शिक्षणातून माणूस घडवू पाहणारा तत्त्वचिंतक

आजचे आपले भारतीय सामाजिक वास्तव पाहिले तर तरुणांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसते. त्यातच त्यांच्या ठायी ‘मेटाव्हर्स’ सारख्या प्रति जग - आभासी व अदृश्य जगाचे प्रलोभन वाढत आहे.
swami vivekanand
swami vivekanandsakal
Summary

आजचे आपले भारतीय सामाजिक वास्तव पाहिले तर तरुणांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसते. त्यातच त्यांच्या ठायी ‘मेटाव्हर्स’ सारख्या प्रति जग - आभासी व अदृश्य जगाचे प्रलोभन वाढत आहे.

विवेकानंद जयंतीचा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून पाळला जातो. त्याचे औचित्य साधून विवेकानंदांच्या शिक्षणविचारांचे वेगळेपण आणि महत्त्व विशद करणारा लेख; विवेकानंदांनी माणूस घडविणाऱ्या शिक्षणाचा आग्रह धरला होता, हे सूत्र स्पष्ट करणारा.

आजचे आपले भारतीय सामाजिक वास्तव पाहिले तर तरुणांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसते. त्यातच त्यांच्या ठायी ‘मेटाव्हर्स’ सारख्या प्रति जग - आभासी व अदृश्य जगाचे प्रलोभन वाढत आहे. वास्तव आणि आभास यातील सीमारेषा पुसट होत आहेत. परिणामी आजचा युवक दिशाहीन होत आहे नैराश्याला बळी पडत आहे. तो स्वत: मधले ‘माणूसपण’ आणि ‘स्वत्व’ दोन्ही हरवून बसला आहे.

अशा वेळी एक आधुनिक आदर्शवादी तत्त्वचिंतक म्हणून स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान आपल्याला आणि सर्वांनाच मार्गदीप ठरावे. त्यांचे तत्त्वज्ञान मूल्यात्मक आणि वास्तववादी असे द्विस्तरीय आहे. त्यांनी सांगितलेला व्यावहारिक वेदान्त तत्त्वज्ञानाचे व्यावहारिक उपयोजन शिकवतो. वास्तव जीवनाशी मेळ घालतो. म्हणूनच ते ‘उपाशीपोटी तत्त्वज्ञान नको’, असे म्हणतात. आधी शारीरिक भुकेचे शमन मगच तत्त्वज्ञानाकडे वळावे. ‘आधी शरीराचे देणे द्यावे नंतर मन बुद्धीचे लेणे घडवावे’. या क्रमाने भारतीय समाजाने आपल्या जीवनाची वाटचाल करावी. ‘नायमात्मा बलहीनेन लभ्य:।’ ‘बलहिनाला आत्मप्राप्ती होत नाही’ या मुंडक उपनिषदातील विचाराचा - सिद्धांताचा ते उद्घोष करतात.

‘आधी शरीर कमवा मग मन आणि ज्ञान कमवा,’ असे ते भारतीय युवकांना सांगत असत. भौतिक संसारी जीवनाची उन्नती करून मग परमार्थाकडे वळावे तरच अर्थपूर्ण व समाधानी जीवनाची हमी मिळू शकते. अशा तऱ्हेने अध्यात्म आणि जीवनव्यवहार या दोहोंत समन्वय साधून नवा भारतीय माणूस - युवक ‘मी सिंह आहे, मी ब्रह्म आहे.’ अशी गर्जना करणारा माणूस असला पाहिजे, म्हणजेच स्वत्वाचे भान झालेला असावा. म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी माणूस घडविणाऱ्या शिक्षणाचा आग्रह धरला होता.

आपण आधी घराचा आराखडा तयार करीत असतो, मगच घर उभे करीत असतो. नंतर ते सजवत असतो. त्यासाठी अमाप खर्चही करीत असतो. पण माणसाच्या ‘बाळाला’ असे घडवतो का? शिक्षणाने रोजीरोटी मिळावी हे खरेच आहे; पण त्याचबरोबर माणसातला माणूसही घडला पाहिजे. खरेतर बुद्धिशीलता, विचारशीलता हे माणसाचे वेगळेपण आहे. तेच विकसित करणे त्याला आयाम देणे हे शिक्षणातून घडले पाहिजे. विचारशीलता म्हणजे विवेकशीलता, विवेकाने वागणारा प्राणी तो ‘माणूस’ होय.

विवेकाचे रूप

शहाणपण हे विवेकाचे रूप आहे म्हणून माणसाचे शहाणपण हेच त्याचे मनुष्यत्व होय. बहिणाबाई चौधरी, ‘ अरे माणसा माणसा, कधी व्हशील माणूस,’ असे म्हणतात. तेव्हा त्यांना त्याच्यातले मनुष्यत्व अपेक्षित असते. हे मनुष्यत्व विचारशीलतेने म्हणजे शहाणपणाने अधोरेखित होते. असा माणूस घडवणारे शिक्षण विवेकानंदांना महत्त्वाचे वाटते. पण त्याच्यातल्या, माणसातल्या मनुष्यत्वाबरोबर त्याचे पूर्णत्वही त्या शिक्षणाने प्रकट झाले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. पूर्णत्व ही इतर माणसातील त्याची असणारी ओळख असते.

त्याच्यातले माणूसपण ही इतर प्राण्यातील त्याची स्वतंत्र ओळख होय. म्हणून जेवढी म्हणून माणसे असतील तेवढ्यांच्या ठायी माणूसपण असावे ही ‘सामान्य’ गोष्ट तर प्रत्येक माणसात जे काही इतर माणसाच्या तुलनेत वेगळेपण असते ती त्याची सामाजिक ओळख - आयडेंटिटी असते. म्हणून विवेकानंद म्हणतात, ‘माणसात मूलत:च असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण ज्याने होते ते शिक्षण.’ ( Education is the manifestation of perfection already in man.) अर्थात हे पूर्णत्व ज्याचे त्याचे वेगळे असते तीच त्याची आयडेंटिटी असते.

कोणी शिल्पकार, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर तर कोणी प्राध्यापक अशी ही आयडेंटिटी किंवा ओळख असते. ही ओळख त्याच्या आतून विकसित होत असल्याने ती नैपुण्यतेचे, प्रगल्भतेचे दर्शन घडवते. एका बाजूला माणसातला ‘माणूस’ आणि त्याच्यात असलेले ‘पूर्णत्व’ ही ओळख असा दुहेरी विकास शिक्षणाने झाला पाहिजे. म्हणजेच ‘माणूस’ म्हणून विवेकाने - शहाणपणाने आणि स्वतंत्र ओळख निर्माण करून माणसांच्या जगात वावरणारा ‘माणूस’ घडला पाहिजे. विवेकानंदांचा हा विचार उन्नत भारतीय समाज घडविणारा ठरू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com