भाषिक हुकूमशाही... दुसऱ्या भाषेचा द्वेष करणे आवश्‍यक आहे?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो, हे सांगण्यासाठी दुसऱ्या भाषेचा द्वेष करणे आवश्‍यक नाही, हे सांगावे का लागावे? विद्वेषातून जन्म घेतो तो केवळ विद्वेषच. भाषिक सौहार्द जपण्यासाठी तुम्ही तुमचा भाषिक अभिमान गहाण ठेवण्याची गरज नसते; तर योग्य दिशेने प्रयत्न करणे आवश्‍यक असते. 

मुंबईत तेही दादरसारख्या मराठीबहुल भागातील दुकानांवर गुजराती भाषेत पाट्या दिसल्याने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पित्त खवळले आणि खळ्ळखट्ट्याक्‌ झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या पाट्या पार उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या या आंदोलनाचे आश्‍चर्य मुंबईकरांना हल्ली वाटेनासे झालेय. कुणी तरी (बहुधा टीव्हीवरच्या कुठल्या तरी चर्चेत) म्हणालेही, मनसेची मुळे मुंबईतून संपूर्ण उखडू नयेत म्हणून यांनी बहुधा पाट्या उखडायला घेतल्यात...
यातली गंमत सोडून देऊ; पण मनसेच्या जन्मापासून त्यांनी केलेल्या आंदोलनांची उजळणी केली तरी हे लक्षात येते की, अशा स्वरूपाची खळखट्याक्‌ आंदोलने हाच या पक्षाचा स्थायीभाव राहिला आहे. राज ठाकरेही त्याचा 'गौरवाने' उल्लेख करतात.

रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना कल्याणमध्ये झालेली मारहाण असो, दादरला अमराठी टॅक्‍सीचालकांच्या फोडलेल्या गाड्या असोत किंवा डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या विरोधात केलेले आंदोलन. या साऱ्या आंदोलनातले मुख्य सूत्र एकच. खळ्ळखट्याक्‌.
सत्तरीच्या दशकात अमिताभचा 'ऍग्री यंग मॅन' फार लोकप्रिय होता. त्याच्याच आगेमागे बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी बोली लोकप्रिय होऊ लागली होती. व्यवस्थेविरुद्धची बंडखोरी अनेकांनी त्यांच्या रूपात पाहिली. सामान्यांच्या मनातला संताप व्यक्त करणारी व्यक्ती किंवा संघटना त्यांना जवळची वाटणे साहजिकच होते. पण काळानुरूप बदल होतातच. अमिताभच्या भूमिकांमध्ये झालाच, शिवसेनेच्या भूमिकेतही झाला!
शिवसेनेपासून वेगळे होताना राज ठाकरे यांच्या मनात कदाचित हीच काही गणिते असतील. त्यांच्या भाषणात ठाकरी शैली होतीच, आंदोलनातही ती त्यांनी आणली. तीही बरोबर शिवसेना मवाळ होऊ लागली असताना.
पण कोणत्याही समस्येवर हे आंदोलन हाच रामबाण उपाय असल्याची त्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत होऊ लागली असावी... जी साफ चुकीची आहे.

चुकीच्या गोष्टी मोडूनच टाकायला टाकायला हव्यात हे बरोबर; पण त्यानंतर सुयोग्य गोष्टींची उभारणीही करायला हवीच ना...
म्हणूनच मूळ प्रश्न हा की, मनसेच्या आंदोलनातून नेमके साध्य काय होते? नाही म्हणायला मनसेच्या ध्येयधोरणात मराठी पाट्यांचा मुद्दा आहेच. त्यामुळे मराठीत नसलेल्या पाट्या फोडून टाकणे हा आमच्या धोरणाचाच एक भाग असल्याचा युक्तिवाद ते करूच शकतात. पण मराठी भाषेच्या विकासासाठी केवळ हाच एक मार्ग आहे? तोच एकच मुद्दा महत्त्वाचा आहे?
मुंबई या बहुभाषिक शहरात विभागनिहाय वेगवेगळे भाषिक समूह असू शकतात आणि व्यापारी क्‍लृप्ती म्हणून त्यांच्या भाषेत दुकानाचे फलक असूही शकतात. नियमानुसार दुकानाचे फलक कोणत्याही आणि कितीही भाषांमध्ये असू शकतात, फक्त त्या भाषांमधली एक मराठी असायला हवी. मराठीसाठी हा इतपत आग्रह योग्यच आहे. पण इतर भाषा सरसकटच नको म्हणणे मुंबईसारख्या शहरात तरी योग्य नाही.
स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो, हे सांगण्यासाठी दुसऱ्या भाषेचा द्वेष करणे आवश्‍यक नाही, हे सांगावे का लागावे? विद्वेषातून जन्म घेतो तो केवळ विद्वेषच. भाषिक सौहार्द जपण्यासाठी तुम्ही तुमचा भाषिक अभिमान गहाण ठेवण्याची गरज नसते; तर योग्य दिशेने प्रयत्न करणे आवश्‍यक असते. 
बंगळूरमध्ये नुकतीच भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर एक गोलमेज परिषद झाली. त्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्रातून मनसेला खास निमंत्रण दिले होते. हिंदीविरोध या मुद्द्यावर मनसेने त्यात सहभाग घेतला. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये भाषिक अस्मिता प्रबळ असल्यामुळे त्यांचा हिंदीला कडवा विरोध आहे.

तमिळनाडूने सक्ती झुगारून ते सिद्धही केले आहे. बेळगाव सीमेवर मराठी विरुद्ध कानडी असा वाद सुरू असताना मनसे कन्नड रक्षण वेदिकेच्या परिषदेत सहभागी झाल्याची चर्चाही झाली. या परिषदेनंतर मुंबईत मराठी पाट्यांसाठी झालेले आंदोलन योगायोग नसावा, अशी नवी चर्चा सुरू झाली. बहुधा मनसेला तेच हवे असावे. कारण अशा आंदोलनामधून इतर काही साध्य होईल, असे वाटत नाही.
मुळात मराठीचा आग्रह धरणाऱ्या या नेत्यांची मुले कोणत्या शाळेत शिकतात, त्यांच्या व्यवहाराची आणि यांच्या व्यवसायाची कोणती भाषा असते, हे एकदा त्यांनी स्वतःलाच विचारून पाहावे आणि मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी गेल्या दहा वर्षांत काय नेमके प्रयत्न झाले, ते सांगण्याचा प्रयत्न करावा. (हो, हेही त्यांच्या ध्येयधोरणात आहे!)
मनसेच्या मराठी आग्रहाला विरोध असण्याचे कारणच नाही. पण मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी अन्य मार्ग पुष्कळ आहेत. अनेक संघटना त्यासाठी कार्यरत आहेतच. इतर भाषांतल्या पाट्या शोधण्याऐवजी अशा संस्था-संघटना शोधून त्यांना मदत केली ना, तरी ते (महा)राष्ट्रकार्य ठरेल.

Web Title: mumbai news language issue marathi gujarati