कधी संपणार काँग्रेसमधील निर्नायकी!

Congress-Rally
Congress-Rally

पक्षातील वरिष्ठांनी फारसे प्रयत्न न करता काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगला कौल मिळून सत्ताही मिळाली. मात्र पक्ष नेतृत्वाबाबत रोज उठणाऱ्या वावड्या गोंधळात भर घालत आहेत. त्यामुळे ताकदीचे नेते असूनही पक्ष नेतृत्वहीन झाल्यासारखी स्थिती आहे.

महाराष्ट्राचा एकेकाळचा राजकीय स्वर असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार, यावर सध्या दररोज चर्चा झडत असते. कधी कधी तर दर दोन तासांनी नवे नाव पुढे येते. मागच्या नावाचे काय झाले, याबद्दल कोणी काही विचारतही नाही अन्‌ बोलतही. स्वनामधन्य नेत्यांप्रमाणे स्वत:चीच नावे प्रदेशाध्यक्षासाठी पुढे केली जातात. खरी निवड कोणाची हे कोणाला विचारायचे हा प्रश्न आहेच. राहुल गांधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांच्या या टाळमटाळीला विरोध करणाऱ्या ‘जी’ या बंडखोर गटातील एकाकडेही पक्षाला नेतृत्व देण्याची क्षमता नाही. गांधी घराण्याच्या आभेत जगणारे हे परप्रकाशित नेते पक्षाची चिंता करत आहेत खरे; पण त्यांचे प्रभावक्षेत्र एकेका मतदारसंघापुरते तरी आहे का? हा प्रश्न आहेच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्रह भलतेच उच्चीचे असावेत, त्यामुळेच एकेकाळी देशव्यापी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची मरगळ काही केल्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. शेतीकायद्यांना विरोध होतो आहे. कोरोनोत्तर अर्थकारणाचे काय? साथीत गमावलेल्या नोकऱ्यांचे काय, असे प्रश्न विक्राळ होत आहेत. पण त्याबाबत जाब विचारायची शक्ती क्षीण काँग्रेसमध्ये उरलेली नाही. 

महाराष्ट्रात मात्र तुलनेने काँग्रेसचे बरे सुरु आहे. संख्यात्मक ताकद नसतानाही काँग्रेसच्या ऱ्हासामुळे महाराष्ट्रात तयार झालेली राजकीय जागा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा तीन पक्षांनी व्यापली. या चारचौघांमध्ये सर्वात कमी जागा जिंकल्या असतानाही काँग्रेस आज राज्यात सत्तेत आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेसमवेत जाणे राहुल गांधींना फारसे पसंत नव्हते. तरुण आमदारांच्या रेट्यापुढे हतबल झालेल्या काँग्रेस नेतृत्वाने सत्तेत सहभागी होण्याची परवानगी दिली ती नाराजीनेच. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ४४जागा जिंकल्या. खरे तर कुठल्याही केंद्रीय नेत्याने महाराष्ट्राकडे लक्ष दिले नव्हते. बड्यांना आपापल्या वारसदारांची चिंता होती. ते मतदारसंघ केंद्रीत होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करणारी राष्ट्रवादी काँग्रेस निकराने लढत होती. पावसाची तमा न बाळगता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रचार करत होते. निकराची झुंज असल्याचे जे भान या प्रादेशिक पक्षाला होते, ते राष्ट्रीय अस्तित्व असणाऱ्यांना नव्हतेच. लोकसभेत जेमतेम एक खासदार निवडून आला, माजी मुख्यमंत्रीही हरले. विधानसभेतही पक्षनेतृत्वाला काय करावे ते सुचत नव्हते. पण २०१४पेक्षा अंमळ जास्तच जागांवर पक्षाचे उमेदवार ऩिवडून आले. दोनने संख्याबळ वाढले. शिवाय, निवडून आलेली मंडळी एका विशिष्ट भागापुरती सीमित नव्हती; तर विदर्भासारख्या गडकरी-फडणवीसांच्या प्रभावक्षेत्रात आमदारांनी मतदारसंघ राखले. आदिवासी भागात के. सी. पडवी निवडून आले.

घराण्यांनी जपली परंपरा
देशमुख बंधू, विश्वजित कदम, सतेज उर्फ बंटी पाटील, अमित झनक, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड अशांच्या विजयाने नेत्यांनीही घराण्यातली काँग्रेस परंपरा राखली. या तरुणांना खरे तर स्वत:च्या मतदारसंघाबरोबरच एकेक आमदार सहज निवडून आणता आला असता. पण त्यांच्यात ही महत्त्वाकांक्षा दिल्लीने पेरलीच नाही. हायकमांड खिळखिळी झाली असेल तर कोपराने खणले जाते. हट्ट वाढतात. तरूण तुर्कांसमोर मान तुकवायची वेळ आली. पक्षफूट रोखण्यासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय झाला. आता जे झाले त्याचा फायदा घेण्याचे भान हवे. विधान परिषद निवडणुकीत ते दाखवले गेले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून धोरणी वाटाघाटी केल्या. नागपूरसारखी भाजपची पारंपारिक जागा काँग्रेसने जिंकली. सत्तासंधीचे सोने करण्यासाठी प्रयत्न अधिक व्यापक हवेत. चातुर्याची जोड हवी. 

...कोण पुढे पळे
अहमद पटेल यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘नाही रे वर्गाची काळजी घ्या’ असे पत्र काँग्रेसने पाठवले. ही मतभेदाची सुरुवात तर नाही? सत्तेसाठी काँग्रेसची शिवसेनेला गरज तरीही उद्धव ठाकरे यांनी मतपेढी शाबूत ठेवायला संभाजीनगर, धाराशीव असे नामबदल वापरणे सुरु केले. सत्तेसाठी एकत्र आलेल्यांची विचारसरणी वेगळी आहे, हे लक्षात ठेवूनच पुढची वाटचाल तिघेही करताहेत हे उघड आहे. ‘पळा पळा कोण पुढे पळे’चा हा प्रकार आहे. त्यामुळेच दररोज प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा, तीही हायकमांड अस्थिर असताना नुकसानकारक ठरेल. 

विदर्भात काँग्रेसला लक्षणीय यश मिळाले. सुनील केदार, यशोमती ठाकूर हे सतत जिंकणारे आमदार. नितीन राऊत पुन्हा निवडून आले आहेत. दमदार नेतृत्व. पण वीजबिलमाफी प्रत्यक्षात आणू शकले नाहीत. विजय वडेट्टीवार आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे दबंग नेते. काँग्रेस बाहेर जावून आलेले. त्यातील नानाभाऊंवर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल, असे म्हणतात. भाजपमध्ये असताना थेट मोदींना आव्हान देण्याची त्यांची जिद्द सगळ्यांनी पाहिली. महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मराठा राजकारणाला शह देण्यासाठी ते ओबीसींची मोट बांधत गेली दोन वर्षे पायाला भिंगरी लावून फिरताहेत. हा जातीय समीकरणाचा बदल काँग्रेसला लाभाचा ठरेल का याचा विचारही झाला असणारच.

ही अंतर्गत लोकशाही?
काँग्रेसचे नवे प्रभारी पाटील फोनवरून मते जाणून घेत अध्यक्षांच्या नेमणुका करतात. ही अंतर्गत लोकशाहीतून निवडणूक म्हणे. मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी मनहास यांना सर्वाधिक पसंती असतानाही मुंबईची जबाबदारी सोपवली गेली भाई जगतापांवर. त्यांचा जनतेतला वावर जास्त, चेहरा ज्ञात. नाना पटोलेंही आक्रमक आहेत. एक मराठा एक गैरमराठा अशी दोघांची जोडी तयार होईल. मात्र तसे खरेच करायचे असेल तर रोज नव्या चर्चा घडवण्याऐवजी एकदाच काय तो निर्णय होणे आवश्‍यक आहे. निर्नायकीतल्या काँग्रेसला हे समजते काय? राष्ट्रीय अध्यक्षपद जूनपावेतो ठरणार नाही. त्यामुळे राहुल गांधींच्या पसंतीचा प्रदेशाध्यक्ष मनापासून स्वीकारला न जाण्याचा धोका जास्त आहे. काँग्रेसच्या वाटचालीतला हा खडतर कालखंड आहे. इथे कर्तृत्ववान प्रदेशाध्यक्षाची गरज आहे. 

झुंजणारे नेते उपेक्षित
महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये मात्र भलतेच घडतंय. भाजपला सत्तेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पृथ्वीराज चव्हाण निर्णयप्रक्रियेत कुठेच नाहीत. मुंबईत पक्षाचा तिरंगा कायम फडकावत ठेवणारे अमिन पटेल मंत्री नाहीत, अन्‌ भाजपच्या अंतर्गत विरोधामुळे काँग्रेसमध्येच राहावे लागलेले तरुण मंत्री झाले आहेत. तर्कशास्त्र गुंडाळून ठेवणारा पक्ष भविष्याचे आव्हान पेलू शकतो काय? विचार करायची गरज आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com