नक्षलवाद्यांची विनाशनीती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

हातात शस्त्रे घेऊन इथली लोकशाही व्यवस्थाच उलथवून टाकण्याच्या इराद्याने झपाटलेल्या नक्षलवाद्यांनी चालविलेले सूडचक्र थांबण्याची चिन्हे नाहीत. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात इंजरम आणि भेज्जी गावांच्या दरम्यान त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीवर जो हल्ला केला, त्यात बारा जवान धारातीर्थी पडले. ही फार मोठी जीवितहानी आहे आणि त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. नक्षलवादी वा माओवादी यांच्या कारवाया थंडावल्या आहेत, अशी चर्चा व्हायला लागली, की अशा प्रकारचे भीषण हल्ले करून आपले अस्तित्व दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या हल्ल्यामागे ते कारण असू शकते.

हातात शस्त्रे घेऊन इथली लोकशाही व्यवस्थाच उलथवून टाकण्याच्या इराद्याने झपाटलेल्या नक्षलवाद्यांनी चालविलेले सूडचक्र थांबण्याची चिन्हे नाहीत. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात इंजरम आणि भेज्जी गावांच्या दरम्यान त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीवर जो हल्ला केला, त्यात बारा जवान धारातीर्थी पडले. ही फार मोठी जीवितहानी आहे आणि त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. नक्षलवादी वा माओवादी यांच्या कारवाया थंडावल्या आहेत, अशी चर्चा व्हायला लागली, की अशा प्रकारचे भीषण हल्ले करून आपले अस्तित्व दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या हल्ल्यामागे ते कारण असू शकते. उच्चभ्रू वर्तुळात संभावितपणे वावरणाऱ्या नक्षलवादी समर्थकांना गडचिरोली न्यायालयाने नुकतीच दिलेली जन्मठेपेची शिक्षा हेही निमित्त असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; परंतु ही दोन्ही कारणे तात्कालिक आहेत. नक्षलवाद्यांचा पोटशूळ उठतो आहे, तो या भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे. भेज्जी आणि कोट्टाचेरू या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून त्या कामासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान संरक्षण पुरवीत होते. या भागातील पोलिस बंदोबस्तही अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला होता. पण जंगलातून जाणाऱ्या मार्गात अद्ययावत स्फोटके पेरून नक्षलवाद्यांनी हा भीषण हल्ला केला. या भागात भरणारा ‘बाजार’ दहशतीच्या बळावर त्यांनी बंद पाडला होता. जवानांनी तो नुकताच सुरू केल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार काही प्रमाणात सुरू झाले होते. पण कोणतीही विकासकामे होऊ द्यायची नाहीत, बाजारहाटीसारखे दैनंदिन आर्थिक व्यवहारही होऊ द्यायचे नाहीत, असा नक्षलवाद्यांचा अट्टहास असतो. म्हणजे एकीकडे ही प्रक्रिया अडवायची; किंबहुना भीषण हल्ले करून रोखायची आणि दुसरीकडे गरीब आदिवासींना विकासापासून वंचित ठेवले जात असल्याची सतत ओरड करायची, असा हा दुटप्पी मामला आहे. भूसुरुंग स्फोट घडवून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवून आणण्याची त्यांची कार्यपद्धती नवी नाही. त्यामुळेच त्यांचे डावपेच वेळीच ओळखून ते हाणून पाडायला हवेत.

Web Title: naxalite destruction Strategies