ताल से ताल मिला..!

नागेश भोसेकर
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

भारतीय संगीतात तालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशिष्ट वेळानंतर तबला, मृदंग, ढोल आणि अन्य चर्मवाद्यांसह दिला जाणारा ठेका हा संबंधित गाण्याची किंवा वादनाची खुमारी वाढवतो. गाणं किंवा वादन न कळणारा रसिकही ठेक्‍यावर, तालावर डोलू लागतो. तशी तर तालाची आपली ओळख मातेच्या गर्भात असतानाच झालेली असते.

 #यूथटॉक  
भारतीय संगीतात तालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशिष्ट वेळानंतर तबला, मृदंग, ढोल आणि अन्य चर्मवाद्यांसह दिला जाणारा ठेका हा संबंधित गाण्याची किंवा वादनाची खुमारी वाढवतो. गाणं किंवा वादन न कळणारा रसिकही ठेक्‍यावर, तालावर डोलू लागतो. तशी तर तालाची आपली ओळख मातेच्या गर्भात असतानाच झालेली असते. निसर्गातही ताल असतो, लय असते. घराच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा ताल किंवा गायीची धार काढताना ऐकू येणारा लयबद्ध आवाज आपल्या परिचयाचा असतो. सुतार पक्ष्याचा झाडाच्या खोडावरचा ‘नयनरम्य’ ठोका श्रवणसुख देणारा असतो. भवतालातील अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यामुळेच लयीशी, तालाशी तादात्म्य पावण्याचा अनुभव विलक्षण प्रत्ययकारी वाटतो. 

अलीकडच्या काळात नाद, लय आणि ठेक्‍याशी तरुणाईचं नातं अधिक गहिरं होत असल्याचं दिसून येतं. पूर्वी ऑर्केस्ट्रामध्ये कोपऱ्यात बसून ड्रम किंवा अन्य कोणत्यातरी तालवाद्याची संगत करणारा वादक आज प्रकर्षानं पुढं आल्याचं दिसत आहे. कारण तालवादकांची क्रेझ वाढत आहे. स्वर किंवा तंतुवाद्याबरोबरच चर्मवाद्याचा प्रभाव अधिक असण्याचा हा काळ आहे. कारण सूक्ष्मात शिरून गुंता सोडवण्यापेक्षा ढोबळ मानानं ‘सोल्यूशन’ सांगण्याकडे माणसाचा कल वाढतो आहे. तरुणाई त्याला अपवाद कशी असेल? याचा अर्थ तालवादन उथळ आहे, असा नाही. म्हणूनच, ढोल-ताशांनी सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुका काबीज केल्या आहेत. ताशाचा आवाज अनेकांना कर्णकर्कश वाटतो. कवी विंदा करंदीकरांनी तर एका ललित लेखात ‘‘ताशा या वाद्याचा शोध कोणी लावला, त्याचाच मी शोध घेत आहे,’’ असे विधान केलं आहे. ज्या पद्धतीनं तो वाजवला जातो, ती पद्धत पाहिली तर विंदा करंदीकरांच्या म्हणण्याशी कोणीही सहमत होईल. पण ढोलवादन ही वेगळी कला आहे. ढोल वाजवताना नाद, लय आणि तालाचं ज्ञान आवश्‍यक असतं. टिपरूनं बडवणं म्हणजे ढोलवादन नव्हे. त्यासाठी शक्ती लागते, तीही नाद-लय-ताल यांसह. म्हणजे त्याला ‘शक्तित्रयात्मकः’ असे म्हटलं तर वावगं वाटू नये.

गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्रोत्सव किंवा अन्य सार्वजनिक उत्सवांमध्ये ढोलवादनाला तरुणाईची पहिली पसंती आहे. लेझीम किंवा झांजवादनाचं पथक असलं, तरी त्याला ताल किंवा ठेका देण्यासाठी ढोलच लागतो. मिरवणुकीतील ढोलवादन ही अनोखी कला आहे. मुळात ढोल पकडणं, त्याचं वजन पेलणं आणि नेमक्‍या आघातासह योग्य ठेका धरणं ही सोपी गोष्ट नाही. जल्लोषाच्या वातावरणात ढोलवादनावर शक्तिप्रयोग अनाहूतपणे होऊ शकतो. ढोलाची नजाकत वेगळी आहे. मिरवणुकांमध्ये तरुणांप्रमाणेच तरुणींची ढोलपथकं मोठ्या संख्येनं असतात. तरुणींच्या वादनातील लयबद्धता अधिक आकर्षक असते. गजी ढोल, धनगरी ढोल किंवा नाशिक ढोलची पथकेही असतात. या तालवाद्यावर थिरकणाऱ्या तरुणाईचा जोष पाहणं हा आगळा आनंद आहे. 

तालाचं ज्ञान असेल तर ढोलवादन सुखाचं ठरतं. तालवाद्य वाजवणं हा आता उपजीविकेचा भाग होऊ शकतो. पं. झाकीर हुसेन किंवा तौफिक कुरेशी यांच्यासारख्या मान्यवरांनी त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. मात्र, वाद्यसंगत हा चरितार्थाचा भाग होऊ शकतो, हे तरुणांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ऑर्केस्ट्रासारख्या कार्यक्रमात ‘ट्रॅक म्युझिक’चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक नामवंत गायक जाहीर समारंभात किंवा ‘रिॲलिटी शो’मध्ये गाताना ट्रॅकचा वापर करतात. तथापि, चित्रपटाला संगीत देताना सिंथेसायझरवर काढलेल्या तालवाद्याच्या आवाजापेक्षा खऱ्याखुऱ्या वादनाला महत्त्व दिलं जात आहे. जुन्या पिढीतल्या गायक-गायिकांना वाद्यांच्या संगतीतच गीतांचं ध्वनिमुद्रण करण्याची सवय होती. मधल्या काळात तंत्राच्या आहारी गेलेल्या संगीताला रसिक कंटाळले होते. आता अजय-अतुलसारख्या नव्या दमाच्या संगीतकारांनी ठेक्‍याला आणि तालवाद्याला पुन्हा प्रतिष्ठा दिली आहे. अगदी टाळ-चिपळ्यांसह घुंगरू, मंजिरी, पखवाज, ढोलक, तबला, ढोलकी, क्वचितप्रसंगी ताशा, नगारा, डमरू, दिमडी, ढोल, संबळ, थाळी अशी वाद्यं पुन्हा एकदा रसिकांना मोहीत करू लागली आहेत. सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये ढोलपथकांच्या वाढत्या संख्येमुळं आणखी एक गोष्ट निर्विवादपणे स्पष्ट झाली, ती म्हणजे; तालाचं ज्ञान असलेला रसिक श्रोता तयार होत आहे. तंत्रज्ञान दरदिवशी बदलत आहे. संगीतामध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. पण तालवादकांचं महत्त्व कमी झालेलं नाही, किंबहुना ते वाढलं आहे. तालवाद्याविषयीची रुची वाढत आहे. भिरभिरणाऱ्या तालावर सूर जुळवणारी ही कलात्मकता संगीताचं गूढरम्य आहे, यात शंका नाही.

(लेखक सोलापूरस्थित तालवादक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagesh bhosekar article