राष्ट्रगीत आणि देशाभिमान! (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

कोणत्याही राष्ट्राचे राष्ट्रगीत हे त्या देशासाठी अभिमानाचीच बाब असते आणि अनेकदा तर दुसऱ्या देशाचे राष्ट्रगीत ऐकतानाही आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. मात्र, आपल्या देशाचे राष्ट्रगीत हे कुठे, कधी आणि का वाजवावे वा गावे याचेही काही संकेत रुजायला हवेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयानुसार आता सर्व चित्रपटगृहांत चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्‍ती करण्यात येणार आहे.

राष्ट्रगीताचे स्वर कानावर आले वा आपल्या उपस्थितीत कोणत्याही कारणाने राष्ट्रगीत सुरू झाले की आपण सर्वसाधारणपणे उठून उभे राहून ते गीत आणि त्याचवेळी फडकणारा तिरंगा याचा सन्मान करत असतो. आता चित्रपटगृहातही राष्ट्रगीत सुरू झाले की कोणत्याही परिस्थितीत उपस्थितांनी उठून उभे राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पण, यातून काही प्रश्‍न निर्माण होतात आणि त्यांची चर्चा मोकळेपणाने व्हायला हवी.  

देशाभिमान ही एक सहज आणि उत्स्फूर्त अशी भावना असते. त्यामुळे त्यासंदर्भात काही सक्ती करणे हा वदतोव्याघात नाही काय? कोणाला तरी राष्ट्रगीत सादर करण्याची सक्‍ती करण्याने देशाभिमान जागृत होतो, हा समज कितपत बरोबर आहे? सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना असेही म्हटले आहे की ‘आज लोकांना राष्ट्रगीत कसे म्हणावे ते ठाऊक नाही. यानिमित्ताने त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण मिळू शकेल!’ चित्रपट बघण्यासाठी उत्सुकतेने आलेला प्रेक्षक तेथे ऐकवले जाणारे राष्ट्रगीत ऐकून त्याबाबतचे प्रशिक्षण घेईल का, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतात. सर्वोच्च न्यायालयाचे काम हे कायद्याचा अर्थ लावून, त्याची अंमलबजावणी कशी होईल, हे बघण्याचे असते. आता त्यापलीकडे जाऊन जनतेला राष्ट्राभिमानाची शिकवण देण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी न्यायसंस्थेने घेतल्याचे या निर्णयामुळे दिसत आहे. सध्या देशात राष्ट्रवादाचे उन्मादी वातावरण उभे राहिले आहे. प्रतीकबाजी वाढली आहे. राष्ट्रगीताचा सन्मान राखायलाच हवा, याविषयी कोणतीही शंका नाही, पण त्यासाठी सक्तीसारखे पाऊल उचलावे लागणे, आपल्याकडच्या एकूण परिस्थितीची विदारकता स्पष्ट करणारे आहे. देशप्रेम रोजच्या सर्वच व्यवहारात दिसले पाहिजे, अशी अपेक्षा करायला हवी.

Web Title: National Antham and country pride