
डोंबिवली : हॉर्न वाजविल्याचा राग आल्याने रिक्षा चालकासह सात जणांनी श्री सदस्यांना बांबूने मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना मलंग पट्ट्यातील खरड गावात घडली आहे. खरड येथील झाडांना पाणी घालण्यासाठी व गवत काढण्यासाठी श्री समर्थ यांचे सेवेतील श्री सदस्य हे रविवारी सकाळी निघाले असता 7 च्या दरम्यान ही मारहाण झाली. याप्रकरणी रिक्षाचालक विजय पावशे, रोशन पावशे व त्याचे इतर 6 साथीदारां विरोधात हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री समर्थ यांचे सेवेनिमित्त खरड येथील गावदेवी मंदिर परिसरात झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांना पाणी घालणे, आजूबाजूचे गवत काढणे, त्यांची देखभाल करण्याचे काम सेवेतील श्री सदस्य करीत असतात. खोणी येथे राहणारा प्रसाद ठोंबरे (वय 23) हा रविवारी सकाळी झाडांना पाणी घालण्यासाठी साथीदार व श्री सदस्य जय ठोंबरे, मोरेश्वर यांच्या सोबत दुचाकीवर निघाला होता. खरड परिसरात त्यांची दुचाकी आली, यावेळी त्यांच्या स्कुटीच्या पुढे असलेल्या रिक्षा चालकाला जयने हॉर्न दिला.
याचा राग रिक्षाचालक विजय पावशे यास आल्याने त्याने जय व मोरेश्वर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रसाद हा मध्ये पडला असता विजयने फोन करुन रोशन व त्याच्या इतर 6 साथीदारांना बोलावून घेतले. यावेळी वाद होऊन रोशनने हातातील कोयत्याने प्रसाद याच्या पायावर वार करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून नेली. तर जय व मोरेश्वर यांना विजयच्या साथीदारांनी बांबूने मारहाण केली. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरिक्षक आर. के. खेरडे याचा अधिक तपास करीत आहेत.