
Mumbai : मुंबई डेक्कन एक्सप्रेस मध्ये विसरली 44 तोळे दागिन्यांची बॅग 24 तासात लागला छडा
डोंबिवली : हैदराबाद– मुंबई डेक्कन एक्सप्रेसने प्रवास करत असताना एक प्रवासी आपली बॅग एक्सप्रेस मध्येच विसरला. प्रवासी कल्याण रेल्वे स्टेशन ला उतरल्यावर त्याच्या ही बाब लक्षात आली. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बॅग मध्ये तब्बल 44 तोळे सोने व चांदीचे दागिने असल्याने रेल्वे गुन्हे शाखा व विशेष कृती दलाने जलद गतीने तपास करत 24 तासात बॅग घेऊन पसार झालेल्या इसमाचा शोध घेतला. त्याच्याकडून 23 लाख 55 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
हैदराबाद– मुंबई डेक्कन एक्सप्रेसने कल्याणपर्यंत प्रवास करत असताना एका प्रवाशाची 44 तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे दागिने असलेली बॅग कल्याण स्टेशनला उतरताना रेल्वेत राहिली होती. कल्याण रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर दागिने असलेली बॅग ट्रेनमध्ये विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रार दाखल होताच कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे, रेल्वे गुन्हे शाखा, एसटीएफ पथकाने बॅगेचा शोध सुरू केला. कल्याण, दादर, सीएसटी रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. याच दरम्यान दादर रेल्वे स्टेशनवर एक इसम तक्रारदाराने दिलेल्या वर्णनाची बॅग घेवून जाताना आढळून आला. सदर संशयित इसमाच सीसीटिव्ही फुटेज व तात्रिक माहितीच्या अधारे तपास केला असता, नमुद इसम हा अहमदाबाद राज्य गुजरात येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली
वरिष्ठांच्या आदेशान्वये विशेष कृती दलाचे पथक हे अहमदाबाद येथे रवाना झाले. संशयित इसमांचा शोध घेवुन तपास केला असता तो त्या ठिकाणी आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याजवळ बॅग आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडून 44 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 1 किलो 477 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने असे एकुण 23 लाख 55 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली ट्रॉली बॅग जप्त केली आहे.