वीजटंचाईने कातावले जग

बीजिंगच्या कोळसा खाणींमध्ये सध्या सुरक्षा तपासणी सुरू आहे. यामुळे उत्पादन कमी झाले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे विजेचे उत्पादन घटले.
Industry
IndustrySakal

- ओंकार माने

कोरोना विषाणूचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतानाच आता इंधन आणि ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे भारतासह चीन, पाकिस्तान हे आशियाई देश; तर पूर्वेकडील युरोपमधील ब्रिटनसह अनेक देश अक्षरशः कातावले आहेत. भारतात कोळशाच्या मर्यादित साठ्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. कोळशाअभावी अनेक वीज केंद्रे कधीही राम म्हणू शकतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील अर्थगाडा हळूहळू सुरू झाल्याने साहजिकच प्रत्येक क्षेत्रात मागणी वाढली, पण पुरवठा कमी असल्याने अडचणी वाढत आहेत. अवकाळी पाऊस आणि बेभरवशाचे वातावरण यामुळे अनेक खाणी पाण्यात गेल्याने कोळसा मिळत नाही. चीनमध्येही कोळशाअभावी अनेक वीजकेंद्रे बंद आहेत. विजेची अभूतपूर्व टंचाई आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होणार असल्याचे बोलले जाते. चीनमधील वीजसंकटामुळे आशियाई देशांमधील व्यापार व्यवस्था कोलमडू शकते; व्यापारासाठी चीनवर अवलंबून देशांमध्येही याचे परिणाम दिसून येतील. दुसरीकडे, ब्रिटनमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या कमतरतेमुळे लोक चिंतेत आहेत. भारतातही पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या वायूच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. यामागे काय कारणे आहेत, याकडे पहिले पाहिजे.

बीजिंगच्या कोळसा खाणींमध्ये सध्या सुरक्षा तपासणी सुरू आहे. यामुळे उत्पादन कमी झाले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे विजेचे उत्पादन घटले. त्यामुळे विजेचे रेशनिंग सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याच्या किमती विक्रमी 80% वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक वीजनिर्मिती केंद्रे बंद करावी लागली. यामुळे येथे विजेचे संकट उभे राहिले. कोळशावर चालणाऱ्या वीज कंपन्या कोणत्याही परिस्थितीत त्यांचा विस्तार करू पाहत आहेत. जेणेकरून हिवाळ्यातील विजेची मागणी पूर्ण करता येईल. परंतु कोळसा व्यापाऱ्यांनी असे म्हटले आहे की, यासाठी नवीन आयात स्रोताचा विचार करणे हा चांगला पर्याय असू शकतो. कारण, रशिया, युरोपच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देत आहे. पावसामुळे इंडोनेशियातील उत्पादनावरही परिणाम झाला आहे. कोरोना महासाथीचा चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. सध्याच्या वीज संकटाने चीनसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. चीनमध्ये विजेची मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी अनेक कारखाने, मॉल्स, दुकाने बंद करावी लागली. निवासी भागातही वीज वापराबाबत निर्बंध लागू केले आहेत.

भारतात सप्टेंबरअखेरीस देशातील 135 कोळशावरील औष्णिक वीज प्रकल्पांपैकी 16 प्रकल्पांचा साठा संपला होता. अर्ध्याहून अधिक प्रकल्पांमध्ये तीन दिवसांपेक्षा कमी साठा होता. आता देशातील औद्योगिक आघाडीवरील अनेक राज्यातून कोळसा साठा संपत आल्याने केंद्राने मदतीचा हात द्यावा, अशा मागणीचे निरोपावर निरोप धडकू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर विक्रमी आहेत. देशात किंमती खूप कमी आहेत. या फरकामुळे आयातीच्या अडचणी वाढल्या आहेत. देशातील कोळसा उत्पादनात 80% वाटा असलेल्या कोल इंडियाचे म्हणणे आहे की, जागतिक कोळशाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आपल्याला देशांतर्गत कोळसा उत्पादनावर अवलंबून राहावे लागते.

युरोपातही वीजसंकट

तिकडे युरोपीय महासंघातील देशांमध्ये काही आठवड्यांमध्ये वीजबिलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्पेनमध्ये दर तिप्पट झाले आहेत. त्यामुळे युरोपमध्ये येणारा हिवाळा खूप कठीण होऊ शकतो. कारण हिवाळ्यात विजेची मागणी सर्वाधिक असते. या वीजसंकटामागे अनेक स्थानिक कारणे आहेत. यामध्ये नैसर्गिक वायुसाठा आणि परदेशी शिपमेंटमध्ये घट, तसेच प्रदेशातील सौर शेती आणि पवनचक्कींमधून कमी विजनिर्मितीचा समावेश आहे. आण्विक ऊर्जा प्रकल्पही देखरेखीमुळे बंद आहेत. या संकटादरम्यान, स्पेन, इटली, ग्रीस, ब्रिटनसह सर्व युरोपीय देश वेगवेगळे उपाय करत आहेत. एकुणात कोरोनोत्तर काळात औद्योगिक उत्पादनात आलेली गती व त्यासाठी वाढलेली विजेची मागणी आणि तिच्या निर्मितीसाठीचा कच्चा मालाचा तुटवडा आणि दरातील तेजी अशा अनेक कारणांनी जगभर विजनिर्मिती अडचणीत आहे. परिणामी, त्याचा तुटवडा वाढत आहे. त्याचे फटके उद्योग, व्यवसायासह जनसामान्यांना बसणे अपरिहार्य आहे.

(लेखक जागतिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com