सारांश : एका रुपेरी पर्वाची नव्वदी

सारांश : एका रुपेरी पर्वाची नव्वदी

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात "प्रभात पर्व' सुवर्णाक्षरांत नोंदवले गेले आहे. माझ्या आजी पार्वतीबाई दामले यांनी स्थापनेचा मंगलकलश एक जून 1929 रोजी ठेवला. महाराष्ट्र फिल्म कंपनीत बाबूराव आणि आनंदराव पेंटर यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणारे माझे आजोबा- दामलेमामा, एस. फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि धायबर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी सोडली.

स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू करण्याचा सर्वांना ध्यास लागला होता. कोल्हापुरातील प्रसिद्ध सराफी पेढीचे सीतारामपंत कुलकर्णी यांची दामलेमामांशी जुनी मैत्री होती. आणि त्यांचा दामलेमामांवर विश्‍वास होता. त्या काळात सीतारामपंतांनी दामल्यांना भांडवल देऊ केले. दामले - फत्तेलालांबरोबर शांताराम व धायबर एकत्रित आले आणि "प्रभात'ची स्थापन एक जून 1929 रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. येत्या शनिवारी "प्रभात'च्या स्थापनेला 90 वर्षे होत आहेत. 

भारतातील पहिला रंगीत बोलपट 

1929 ते 1932 दरम्यान "प्रभात'कारांनी सहा मूकपटांची निर्मिती केली, तर 1932 मध्ये "अयोध्येचा राजा' या बोलपटाची निर्मिती केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वांत जुना बोलपट म्हणून सुस्थितीत जतन केला गेला आहे. 1934 मध्ये "प्रभात'चे पुण्यात प्रभातनगर येथे स्थलांतर झाले. दामलेमामांच्या देखरेखेखाली "प्रभात'ची वास्तू उभी राहिली. त्या काळात आशियातील सर्वांत मोठा स्टुडिओ अशी "प्रभात'ची ख्याती होती. 1932 ते 1934 दरम्यान "प्रभात'ने सहा बोलपटांची निर्मिती केली. "प्रभात'चे नाव सिनेजगतात आणि रसिकांमध्ये प्रसिद्ध पावले.

1933 मध्ये "प्रभात'ने भारतातील पहिला रंगीत बोलपट "सैरंध्री' निर्माण केला. एक काळ असा होता, की चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला, तंत्रज्ञाला नवीन काही शिकायला मिळेल यासाठी "प्रभात'मध्ये यावेसे वाटायचे. "प्रभात'कारांनी सर्वसामान्यांतून अचूक निवड करून अनेक कलाकार घडवले. ती मूक चित्रपटक्षेत्राला "प्रभात'ने दिलेली ही देणगीच होती. देव आनंद यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण 1946 मध्ये प्रभातच्या "हम एक है' या चित्रपटांतून झाले, याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. 

नऊ बोलपटांनी घडविला इतिहास 

सध्या "प्रभात'च्या वास्तूमध्ये "फिल्म ऍन्ड टीव्ही इन्स्टिट्यूट' (एफटीआयआय) मोठ्या दिमाखात उभी आहे. तेथील विद्यार्थी आम्हाला भेटतात, तेव्हा प्रत्येक जण भारावून बोलतो. 1934 ते 1957 हा "प्रभात'चा पुण्यातील कालखंड. त्या दरम्यान 26 बोलपटांची निर्मिती झाली. त्यातील नऊ बोलपटांनी इतिहास घडवला. जागतिक चित्रपटसृष्टीमध्ये या बोलपटाची दखल घेतली गेली. 1957 मध्ये "प्रभात' बंद झाली.

1957 ते 1959 या काळात एस. एच. केळकर यांनी "प्रभात' चालवली. पुढे 1961 मध्ये सरकारने कंपनी विकत घेऊन "फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूट'ची स्थापना केली. दामलेमामांचे एक स्वप्न होते, की "प्रभात'मध्ये चित्रपटनिर्मितीचे प्रशिक्षण द्यावे. "प्रभात'मध्ये हे साध्य झाले नव्हते, पण त्यांनी उभारलेल्या वास्तूमध्ये "एफटीआयआय' दिमाखात उभी आहे. 

अमूल्य ठेव्याचे डिजिटायझेशन 

1957 मध्ये "प्रभात'च्या अस्तानंतर सर्व चित्रपटांचे हक्कही विकले गेले. "प्रभात'चा अमूल्य खजिना हळूहळू पडद्यामागे जाऊ लागला. भारतीय चित्रपटांचा हा इतिहाससुद्धा पुसट होत गेला. पण 1969 मध्ये उत्तम योग जुळून आला. माझे वडील अनंतराव दामले यांनी "प्रभात'च्या सर्व चित्रपटांचे हक्क परत मिळवले, त्यानंतर गावोगाव या चित्रपटांचे प्रदर्शन अनेकआठवडे होऊ लागले.

बदलत्या काळानुसार आम्ही दामले कुटुंबीयांनी व्हिडिओ, डीव्हीडी बनवले. "प्रभात'च्या काळातील अनेक दुर्मिळ छायाचित्रे, कागदपत्रे, चित्रपट या सर्व ठेव्याचे डिजिटायझेशन व संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे. 

माझी आई अरुणाताई दामले यांनी अनेक वर्षे "प्रभात गीते' कार्यक्रम सादर करून "प्रभात'च्या अवीट गाण्यांचा आस्वाद रसिकांना दिला. त्यांनी लिहिलेल्या "मराठी चित्रपट संगीताची वाटचाल' या अभ्यासग्रंथाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दामले कुटुंबीयांतर्फे निर्मित दोन माहितीपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

"इट्‌स प्रभात' हा माहितीपट "प्रभात'च्या 75व्या वर्षी म्हणजे 2004 मध्ये निर्माण केला, तर 2012 मध्ये "विष्णुपंत दामले- बोलपटांचा मूकनायक' हा माहितीपट निर्माण केला. अलीकडे "नवप्रभात स्टुडिओ' या नव्याने सुरू केलेल्या उपक्रमांमार्फत माहितीपटांचे संकलन केले जात आहे. "प्रभातकारां'नी 15 लघुपटांची/ माहितीपटांची निर्मिती केली होती. त्यापैकी काही लघुपट जतन करून त्याच्या डीव्हीडी तयार केल्या आहेत. 
"प्रभात' महिमा अजूनही टिकून आहे आणि तो कायम राहील, कारण "प्रभात'च्या अजरामर कलाकृती!

"प्रभात'चा महिमा आणि जादू इतकी जबरदस्त होती, की देशभरात गावोगावी "प्रभात' नावाची अनेक चित्रपटगृहे अस्तित्वात आली. आजही प्रत्येक मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरवात "प्रभात'मधील "लख लख चंदेरी' गाण्याने होते; हे एकच उदाहरण "प्रभात'चा प्रभाव सांगण्यास पुरेसे ठरावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com