भाष्य : कान टोचले; पण भान येईल?

imran-khan
imran-khan

दक्षिण आशियातील खास दोस्त असलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबियाने  झटका दिला आहे. पाकिस्तानला एकूणच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे आणि सद्यःस्थितीचे भान नसल्याचे  या घडामोडींमुळे स्पष्ट झाले. या झटक्यानंतर तरी पाकिस्तान ताळ्यावर येईल का, हा प्रश्‍नच आहे. 

एकेकाळी उत्तम संबंध असलेले सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्या नात्यात आज वितुष्ट आले आहे. दिलेले पैसे परत करावेत यासाठी सौदीने  पाकिस्तानला तगादा लावला आहे. तसेच, पाकिस्तानला होणाऱ्या तेलपुरवठ्याबाबतही एकाएकी हात आखडता घेतला आहे. सौदीचा दक्षिण आशियातील खास दोस्त असे बिरुद मिरवणाऱ्या पाकिस्तानात यामुळे धोक्‍याची घंटा घणघणू लागली आहे. तिचा अन्वयार्थ समजून घेणे आवश्‍यक आहे.

‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन’ (ओआयसी) ही इस्लामी देशांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना. ५७ देश तिचे सदस्य आहेत. इस्लामी देशांचे जागतिक परिमाण असलेले प्रश्न समजून घेऊन त्यांवर आवाज उठवणे हा या संघटनेचा हेतू आहे. १९६९मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे मुख्यालय जेद्दा या सौदीतील शहरात आहे. सौदी अरेबियाकडे अलिखितपणे या संघटनेचे प्रमुखपद आहे, ते तीन कारणांसाठी. एक तेल, दोन पैसे आणि मक्का व मदिना ही इस्लामधर्मीयांची दोन महत्त्वाची श्रद्धास्थळे सौदी अरेबियात आहेत हे तिसरे कारण. तेलाची निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेत (ओपेक) जसा सौदीचा दबदबा आहे, तसाच इथेही. त्याला डावलून, ठराव मांडून निर्णय घेणे अवघड. भारताने कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानचे पित्त खवळले आहे. देशोदेशींच्या नेत्यांना दूरध्वनी करून, कधी प्रत्यक्ष भेटून त्यांनी भारतावर टीका करावी, असे आर्जव इम्रान खान सरकार करीत आहे. चीन, तुर्कस्तान, मलेशिया हे काही तुरळक देश सोडून, इतर देशांनी ‘ही भारताची अंतर्गत बाब आहे’, असे सांगून यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पण, डोक्‍यात राख घालून घेतलेला पाकिस्तान भारतविरोधी वातावरण तयार करण्यासाठी आटापिटा करीत आहे. भारतविरोधी सूर आवळणाऱ्या ब्रिटिश खासदारांना, माध्यमांच्या प्रतिनिधींना पाकव्याप्त काश्‍मीरचा दौरा करायला लावून काश्‍मिरी जनतेची कशी दयनीय अवस्था झाली आहे याचे रडगाणे पाकिस्तानने चालविले आहे. हीच भूमिका ‘ओआयसी’ने घ्यावी याकरिता पाकिस्तान ‘ओआयसी’वर दबाव आणत आहे, तर, ‘हा काही संघटनेच्या सर्व सदस्य देशांना जाचेल असा प्रश्न नाही’, म्हणत ‘ओआयसी’ने वर्षभर पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले. यावर नापसंती दर्शवत इम्रान खान यांनी संघटनेविषयी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली. सौदी अरेबियाला इम्रान यांची भूमिका पटली नाही. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी हे तर एक पाऊल पुढे जात ‘ओआयसी’ला जमत नसेल तर काश्‍मीर प्रश्नावर संबंधित देशांनी रीतसर दुसरी संघटना काढावी, असे थेट दूरचित्रवाणीवर म्हणाले आणि एकच खळबळ माजली.

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानपदी निवडून आल्या आल्या इम्रान खान हे सौदी अरेबियाची धूळ आपल्या मस्तकी लावून आले होते. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची हलाखी बघून सौदीने मोठा भाऊ म्हणून मदत करावी अशी गळ त्यांनी घातली. त्यामुळे ६.२ अब्ज डॉलर कर्ज म्हणून सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी मंजूर केले. मात्र या मदतीची तीन अब्ज डॉलर रोख आणि ३.२ अब्ज डॉलरचे तेल अशी फोड त्यांनी केली. हे सगळे पैसे आणि तेल पाकिस्तानने रिचवले. या पार्श्‍वभूमीवर इम्रान आणि कुरेशी यांची वक्तव्ये बिन सलमान यांनी गांभीर्याने घेतली आणि कर्जाचे पैसे पाकिस्तानने परत द्यावेत म्हणून तगादा लावला. तेव्हा पाकिस्तानने चीनकडून एक अब्ज डॉलरचे कर्ज घेऊन सौदीस दिले. त्या बदल्यात चीनने पाकिस्तानच्या एका मोठ्या रेल्वे प्रकल्पाचे कंत्राट आपल्या पदरात पाडून घेतले आहे. आधीच चीनने दिलेल्या राक्षसी कर्जाच्या ओझ्याखाली इम्रान खान सरकार मान टाकू लागले आहे. त्यामुळे, सौदीची नाराजी मिटवायला उसनवारी करून आपल्या अडचणी वाढवणे म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सामरिकदृष्ट्या विचार करता कलम ३७० बाबतच्या पाकिस्तानच्या खुळखुळ्याला इतके महत्त्व देण्याची गरज नाही हे बिन सलमान जाणतात. तसेच, भारताशी उत्तम संबंध राखण्यात त्यांना जास्त स्वारस्य आहे. ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे तेलाची मागणी कमी झाली आहे. गेल्या तिमाहीत ‘सौदी आरामको’ या तेल कंपनीचा नफा ७३ टक्‍क्‍यांनी घटला आहे. सुमारे ९५ टक्के तेलावर अर्थव्यवस्थेची मदार असणाऱ्या सौदीसाठी हा मोठा फटका आहे. तो भरून काढण्यासाठी सौदीने मूल्यवर्धित कर पाच टक्‍क्‍यांवरून १५ टक्‍क्‍यांवर नेला. तसेच, सौदी राजवट आपल्या नागरिकांवर आता प्राप्तिकर आकारण्याच्या विचारात आहे. अशा अवघड परिस्थितीत केलेल्या मदतीचे पांग पाकिस्तान असे फेडणार असेल तर सौदीला येणारा राग स्वाभाविक म्हणावा लागेल. तो बिन सलमान यांनी व्यक्त केला. त्यावर ‘आपल्याला असे काही म्हणायचेच नव्हते’, अशी सारवासारव पाकिस्तानी प्रशासनाला करावी लागली आहे. मात्र, त्यामुळे बिन सलमान यांचे समाधान होत नसल्याचे बघून मागील आठवड्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांना तातडीने रियाध गाठावे लागले. सौदीची ओढवलेली नाराजी पाकिस्तानला परवडण्यासारखी नाही याचे भान पाकिस्तान सरकारला नसले, तरी पाकिस्तानी लष्कराला आहे. सौदीचे राजे फैजल यांनी पाकिस्तानला विनामोबदला वर्ष-दोन वर्षे तेलपुरवठा केला होता. त्या उपकारामुळेच लियालपूर या पाकिस्तानातील शहराचे नामांतर फैजलाबाद असे करण्यात आले. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख राहील शरीफ आता निवृत्तीनंतर सौदी दरबारात आपले हत्ती झुलवताना दिसतात. तसेच, नवाझ शरीफ, परवेझ मुशर्रफ़ यांनी अंतर्गत सत्तेच्या मारामारीत मदतीसाठी सौदीचे राजवाड्याचे दरवाजे ठोठावले होते. हा सर्व विचार करता पाकिस्तान सरकारने योग्य वेळेची वाट बघणे त्यांच्या फायद्याचे ठरले असते. मात्र, प्राधान्य असलेल्या इतर विषयांना सोडून संघटनेने आपलाच विषय हाती घ्यावा, हा इम्रान खान यांचा हट्ट त्यांच्या अंगाशी आला आहे. 

अगदी अलीकडेपर्यंत काहीएक फायदेशीर असणाऱ्या देशांची वा घटकांची आदळआपट इतर देश कमी-अधिक प्रमाणात सहन करायचे. तसे कोणतेही ‘वैशिष्ट्य’ नसताना फक्त शीतयुद्धाचा सोबती, एक इस्लामी देश आणि फार तर भारताच्या प्रगतीत अडसर ठरू पाहणाऱ्या पाकिस्तानला जगाने इतके वर्षे सहन केले. मात्र, ‘कोरोना’ने फक्त सर्वसामान्यांचेच आयुष्य नाही, तर जागतिक राजकारण पुरते ढवळून निघाले आहे. या संकटाशी जग लढत असताना, अर्थचक्राचा रुतलेला गाडा रुळावर आणताना नाकी नऊ येणार आहेत. सर्वकाही सुरळीत होण्यासाठी फक्त वेळच नाही, तर ताकद आणि पैसे ओतावे लागतील. दीर्घकाळच्या या लढाईत अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, ही जाणीव बऱ्याच देशांना आहे. त्यात पाकिस्तान मोडत नाही. आपण जरा आरडाओरडा केला की आपले ऐकले जाईल या भ्रमात तो देश आणि त्याचे नेते वावरतात. मुत्सद्देगिरीत लवचिकता महत्त्वाची ठरते हे त्यांना अजून उमजायचे आहे. सौदीने दाखविलेला हा हिसका एकूणच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे आणि सद्यःपरिस्थितीचे पाकिस्तानला भान नसल्याचे लक्षण आहे. ते भरकटल्याची जाणीव रियाधने आपल्या कृतीतून इस्लामाबादला करून दिली आहे. तेव्हा आता तरी भानावर येऊन पुन्हा कोणतीही आगळीक होणार नाही याची काळजी इम्रान खान यांच्या ‘नया पाकिस्तान’ला डोळ्यांत तेल घालून घ्यावी लागेल. तसे न केल्यास स्वतःचे गुडघे फोडून घेण्याशिवाय त्यातून फार काही साध्य होईल असे वाटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com