धन्नासेठ...

श्रीमंत माने shrimant.mane@esakal.com
सोमवार, 5 डिसेंबर 2016

वुई द सोशल

वुई द सोशल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पाचशे व हजारच्या नोटांवरील बंदीच्या निर्णयाला पुढच्या गुरुवारी एक महिना पूर्ण होईल. तेव्हापासून सोशल मीडियाच्या वॉल्स या एकाच विषयावर भरून वाहताहेत. निर्णय जाहीर झाल्याच्या काही तास आधी अमेरिकेच्या जनतेने नव्या अध्यक्षांची निवड केली होती. पण, नोटाबंदीच्या चर्चेत डोनाल्ड ट्रम्पही हरवून गेले. फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झालं. गेल्या मंगळवारी महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायतींचे निकाल आले. त्यात भाजपला मिळालेल्या यशाची सांगडही नोटाबंदीशी घातली गेली. त्याचवेळी "द फर्स्ट लेडी ऑफ महाराष्ट्र' अमृता देवेंद्र फडणवीस यांनी "बिग बी' अमिताभ बच्चन यांच्यासोबत "रेकॉर्ड' केलेल्या "अल्बम'ची छायाचित्रे व्हायरल झाली. त्यावरून थोडीबहुत उलटसुलट चर्चा झाली खरी; तथापि, या महिनाभराचा विचार करता ट्‌विटर, फेसबुक व व्हॉटस्‌ऍपवर नोटांचाच बोलबाला आहे.

या निर्णयाचे समर्थक आधी जोरात होते. आता विरोधकांनी नानाविध किस्से व दंतकथांचा, ऐतिहासिक दाखल्यांचा आधार घ्यायला सुरवात केली आहे. यापैकी धन्नासेठचा किस्सा सध्या जोरात आहे. बादशहा अकबर व चतुर बिरबलाच्या संवादाचा आधार घेत हा धन्नासेठचा किस्सा सोशल मीडियावर "व्हायरल' झाला आहे. एका लढाईवर प्रचंड खर्च झाल्यानं अडचणीत आल्यानंतर बिरबलाच्या सल्ल्यानुसार बादशहा धन्नासेठकडे आर्थिक मदतीसाठी जातो. "माझ्याकडं खूप पैसा आहे, हवा तेवढा घेऊन जा', असे सांगणाऱ्या धन्नासेठला अकबर विचारतो, की इतका पैसा कमावला कसा? अभयदान मागून ते धन किराणा मालात भेसळीद्वारे कमावल्याचे धन्नासेठ सांगतो. तेव्हा, रक्‍कम घेतल्यानंतर अकबर त्याला राजदरबाराशी संबंधित पागेतल्या घोड्यांची लीद जमा करण्याचं काम देतो. काही काळानंतर पुन्हा लढाईमुळे अकबराला मदतीची गरज भासते. पुन्हा धन्नासेठकडे जाण्याचा सल्ला बिरबल देतो. पुन्हा पैसे घेण्यापूर्वी अकबर "ते कसं कमावले' हे विचारतो.

"आपल्याला खुद्द बादशहानं लीद जमा करण्याचे काम दिलंय; पण तुम्ही घोड्यांना पुरेसा तोबरा देत नसल्यानं ते लीद देत नाहीत. तेव्हा, त्यांना पुरेसं खाऊ घाला किंवा लाच द्या', असं सांगून आपण पागेचा चालक, तसेच घोड्यांची निगा राखणाऱ्यांकडून लाच स्वीकारल्याचं धन्नासेठ कबूल करतो. पैसे घेतल्यानंतर तिसऱ्यांदा अकबर त्याचे काम बदलतो. या वेळी समुद्राच्या लाटा मोजण्याचं काम त्याला देण्यात येते. काही काळानंतर पुन्हा बादशहाच्या डोक्‍यावर लढाईमुळं कर्जाचा डोंगर उभा राहतो. पुन्हा तो बिरबलाला सल्ला विचारतो. पुन्हा बिरबल धन्नासेठचे नाव घेतो. बादशहा धन्नासेठला भेटतो. पैसे मागतो. या वेळी धन्नासेठ अट घालतो, की हवं तेवढं पैसे न्या. पण, या वेळी माझं काम बदलू नका! बादशहा त्याला अभिवचन देऊन संपत्तीचे गुपित विचारतो. धन्नासेठ सांगतो, बादशहानेच आपल्याला लाटा मोजायचं काम दिलं असल्याचं सांगून लाटा मोडतील या कारणास्तव बंदरावर येणारी जहाजं, बोटींना आपण किनाऱ्यावरच थांबवलं. तेव्हा, खलाशांनी समुद्रात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाच दिली. इतकं सारं घडल्यानंतर बादशहा अकबराची ठाम खात्री पटते, की धन्नासेठला काहीही काम दिलं तरी त्याला कमवायचं ते तो कमावणारच. हे रूपक नोटाबंदीच्या निर्णयानंतर चर्चेत आणणाऱ्यांनीही हेच सूचविण्याचा प्रयत्न केलाय, की ज्या भ्रष्टाचाऱ्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय आणलाय, त्यांची ही खोड काही केल्या जाणे शक्‍य नाही. जिथं शक्‍य असेल तिथं ते खाणारच.

माओ आणि चिमण्या
नोटाबंदीच्या निर्णयाच्या अनुषंगाने चीनचा राष्ट्रपुरुष माओ त्से तुंगशी संबंधित लेखक सुभाषचंद्र वाघोलीकर यांच्या नावानं एक मजकूर "व्हॉटस्‌ऍप'वर फिरतोय. साठ वर्षांपूर्वी माओने देशातील भुकेचा प्रश्‍न मिटविण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य वेचणाऱ्या चिमण्या मारण्याचा आदेश दिला होता. त्यालाही देशप्रेमाचा "टॅग' होता. मोठ्या प्रमाणावर चिमण्या मारल्या गेल्या. तथापि, ते अभियान संपता संपता चीनवर टोळधाडीचं संकट ओढवलं. कारण, चिमण्या मारल्या गेल्यानं निसर्गचक्र विस्कळित झालं, कीटकांची पैदास वाढली. तो मजकूर वाचल्यानंतर अनेक जण विचारणा करताहेत, की हे खरं आहे का? "ग्रेट लीप फॉरवर्ड' या माओच्या घोषणेशी संबंधित या प्रत्यक्ष घटना आहेत. "फोर पेस्टस्‌ कॅम्पेन' म्हणून 1958 ते 60 मधील उंदीर, माशा, डास व चिमण्यांच्या निर्दालनाची ती मोहीम प्रसिद्ध आहे. चिमण्या, त्यांची घरटी, अंडी, पिल्ले मारल्याचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर चिमण्यांऐवजी ढेकणांचा समावेश त्या अभियानात करण्यात आला. पुढे 1998 मध्येही कृषी विद्यापीठे व अन्य काही संस्थांना माओच्या त्या मोहिमेची आठवण झाली. तेव्हा, झुरळं मारण्याची मोहीम आखली गेली.

Web Title: note ban and narendra modi