असंगांशी संग अन्‌ सत्तेशी गाठ

nikhil shrawge
nikhil shrawge

वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून सत्तेवर चिकटून राहणारी नेतमंडळी जनतेची दिशाभूल करू पाहतात. इस्राईलही त्याला अपवाद नाही. त्या देशाचे पंतप्रधान नेत्यानाहू इराण, सीरियाविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन आणि राष्ट्रभावनेला साद घालून आपले स्थान पक्के करण्याच्या खटाटोपात दिसतात.

इ स्राईलच्या पोलिसांनी मागील आठवड्यात पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात खटला चालवायची शिफारस न्यायव्यवस्थेकडे केली. भ्रष्टाचार, लाचखोरी आणि अफरातफरीचे नेतान्याहू यांच्या मागे लागलेले हे चौथे प्रकरण. इस्राईलची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ‘बेझेक’वर मेहेरनजर केल्याचे हे प्रकरण आहे. या बदल्यात ‘बेझेक’च्या ऑनलाइन वर्तमानपत्रात नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांच्या बाजूने बातम्या आणि विश्‍लेषण देण्याचे मान्य झाले होते. हे सोडून अन्य दोन प्रकरणांमध्ये, नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीने यांनी एका प्रसिद्ध दैनिकाच्या प्रकाशकासोबत आणि एका हॉलिवूडच्या निर्मात्यासोबत सत्तेचा गैरवापर करून आपल्या फायद्याचे सौदे केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या शिफारशीनंतर नेतान्याहू यांच्यावर इस्राईलचे ॲटर्नी जनरल खटला चालवणार का, हा प्रश्न असला तरी विरोधकांनी नेतान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांच्या राजकीय प्रवासाचा आणि शैलीचा धांडोळा घेणे आवश्‍यक ठरते.
इस्राईलच्या लष्कराची सेवा, अमेरिकेतील इस्राईलचे राजदूत म्हणून काम पाहिल्यानंतर, मायदेशी परतून ‘लिकुड’ या उजव्या विचारसरणीच्या पक्षासोबत नेतान्याहू यांनी काम सुरू केले. इस्राईलचे तत्कालीन पंतप्रधान यित्झाक राबिन आणि यासर अराफत यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्‍लिंटन यांच्या उपस्थितीत ‘ऑस्लो करारा’वर स्वाक्षरी केली. अराफत यांच्यासोबत गुफ्तगू केली म्हणून ‘लिकुड’च्या नेत्यांनी राबीन यांच्याविरोधात हवा तापवली. यात आघाडीला नेतान्याहू होते. अराफत आणि राबिन यांच्यावर कडवट टीका करून त्यांनी जनक्षोभ पेटवला. त्यात राबीन यांची हत्या झाली. या हत्येचे पाप थेट नेतान्याहू यांच्यापर्यंत जाते. पुढे ते १९९६मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले आणि ‘ऑस्लो करारा’च्या अंमलबजावणीचा वेग त्यांनी जाणीवपूर्वक कमी केला. नेतान्याहू यांचा राजकीय पिंड हा उजव्या विचारसरणीकडे पूर्णपणे कललेला आहे. राष्ट्रभावना चेतवून, सामान्य प्रजेचे आपणच रक्षक असल्याचे भासवून आणि या भांडवलावर निवडणुका जिंकत ते आता तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून सत्ता भोगत आहेत. जी गत त्यांची, तीच त्यांच्या पत्नीची. ऐशोआराम आणि उंची राहणीमान यामुळे हे दोघे कायम वादात असतात. हजारो सरकारी डॉलरचा वैयक्तिक चैनीसाठी खुर्दा करण्याचे त्यांचे एक-एक प्रकरण मोठे रंजक आहे. सारा नेतान्याहू यांनी तर इस्राईलच्या विख्यात ‘मोसाद’ या हेर खात्याकडे पार बिल क्‍लिंटन आणि मोनिका लेविन्स्की या गाजलेल्या प्रकरणाबाबत गोपनीय माहिती मागवत विशेष रस दाखवला होता.

या सगळ्या प्रकारामुळे आता नेतान्याहू यांच्याबाबतचा लोकांचा संभ्रम वाढत चालला आहे. आपल्या उमेदीच्या काळात अरब देशांच्या विरोधाची भाषा करून गादीवर बसलेले नेतान्याहू आता थेट ओमान, बहारीन, संयुक्त राष्ट्र अमिराती, सौदीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी दोस्ताना पुढे नेतात. १९९०च्या दशकात या अरब देशांना झोडायची भाषा करणारे नेतान्याहू आज अरब कंपूला सोबत घेऊन इराणला चेपायचे इशारे देत आहेत. या त्यांच्या खेळीत त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सामील करून घेतले आहे. बराक ओबामांच्या कार्यकालात नेतान्याहू आणि ओबामांच्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये उडालेल्या खटक्‍यांचे किस्से आजही राजकीय कट्ट्यावर चवीने चघळले जातात. ओबामांना इराणसोबतचा अणुकरार न करू द्यायचा चंग बांधलेल्या नेतान्याहू यांचा प्रयत्न ओबामांनी हाणून पाडला होता. तो इराणविरोधाचा राहिलेला हिशेब नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्याकरवी चुकता करून घेत अमेरिकेला अणुकरारातून माघार घ्यायला लावले. ट्रम्प यांचे जामात जॅरेड कुशनर हे यहुदी आहेत. त्यांना मध्यस्थी घालून अमेरिकेचा इस्राईलमधील दूतावास वादग्रस्त जेरुसलेम शहरात हलवला. त्यामुळे इस्राईलच्या दरबारात ट्रम्प यांना मानाचे स्थान आहे. ट्रम्प यांच्यासोबत व्लादिमिर पुतीन यांच्याशी नेतान्याहू यांची खास दोस्ती आहे. उभय नेत्यांमध्ये गेल्या वर्षात अनेकदा भेटी आणि दूरध्वनीवरून संभाषण झाले आहेत. पुतीन आणि नेतान्याहू या दोघांनाही लष्करी पार्श्वभूमी असून दोघांच्या राजकीय दृष्टिकोनात साम्य आढळते. सीरियाच्या युद्धात परस्परविरोधी गटात असणारे पुतीन-नेतान्याहू मोक्‍याच्या प्रसंगी आपला कडवटपणा विसरून आपले हित बघतात. अमेरिकेने पश्‍चिम-आशियातील राजकारणातून काढून घेतलेली सक्रियता या दोघांच्या पथ्यावर पडू पाहत आहेत. त्या प्रदेशात अमेरिकेचा दबदबा असलेल्या, अंतर्गत विरोध-समर्थन असलेल्या देशांशी सलोख्याचे संबंध राखत, शस्त्र आणि प्रगत तंत्रज्ञान विकायचा मोठा सपाटा यांनी लावला आहे.

इस्राईलची सुमारे ५० टक्के जनता नेतन्याहू नेतृत्व अजून सक्षम आहे असे समजते. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत, नेतान्याहू यांनी या आरोपांचे खंडन करीत हे थोतांड असल्याचा कांगावा केला आहे. त्यांचीच री ओढत तिकडे वॉशिंग्टनमध्ये रोज उठता-बसता ट्रम्प त्यांच्यावरील प्रचारकाळात रशियाशी केलेल्या चुंबाचुंबीचा खटला ‘कसा गाढवपणा आहे’ असा शेरा मारतात. या सगळ्या प्रकरणांमध्ये खोलवर पाणी मुरले आहे यात वाद नाही. आरोपांच्या या भूताला बाटलीत बंद करताना नेतान्याहू यांचा कस लागणार असे दिसते. राजकीय परिस्थिती प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे नेण्यात त्यांचा मोठा लौकिक आहे. ‘लिकुड’ पक्षाचे ताकदवान अध्यक्षपद आज त्यांच्याकडे आहे. इस्राईलच्या सांप्रत राजकारणातील एक तगडा आणि अत्यंत धूर्त गडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा राजकीय पट हा कायमच अशा ओरखड्यांनी भरून राहिला आहे. इस्राईलच्या सामान्य नागरिकांच्या राष्ट्रवादाला हात घालून नेतान्याहू आपली ‘सोय’ लावतात हे तर उभा इतिहास सांगतो. काही एक मर्यादेनंतर राजकीय नेते सत्तेसाठी काय वाट्टेल ते करण्याच्या तयारीत असतात. अशावेळी मग लोकशाहीची झुल पांघरून, एककल्ली कारभाराकडे त्यांचा गाडा वळतो. त्याची लक्षणे नेतान्याहू यांच्या सार्वजनिक वर्तनात दिसू लागली आहेत. घरच्या आघाडीवर जरा बेबनाव होताच सीरियात पाहिजे तेव्हा वायुहल्ला करणे हा गेल्या काही वर्षांतला त्यांचा आवडता उद्योग राहिला आहे. परवाच्या पोलिसी शिफारसीनंतर लगेच दोन दिवसांनी इस्राईलच्या लष्कराने हेजबोल्लाहच्या कथित भुयारांवर हल्ला केल्याचे सांगितले. राष्ट्रभावनेची हाळी देऊन राजकारणातील जुने पण तितकेच प्रभावी तंत्र वापरले आहे. त्यामुळेच, वेळ आणि प्रसंग आपल्या विरोधात जात असताना ते कोणती कास धरणार हे आता स्पष्ट आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक आत्ताच घेऊन ते जनतेचे लक्ष यावरून विचलित करायचा पर्याय वापरू शकतात. पण, ओरखड्यांचे रूपांतर तडा जाण्यात होईल अशा वेगात गोष्टी त्यांच्याबाबत घडत आहेत. गरमागरम, बहुतांशी लोकांना भुरळ पाडणारे मुद्दे एका हद्दीनंतर आपली चव घालवून बसतात, असे साधारणतः दिसते. नेतान्याहू यांच्या बाबतीत असे होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यांच्या आघाडीचे घटक पक्षांचे जरी तूर्तास नेतान्याहू यांना समर्थन असले तरी पुढील काळाचा अंदाज घेत ते ताक फुंकूनच पितील असा कयास आहे. नेतान्याहू यांच्यासाठी म्हणूनच कितीही नाही म्हटले तरी ही रात्र वैऱ्याची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com