे संकेत सर्वसाधारणपणे राजकारणातले सर्व पक्ष पाळतात. बाजार समितीचे अधिपत्य काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल, मग ते शिवसेनेला दिले जाईल असा करार  झाला होता; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने जे ठरले होते ते पाळले नाही, असे परभणीचे खासदार संजय जाधव यांचे म्हणणे. 

शिवसेना खासदाराची तक्रार
सत्तेसाठी एकत्र येताना सहा महिने राष्ट्रवादीचे अन पुढचे सहा महिने शिवसेनेचे ठरले,असे सांगितले जाते. हा अलिखित करार राष्ट्रवादी काँग्रेस पाळत नसल्याची खंतवजा खदखद जाधव यांनी मांडली. एका बाजार समितीबद्दल करार पाळला गेला नाही; अन अन्य समित्याही ताब्यात घेण्यात आल्या ही शिवसेना खासदाराची तक्रार. राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतेही जाहीर विधान विधान न करता या संपूर्ण प्रकरणात मौन बाळगले. दोन पक्षांत नेमके काय करारमदार झाले, हे त्या दोघांशिवाय कुणालाही माहित असणे शक्‍य नाही. त्यामुळे नेमके भांडण बाहेरच्यांना कळायचे नाहीच. प्रत्येक राजकीय पक्षाला सत्ता हवी असते. ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ असा मामला असतो. सर्वशक्तिनिशी लढत दिली जाते.

टोकाचे राजकारण 
परभणी हा ग्रामीण तोंडवळ्याचा मतदारसंघ. तेथे तर राजकारण टोकाचे असते. कृषी उत्पन्न बाजार समित्या कुणाच्या अखत्यारीत यावर बरेच काही अवलंबून रहाते. त्यामुळे छोट्या लढायाही मोठ्या असतात. मराठवाडयात आताआतापर्यंत धार्मिक आधारावर निवडणूक लढली जाई.भगवे वादळ नावाने ओळखले जाणारे शिवसेनाप्रमुख बहुतांश निवडणुकात परभणीला प्रचारसभा घेत.अशा सभांमुळे धृवीकरण सोपे होते हे त्यामागचे गणित.या भागात शिवसेनेच्या झंझावाताला रोखण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ कायम उभी राहिली ती विरोधी विचार घेवून. आज अचानक दोघांनीही एकत्र येण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला असला तरी तो गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांना मान्य झाला काय, हा विषय महत्वाचा आहे. किंबहुना तो निवडणुकांचे दिवस आल्यावर तिन्ही पक्षांना भेडसावणार होताच. खासदार संजय जाधव यांच्या पत्राने तो आताच ऐरणीवर आलेला दिसतो. शिवसेनेच्या गोटातून बाहेर येणाऱ्या बातम्या बोलक्‍या आहेत. ‘तुम्ही आता आमचे अशासकीय सदस्य नेमू द्या; अन्यथा आमच्या पक्षावर अन्याय होईल, आता फेरविचार करा’ अशी विनंती शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना केली गेली. शिवसेनेचे सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांनी याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अन परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक या तिघांशीही चर्चा केली, असे म्हणतात. त्यानंतर काही होत नसल्याने आपले आपल्याला मिळावे, अशी भावना जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली .

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना जेथे लोकसभा निवडणूक लढवते तेथे बहुतांश ठिकाणी समोर राष्ट्रवादी काँग्रेस असते. बहुतांश ठिकाणी निवडणुकीतील वादविवाद विसरले जात नाहीत. ते दैनंदिन व्यवहारात प्रतिबिंबित होत असतात. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून आज नाराजी पुढे आली आहे. तिची दखल कशी घेतली गेली, यावर पुढे काय हे अवलंबून असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अत्यंत काळजीपूर्वक राज्यभर विस्तारवादी पावले टाकत आहे. पश्‍चिम महाराष्ट्र त्यांचा बालेकिल्ला. कोकणात, मुंबईत ‘राष्ट्रवादी’चा प्रभाव नाही. त्यामुळे आणखी जागा वाढवण्याची लढाई खऱ्या अर्थाने होईल ती मराठवाड्यात. तेथे हातपाय पसरायचे असतील तर स्थानमाहात्म्यात प्रबळ असलेल्या शिवसेनेशीच दोन हात करावे लागतील. त्याचा प्रारंभ तर झाला नाहीये ना, असा प्रश्न परभणीने पुढे केला आहे. महाविकास आघाडी सरकार हा ठाकरेंचा चक्रव्यूह असल्याचे भाजप म्हणत असते. संजय जाधव शांत झाले आहेत; पण असे आणखीही कुठे घडू शकेल; किंबहुना बऱ्याच ठिकाणी पुढे होणाऱ्या अंतर्गत युद्धाची ही ठिणगी तर नसेल? 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लढाईला प्रारंभ
भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलेले तिन्ही पक्ष कदाचित प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एकत्रित उमेदवार रिंगणात उतरवतील. पण तो उमेदवार कोणत्या पक्षाचा हाही प्रश्न महत्वाचा ठरेल. अधिकाधिक मिळवण्याच्या शर्यतीत आजवर समोर भाजप असे. ‘कमळाबाई’ शब्दाबाहेर जात नाही, असे थोरले ठाकरे आवर्जून सांगत. आता भिडू बदलले आहेत. चार पक्षांच्या राजकारणात भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय प्रतिस्पर्धी कधीही एकत्र येणार नाहीत. त्यांच्या भूमिका स्पष्ट असतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक पक्ष एक होवू शकतील; अन् पडद्यामागे समोरासमोरही उभेही ठाकू शकतील.या खेळात जास्त हुशार, चाणाक्ष कोण हे धसास लागणार आहे. परभणीतून या लढाईला प्रारंभ झाला आहे, असे मानण्यास वाव आहे.

सबुरीचे कारण
उद्धवजी आता केवळ पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेवू शकत नाहीत. आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यांना तिन्ही पक्षांना न्याय देणारा निर्णय घ्यावा लागणार आहे. पक्षालाच चुचकारून निर्णय घेवून चालणार नाही. सहकारी पक्षांना सांभाळून घेत पुढे जावे लागणार असल्याने उद्धवजींनी जाधवांना शांत करीत राजीनामा मागे घेण्यास सांगितले असणार. राजीनामा आज म्यान झाला आहे. तसाही तो लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला गेला नव्हताच. नाराजीची दखल घ्या, हे पक्षप्रमुखांना कळवणे एवढाच त्यामागचा उद्देश.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com