अस्वस्थ सौदीचे नवे ‘सौदे’

अस्वस्थ सौदीचे नवे ‘सौदे’

सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ इब्न सौद यांनी अलीकडेच मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, जपान व चीनचा केलेला दौरा आर्थिक आणि राजकीय दृष्टीने महत्त्वाचा होता. जपान आणि चीनसोबत अब्जावधी डॉलरचे करार आणि व्यापार करार हे या दौऱ्याचे खास हेतू होते. मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई आणि मालदीव हे सुन्नीबहुल देश असून, याचकरिता त्यांची या दौऱ्यासाठी निवड केली होती. मलेशियाशी सौदीने सुमारे सात अब्ज डॉलरचे करार केले आणि मलेशियातील यात्रेकरूंच्या हज यात्रेच्या कोट्यात वाढ करून दिली. राजे फैझल यांच्यानंतर ४६ वर्षांनी सौदी राजाने इंडोनेशियाला भेट दिली. या देशात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सौदी राजघराण्याने जाहीर केले आहे. मलेशिया व इंडोनेशियात केलेली गुंतवणूक सौदीच्या गेल्या कित्येक वर्षांच्या धोरणांना अनुसरून आहे. इंडोनेशिया हा सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे. तिथे सौदीने भूतकाळात तेल आणि व्यापारातील गुंतवणुकीबरोबरच शेकडो मशिदी, मदरसे, विद्यापीठे यांना अर्थसाह्य देतानाच सौदीत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, तसेच आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांची खैरात केली आहे. गुंतवणुकीच्या आडून आपला कायम वरचष्मा राहावा आणि आणीबाणीच्या प्रसंगी फायदेशीर ठरू शकणाऱ्या सुन्नी देशांचा दबावगट तयार करण्यात सौदीला जास्त स्वारस्य आहे. 

पाश्‍चात्त्य देशांबरोबरील संबंधातील अनिश्‍चितता हेरून आशियातील जपान आणि चीन या दोन महत्त्वाच्या देशांसोबत मैत्री वाढविण्याची चाल सौदीने केली आहे. जपान आणि चीनला मोठ्या प्रमाणावर तेलपुरवठा करण्याच्या बदल्यात जपान व चीनची सौदीत भरघोस गुंतवणूक, या उद्देशाने अब्जावधी डॉलरचे या वेळी करार करण्यात आले.  दोन वर्षांपूर्वी १०० डॉलरपेक्षा जास्त प्रतिबॅरेल इतका भाव असणारे तेल आज ५०- ५५ डॉलर प्रतिबॅरेल भावात मुबलक उपलब्ध आहे. सौदी राजघराण्याचे साम्राज्य आणि त्याचा थाट हा तेलावर तरंगतो; पण गडगडलेल्या तेलाच्या भावामुळे गेली दोन वर्षे सौदी अरेबियाला जबर फटका बसला आहे. त्यात इराणवरील निर्बंध उठवले गेल्याने इराणचे तेल बाजारपेठेत विक्रीस आल्यामुळे सौदीच्या तेलाला तगडा स्पर्धक मिळाला आहे. तेलाच्या जिवावर अर्थकारणाची मोठी मदार असलेल्या सौदीसारख्या देशाला तेलाचा कमी भाव ही डोकेदुखी झाली आहे. त्यात पश्‍चिम आशियावर वचक ठेवण्याचे आणि नेतृत्वाचे वारे कानात शिरल्यामुळे अशा आर्थिक मंदीतही सौदीने सीरिया आणि येमेनमध्ये सुन्नी गटाला शिया गटाच्या विरोधात पैसे आणि शस्त्रांची रसद सुरूच ठेवली आहे. गेली सहा वर्षे सुरू असलेला सीरियातील संघर्ष आणि दोन वर्षांपासून चाललेली येमेनमधील लढाई सौदी अर्थव्यवस्थेला तडे देत आहे. या सगळ्यांचा चटका कमी बसावा म्हणून सौदी राजघराण्याचे उप-युवराज आणि राजे सलमान यांचे पुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी २०३० पर्यंत सौदी अर्थकारणात मोठे बदल करण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण हाती घेतले आहे. अर्थव्यवस्थेतील तेलाचे अवलंबित्व कमी करणे; तसेच तेलक्षेत्र सोडून इतर क्षेत्रांत पर्यायी आणि सक्षम रोजगार उपलब्ध करून देणे त्यांच्या प्राधान्यक्रमावर आहे. त्याच अनुषंगाने आणि तूट भरून काढण्याच्या हेतूने त्यांनी कर वाढवले आहेत. त्याचबरोबर २०१८ मध्ये ‘अराम्को’ या सौदी राजघराण्याच्या मालकीच्या तेल कंपनीचे पाच टक्के शेअर विकण्याचे मोहम्मद बिन सलमान यांनी ठरवले आहे. जपान आणि चीनचा पाठिंबा नसेल, तर त्यांचे ‘व्हिजन २०३०’ लांबणीवर पडेल. 

ओबामा प्रशासनाने इराणशी करार करून इराणवरील निर्बंध उठवले होते. यावरून सौदी आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले होते. आता अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या बाबतीत ‘आपली भूमिका कडक असेल व आपण इराणसोबत केलेला अणुकरार रद्द करू,’ असे जाहीर केल्यामुळे साहजिकच सौदीला ट्रम्प जवळचे वाटू लागले आहेत. इराण, सीरिया, येमेन, ‘इसिस’, तेल आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्यात मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेतली. सौदी अरेबिया अमेरिकेकडून बक्कळ शस्त्रे आयात करतो. अमेरिकेकडून सौदीला शस्त्रे मिळत राहतील, याची तजवीज बिन सलमान यांनी या भेटीत केल्याचे जाणकार सांगतात. शपथविधी झाल्यापासून ट्रम्प यांची भेट घेणारे बिन सलमान हे पहिले उच्चपदस्थ मुस्लिम नेते आहेत. अवघ्या ३१ वर्षांचे बिन सलमान हे जगातील सर्वात तरुण संरक्षणमंत्री म्हणून गणले जातात. ते सौदीत महत्त्वाची खाती सांभाळतात आणि उप-युवराज आहेत. वडील राजे सलमान आणि युवराज मोहम्मद बिन नाएफ यांच्यानंतर सौदीच्या सिंहासनासाठी ते रांगेत आहेत. दिवसेंदिवस महत्त्व वाढणाऱ्या आणि सिंहासनापासून अवघे दोन पावले लांब असणाऱ्या बिन सलमान यांच्या पुढील वाटचालीवर लक्ष ठेवणे त्यामुळेच क्रमप्राप्त आहे. 

पश्‍चिम आशियातील मोक्‍याच्या प्रसंगांत आणि शिया-सुन्नी संघर्षात इराणचा जोर वाढत असल्याने आणि इराणला रशियासारख्या पाठीराख्याची सोबत असल्याने सौदी अरेबियाची अस्वस्थता वाढली आहे. याचे भान ठेवून राजे सलमान यांनी आशिया आणि उपयुवराज मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेचा दौरा केला. अवघड परिस्थितीत अमेरिकेची सोबत; तसेच जुन्या-नव्या मित्रांशी दोस्ती आणि संबंध वृद्धिंगत करण्याची धडपड हे पिता-पुत्र करत आहेत. आशियाच्या दौऱ्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना आर्थिक आकार आणि काहीसे यश दिले आहे. या दौऱ्याचे त्यांना अपेक्षित राजकीय फलित कितपत मिळते, हे मात्र येणारा काळच ठरवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com